राखणदार........!!

हो, मी इथं एकटी राहतेय. कारण मला इथंच बरं वाटतं.
बरोब्बर अठराव्या वर्षी आले मी या घरात, आता ऐंशीला एक कमी आहे. साठ वर्षाच्या वर काळ गेला. आता सोडवल का हे घर माझ्याकडून?
सांगू का? एकटी वाटते पण एकटी मुळीच नाहीये मी......
ती मागच्या परसातली दोन आंब्याची झाडं मस्त सोबत करतात की. जणू काही दोन खमके भाऊच!! अन् त्या दोघांच्या मधला चिकू तर बाराही महिने फळाने लगडून गावातल्या पोरांची, माणसांची चहल- पहल घराच्या आजूबाजूला राहील याची पूर्ण काळजी घेतो. 
पुढच्या दारात लालचुटुक जास्वंद आहे, मोगऱ्याचा ताटवा आहे. सदाफुली तर रोजच्या रोज भरगच्च फुलं अंगावर घेऊन या वयातही प्रसन्नता भरते माझ्या मनात. सकाळ सकाळ सुवासिक सडा पाडून अंगण भरून टाकणारा तो प्राजक्त आहे दारासमोर. आणि त्या मोठ्या वृंदावनात डोलणारी भरगच्च तुळसही आहेच की!!

ती बिलोरी नाही का अजून, सारखी पायात घुटमळणारी. तिची पिल्लावळही आहेच, म्याsव म्याsव करत आवाजाने घर भरणारी.

ही सारी सोबत कमी आहे का?

कामधंद्याच्या माणसांना कुठं पकडून ठेवायचं गावात? त्यांना इथं गमत नाही नी आमच्यासारख्याना तिथं शहरात!! सगळं आयुष्य गेलं इथं गावात, आता मरायला कशाला शहर गाठायचं ते.

माझ्या म्हाताऱ्याला फार वाटायचं आपल्या माघारी कस़ं होणार या म्हातारीचं? कोण बघणार तिच्याकडं? 
मी म्हणायचे त्याला, जन्म घालवला गावात. पोरं जवळ नसली म्हणून काय झालं? गाव बघल की माझ्याकडं.
मी बोलायला बोलले तेव्हा, पण खरंच हो आख्खा गाव बघतो माझ्याकडं.

दोन घरं सोडून राहते ती देसायांची नवीन सून,
सासू काही बोलली की रडायला येते माझ्याकडंच. आजी तुझा हात पाठीवरून फिरला की बरं वाटतं, तुझ्या घरी आलं, की माहेरात आल्यासारखं वाटतं, इतकी गोड गोड बोलते, जणू माझी खरीखुरी नातच. रोज चार वाजता येऊन स्वतःच्या हाताने चहा बनवून देते मला. 

ती बाजूची पमा खुशाल पोरांना सोडून जाते माझ्याकडं, कुठंही जाताना. ती गोड पोरं आजी आजी करत मागे पुढे फिरत बसतात, वेळ कसा जातो कळतच नाही. ती पमी ना हट्टी आहे एक नंबरची, मला म्हणते, आता एकटीसाठी स्वयंपाककाम करत बसायचं नाही, वय काही कमी नाही तुमचं. मला आई नाही की सासू नाही. इथं लग्न होऊन आल्यापासनं तुम्हालाच बघतीये, दोघींच्या जागी. मला तुम्ही जड नाही. तुमच्या जेवणाचं मी बघणार. जेव्हापासून म्हातारा गेला, तेव्हापासून पमी दुपारचं अन् रात्रीचं ताट आणून देतीये. जेवण होईपर्यंत माझ्याबरोबर बसते, गप्पा मारत. बारीक नजर ठेऊन असते माझ्याकडं जरा कमी खाल्ल्यासारखं वाटलं की बया, जाऊन यायचं का डॉक्टरकडं म्हणत बसते सारखी. वाटतं, ही मागच्या जन्मी आईच असणार माझी!!
 
रात्री झोपायला मान्यांचा वैभव न चुकता येतो. पन्नाशीतच बायको गेली त्याची. मला म्हणतो, घरी आईजवळ भाऊ, वहिनी आहे, तुम्ही एकट्याच, तुमच्या जोडीला कोणी नको? काका नेहमी म्हणायचे मला, माझ्या म्हातारीकडे लक्ष ठेवायचं बरं का. तालुक्याच्या शाळेत त्यांच्यामुळं लागलो मी. त्यांचा शब्द जपायलाच हवा. 
मागं जरा रात्रीची धाप लागली, तर किती धावपळ केली या पोराने. 

हे एवढं मोठं घर, त्याला रोज सकाळी येऊन झाडून काढते आमची सरू. आईबरोबर यायची एवढीशी असल्यापासून. आता तीच येते, म्हणते आईनं सांगितलय, दुसरीकडं नाही गेलीस तर चालेल,पण त्या म्हातारीच्या घरी जायचं चुकवू नकोस कधी.  आपल्या निमित्तानं तिच्या आजूबाजूला माणसं फिरायला हवी. माणसं दिसत राहिली तर आणखी जगल ती. सरू घर झाडती, मागलं पुढलं अंगण झाडती, पाणी भरून देती, पैसे किती घेती माहितीये का?

सांगा बघू, किती घेत असल?

राहू दे. मीच सांगते, फुकट हो फुकट. म्हातारा होता तोवर घेत होती, तो गेला तेव्हापासनं सोडून दिलं पैसे घेणं. मोजली तर चार वर्ष तरी होतील. 
तिची आई तिला म्हणती, म्हाताऱ्याचा जीव अडकला होता म्हातारीत. जो दिसल त्याला सांगायचा, माझ्या मागं, म्हातारीकडं बघा बरं का.
ज्यानं इतकी वर्ष आमची नड काढली, त्याची नड आम्ही नाही तर कुणी बघायची? सरू तर रोज येतीच, पण तिची आईही लक्षात ठेवून दोन दिवसातून एक फेरी मारतीच. 

बघा आता, मी काय बोलायला बोलले, गाव बघेल म्हणून. माझ्या म्हाताऱ्यानं आख्ख्या गावाला गळ घालून ठेवली. गावातलं एकन् एक घर माझ्यावर लक्ष ठेऊन असतं. घरं थोडकीच आहेत तशी. ज्यांना गाव सोडता आला नाही त्या माणसांना कुशीत घेऊन बसलेली. पण ती आहेत म्हणूनच गाव आहे, ती आहेत म्हणूनच मी अजून शरीरानी आणि मनानी खंबीर आहे.
नाहीतर केव्हाच गेले असते, म्हाताऱ्याच्या मागं मागं.

नाहीतर कोण बघणार होत माझ्याकडं? 
आता तुम्ही म्हणाल, एवढं काय पोरं बाळ होती ना, जायचं की त्याच्याकडं.

अहो जायला कुणी बोलवायला तर पाहिजे ना?
पोरांना लागली शहराची हवा. गेली ती तिकडचीच झाली. आपल्या संसारात रमली, गाव त्यांच्या बायकापोरांना आवडेना, त्यांचं पाऊल काही इकडं फिरकेना.

वर्षातून यायची एकदा तशी, म्हातारा गेल्यावर ते पण सोडलं. कुणी मला म्हटलं पण नाही, चल की जरा हवापालट करायला. म्हटलं असतं तरी जाणार थोडीच होते मी माझं घर सोडून. 
म्हाताऱ्याला चांगलच माहीत होतं, टाकले गेलोय आपण पोरांकडनं. आपल्यानंतर हिचं काही खरं नाही. 
बोलता बोलता बोलले मी, तर म्हातारं साऱ्या गावाला सांगत सुटलं, तो जवळचा वाटला पोरांपेक्षा त्याला. त्यानं साऱ्या गावलाच माझं राखणदार बनवून टाकलं !!

अन् खरंच तोच जवळचा ठरला पोरांपेक्षा.......
म्हाताऱ्याचा विश्वास सार्थ ठरवला गावाने, म्हणून तर हे घर मी गावाला दान करून टाकलय. कागदपत्र घेतलीत बनवून तशी. आमच्याच नाही तर आजूबाजूच्या कुठल्याही गावातलं टाकलेलं माणूस इथं बिनदिक्कत राहू शकतं आणि मला खात्री आहे, माझा गाव त्याला नक्की बघेल अगदी मरेपर्यंत........

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.

Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel