मराठी कथा
व्यक्तिचित्रण
आठवणीतले दाभोळकर.......!!
रविवार, १ नोव्हेंबर, २०२०
१ नोव्हेंबर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा जन्मदिवस!!
त्यांची एक अतिशय गोड आठवण खूप वर्षे हृदयात जपली आहे, जेव्हा जेव्हा ती माझ्या डोळ्यासमोर येते, तेव्हा तेव्हा अवचित घडून गेलेल्या त्या गोष्टीचा मला आताशा खूप अभिमान वाटतो.
मी जन्मापासूनच भयंकर भित्री होते. आणि माझा हा भित्रेपणा जसा जसा इतरांच्या लक्षात यायला लागला, तसे सर्व मला आणखी जास्त घाबरवायचे. घरचे बाहेरचे सगळेच.........
सर्वात जास्त मी घाबरायचे भुतांना!!
दिवसाढवळ्या सुद्धा अगदी एका खोलीतून दुसरीकडे जायला घाबरायचे मी. सारखं वाटायचं इकडून तिकडून कुठून भूताने येऊन आपली गचांडी धरली तर??
रात्री झोपताना पण सर्व दिवे बंद केलेले मला चालायचंच नाहीत. कुठलातरी एक दिवा चालू ठेवायला सांगायचे आणि त्याच्याकडे बघतच रामनामाचा अखंड जप करतच झोपी जायचे.
तरीपण स्वप्नात नेमकी यायची भूतचं!!
त्या चिंचेच्या झाडाकडे बघायला अजिबात आवडायचं नाही, कारण ते झाड भुतांना प्रिय म्हणून नावाजलेलं होतं ना!! तरी नेमका घराच्या समोर चिंचेचं झाड, मोठा हौद असा सगळं भुतांना खुणावणारा जामानिमा होताच. मोठा धीर करून चिंचा हुडकायला जायचे सकाळी, आणि रात्र व्हायला आली की मनानं कितीही नको म्हटलं तरी बाहेर पायरीवर बसलं की डोळे चोरून त्या झाडावर भूतं लोंबकळतायत का बघायला वळायचेच.
तिथं कोणी खरं दिसलं तर नाही कधी, पण स्वप्नात मात्र हटकून दिसायचेच. मी झाडाखाली चिंचेची बुटुकं शोधत असायची, आणि वरून एखादं भूत धबाsकन् समोर पडायचं किंवा एखादी हडळ केस मोकळे सोडून मागे लागायची आणि मी जीव मुठीत धरून पळत असायचे.
पळता पळता ठेच लागायची आणि मी टsप् करून डोळे उघडायचे अन् हुश्य स्वप्न होतं तर...... करून परत झोपी जायचे. झोप कसली मेली येतीये. ती स्वप्नातली भूतं आणि हडळ डोळ्यासमोर पिंगा घालत बसायचे.
हे ही कमी म्हणून माझ्या डोक्यात कोणीतरी भरवलेलं भूतं माणसांच्या रूपाने सुद्धा वावरत असतात. आपल्याला ओळखता येत नाहीत.
मी घरातल्या झाडून सगळ्यांना रोज रात्री किंवा जेव्हा माझा त्यांच्यावर डाऊट जाईल, तेव्हा राम राम म्हणायला सांगायचे. राम म्हटलं की माणूस जातीची खात्री पटायची. पण घरातले पण काही साधे नव्हते, मुद्दाम कोणी राम म्हणायचंच नाही, मला तंगवायचे उगाच. मग मी रडायला लागल्यावर एकदाचे हसून राम राम करायचे.
मी स्वतःच या सगळ्या प्रकाराने हैराण झाले होते.
भूतं नक्की आहेत की नाहीत हा प्रश्न काही केल्या सुटतच नव्हता. सगळ्यांना विचारायचे, सांगा ना खरंच भूतं असतात की नसतात?
पण छाती ठोकून किंवा शपथेवर भूत नसतंच असं कोणीच म्हणायचं नाही.
माझा थरकाप मग वाढतच होता.
मी पाचवीला गेले, साल होतं 1990. भूतं माझ्या मानगुटीवरून उतरायचं बघतच नव्हती. आठवड्यातून चारदा तरी स्वप्नात तडमडत होतीच.
नेहमीप्रमाणे घाबरून मी मामाला विचारलं, मामा सांग की रे खरं भूत असतं की नसतं?
मामा म्हणाला, मला काय विचारतीस? जा जाऊन त्या दाभोळकराला विचार!!
मला दाभोळकर माझ्या मामाचा मित्र वाटला. तरी मी म्हटलं, कोण दाभोळकर?
अगं तो रात्रीचा स्मशानात जाऊन बसतो. बुवाबाजी करणाऱ्यांना पकडतो. त्याला विचार भूतं आहेत का? त्याला माहिती आहे सगळं!! अंधश्रद्धा निर्मूलनवाला आहे तो. जा त्याच्याकडं........
मीss जाऊ?
हो जा की ......शाळेतून येताना जाऊन ये. मोती चौकात ऑफिस आहे बघ त्याचं.
मी म्हटलं, मी एकटी जाऊ?
तर म्हणाला, जा की मग दुकटं कोण कशाला पाहिजे आणि?
मला एवढ्या महत्वाच्या चौकशीला एकटं पाठवण्याची मामाची कल्पना अजिबात पटली नाही.
आठवडा असाच गेला. भूतं डोक्यावर होतीच. सोक्षमोक्ष लावणं दिवसेंदिवस फार गरजेचं होत चाललेलं.
मी पुन्हा मामाला पकडलं,आणि विचारलं. मामा तरीपण तूच सांग की रे नीट, भूतं असतात का?
मामा म्हणाला, तुला म्हटलं ना जा त्या दाभोळकराकडं? तिकडंच जातीस ना शाळेला? काय होतं विचारायला? जा की बेधडक.
मामा ऐकायलाच तयार नाही म्हटल्यावर, मलाही वाटलं. एवढा बोलतोय तर जाऊन पाहूया.
मी शाळेतून जाता येता माझ्या बरोबर असणाऱ्या मैत्रिणीला सांगितलं. तिला ते अजिबात बरं वाटलं नाही. तिला तसं करायची भारी लाज वाटत होती. लाज तर तशी मलाही वाटत होती, पण डोक्यातला भुताचा कारभार उरकायचा होता, म्हणून ती दडपावी वाटत होती.
कसबसं करून दहा दिवस मस्कामारी केल्यावर ती मैत्रीण तयार झाली.
मग एक दिवस ठरवून आम्ही मोतीचौकात खालच्या रोडला वळलो. पत्ता शोधून त्यांच्या ऑफिसपाशी आलो. वरती जायला छोटी माडी होती. माझ्या मैत्रिणीचं मन पहिली पायरी चढतोय न चढतोय तोच पालटलं. ती तिथून पळाली, आणि मी तिच्या मागं पळाले. परत तिची लाज आडवी आली. माझा नाईलाज झाला. कारण मैत्रिणीशिवाय काही करता येण्यावढा धीर माझ्या अंगी देखील नव्हता.
मी तिला कसंबसं दुसऱ्या दिवशीसाठी मनवलं.
तर तिने दांडीच मारली.
परत तिसऱ्या दिवशी मी तिला जरा खेचूनच घेऊन गेले. आम्ही दोघी तू जा पुढं, मी जा पुढं करत धीराने माडी चढलो, तर ऑफिसला कुलूप लागलेलं दिसलं.
मैत्रिणीला आनंद झाला. मला अजून काही दिवस भुतांबरोबर काढावे लागणार म्हणून धस्स् झालं.
तो आठवडा तसाच गेला.
मग पुन्हा शाळा सुटल्यावर मी मैत्रिणीला मस्का पॉलिश मारून, लिमलेटच्या गोळीचं आमिश दाखवून माडीपर्यंत नेलं.
पुन्हा लाजालाजी झाली. मागं पुढं करत आम्ही एकदाचं वर गेलो. गेलो तर ऑफीस उघडं होतं. ते बघून माझी मैत्रीण खाली पळाली. मी पुन्हा तिला किती काय काय बोलून वरती आणलं. मी हळूच आत डोकावून बघितलं तर, छोट्याश्या खोलीत साधासा कोणीतरी चश्मेवाला माणूस काहीतरी लिहीत बसला होता. मामाने सांगितलेले दाभोळकर हेच का ते कळायला मार्ग नव्हता. मी आणखी दोनदा डोकावलं, आत जायला भीतीचं वाटत होती.
आमची जिन्यावर धुसपुस चालू होती. माझी मैत्रीण मला खाली ओढत होती, मी तिला वरती ओढत होते. त्याने त्या माणसाची तंद्री भंग झाली. त्यांनी मान वर केली, मी डोकावत होतेच, त्यांनी बघितलं तसं मी पटकन विचारलं, आत येऊ का?
ते हो म्हणाले, मी म्हटलं, मला दाभोळकरांना भेटायचय. माझ्या मामाने पाठवलंय.
त्यांनी समोर खुर्चीवर आम्हा दोघींना बसायला सांगितलं, आणि म्हणाले, बोला मीच दाभोळकर.
आम्ही दोघी समोर बसलो. दाभोळकरांना बघून जी भीती वाटत होती ती पळाली. मी कल्पना केलेली, दाभोळकर म्हणजे कोणी जाड मिशीवाला, धष्टपुष्ट माणूस असेल. स्मशानात जाऊन बसणारा, भूतांशी दोन हात करणारा माणूस धटिंगण टाईपच असला पाहिजे. भीती खरी अशा माणसाला भेटायचीच वाटत होती.
पण समोर तर एक मवाळ, एकदम आपल्या घरातला वाटणारा माणूस होता.
सगळी भीती पळाली, आणि मी बोलती झाले. हो मीच, कारण भूतांचं मलाच पडलं होतं. मैत्रिणीला त्यांच्याशी काही वांदा नव्हता.
मी त्यांना विचारलं, भूतं खरंच असतात का हो?
नाही अजिबात नाही....
पण मला खूप भीती वाटती.
भूतं नसतात तर भीती वाटायचं काय कारण?
चिंचेच्या झाडाखाली असतात का? रात्री घरात फिरतात का?
ते त्यावर ठाम नाही म्हणलेलं आठवतंय. तर्कशुद्ध काही उत्तर दिलं असेल त्यावेळी तर ते मात्र आठवत नाहीये.
मी पुन्हा म्हटलं, मग माझ्या स्वप्नात का येतात?
ते म्हटले, आपण विचार करतो ते स्वप्नात येतं.
मी पुन्हा म्हटलं, नक्की नसतात ना हो भूतं? मामा म्हणाला, तुम्ही रात्रीचे स्मशानात जाऊन बसता?
ते म्हणाले, हो तुला कुठं दिसलं भूत तर सांग मला, मी येतो पकडायला.
मी म्हटलं, नक्की ना हो नसतात?
ते म्हणाले, नक्की नसतात. अजिबात घाबरायचं नाही.
हे बोलणं झाल्यावर आम्ही तिथून निघालो
.
मनात पक्क झालं, भूतं नसतात. आणि त्यातून एखादं सापडलंच तर त्याला दाभोळकरांकडे नेऊन सोडायचं किंवा त्याला पकडायला त्यांना बोलवायचं.
मी घरी येऊन मामा आल्यावर त्याला सांगितलं, मी भेटून आले दाभोळकरांना.
मामाला पहिले खरच वाटलं नाही. मी त्याला शपथेवर सांगितलं. काय बोलणं झालं सगळं सांगितलं, मग त्याला पटलं. मला आठवतं, तो कोणी भेटलं की आवर्जून सांगायचा, ही त्या दाभोळकराला भेटून आली.
हे सगळं अगदी साधं घडलं.
पुढे मी मोठी होत गेले, तसं पेपरात नाव वाचू लागले, मनात यायचं 'मी यांना भेटलीये'. पुढे पुढे त्यांंचं कार्य अधिकाधिक नावाजलं जात होतं, तसा त्यांच्याविषयी 'मी यांना भेटलीये' यातला साधेपणा जाऊन त्याचा अभिमान मनाशी वाढत जात होता.
नंतर मोठी झाल्यावर वाटलं, अरे मी यांना किती सहज भेटले. पाचवीतल्या आम्ही दोघी अगदी लहान चणीच्या, बघून तिसरी चौथीत वाटणाऱ्या. त्या पोरींचे प्रश्न कपाळावर एकही आठी न आणता यांनी कसे दिले? या शेंबड्या पोरी माझा वेळ खातायत म्हणून यांनी स्वतःहून आम्हाला घालवलं कसं नाही?
माझ्या सगळ्या बाळबोध आणि खोदून खोदून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवून समाधान झाल्यावरच आम्ही तिथून हललो. एवढं कसं झेललं त्यांनी आम्हाला?
आज विचार केला तर मला माझ्या मामाचंही कौतुक वाटतं, त्याच्यामुळे मला ही जन्मभर मनात जपून ठेवावी अशी ठेव मिळाली. किती सहज बोलला तो, जा की भेट जाऊन दाभोळकराला!!
हळूहळू दाभोळकर अलगदच माझ्या विचारातही आले. काही कुठे विचारांची दुविधा झाली तर आजही माझ्या मनात तेच येतात. अगदी बाळंतपणात ग्रहणाच्या वेळीदेखील तेच धावून आले माझ्या मदतीला. ते पाळायचं की नाही, दिवसभर उपाशी राहणं जमणार नाही वाटत होतं. पण कोणी खाल्लं तरी चालेल असं बोलणारं भेटलच नाही म्हणून सरळ अंनिसला फोन केला. नंदकिशोर तळशीलकरांना फोन लागला, आणि त्यांनी सांगितलं, खा हो पाहिजे तेवढं. माझ्या बायकोने ग्रहण पाळलं नाही. आमचं मूल चांगलं टुणटुणीत आहे. निर्धास्त झाले, आणि मनात काहीही किंतु-परंतु न आणता ग्रहण अजिबात पाळलं नाही. सगळं अगदी व्यवस्थित पार पडलं. तळशीलकरांनी खूप छान सगळं समजावून सांगितलं. काही वाटलं तर बिनधास्त फोन करा कधीही असंही सागितलं, अगदी त्यावेळी दाभोळकरांनी सागितलं तसंच.
साताऱ्यात पाचवीत भेटलेले दाभोळकर माझ्या मनातल्या विचारात आपोआप रुजले गेले, सतत बरोबर राहिले. माझी खूप इच्छा होती, त्यांना भेटून ती लहानपणीची आठवण सांगायची होती मला, त्यांना ते आठवतंय का बघायचं होतं मला. ते अशक्य होतं तसं, पण तरीही मी धीर केला असता.
इच्छा अपूर्ण राहिली, माणूस मारला गेला. पण माझ्यासारख्या कितीतरी करोडो लोकांना ज्यांनी विवेकाची वाट दाखवली, ते त्यांचे विचार कसे मारले जाणार? ते रुजलेत, वाढलेत आणि दिवसेंंदिवस आणखी फोफावत चाललेत, त्यांना मारणं कुणाला कधीही शक्य होणारच नाही......
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article