किंमत.......!!

ओ बाईss जरा इकडे याs
नुपूरला रस्त्यावरच्या किडुक मिडुक गोष्टी वेचून पोत्यात टाकणारी बाई दिसली, तसं एकदम काहीतरी क्लिक झालं, आणि तिने गॅलरीतूनच तिला हाक मारली.
ती बाई गेटजवळ आली, तसं वाचमनने तिला गेटबाहेरच थांबायला सांगितलं. 
नूपुरने घरातले दोन बिस्किटचे पुडे घेतले आणि खाली जाऊन त्या बाईच्या हातात दिले आणि
म्हणाली, चांगले आहेत, पण पोरगा खात नाहीये, त्याला कंटाळा आलाय याचा.
त्या बाईने ते घेतले, दोन पाऊलं पुढे गेली, आणि परत मागे वळून म्हणाली, बायजी, और कुछ होगा तो देवो ना, हमारा बच्चा सब खाता .........

तिचा तो पोरासाठी झालेला लाचार चेहरा बघून नुपूरचं मन भरून आलं. तिने हाताने त्या बाईला थांबायला सागितलं, वर गेली आणि तिला जे जे समोर दिसलं त्यातल्या एकेक दोन दोन गोष्टी तिने उचलल्या. त्यात पोराला आवडतात म्हणून आणलेली सीताफळं होती, सफरचंद होती, केकचं पाकीट होतं, चिरमुरे, लाह्या जे दिसेल ते सगळं तिने पिशवीत भरलं.
तिचा मुलगा ते बघून ओरडायला लागला, मम्मी हे माझं आहे, मी खातो ते. मला पाहिजे, ते नाही दयायचं कोणाला. 

नुपूर म्हणली, थांब तुला आणू आपण संध्याकाळी. तो तणतणत पाय आपटत बसला.
त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती पटकन खालती आली.
ती कळकट्ट बाई आशेने वरती तिच्या गॅलरीकडे बघत उभी होती. पाठीवर एका हाताने पकडलेलं पोतं तर तिच्याहून कळकट्ट होतं. दोघही जणू काही एखाद्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर नुकतीच लोळत पडून उठली असावीत अशीच वाटत होती. पोत्यात भरलेल्या रस्त्यावर पडलेल्या, लोकांनी नको म्हणून टाकून दिलेल्या सटर फटर गोष्टी फार मौल्यवान होत्या तिच्यासाठी. 

नुपूरने तिच्या हातात पिशवी दिली आणि म्हणाली,
ये सब मेरा बच्चा खाता है, पर तुम्हारा भी खायेगा तो मुझे अच्छा लगेगा.......

त्या बाईने ती मोठी पिशवी घेतली, त्यात डोकावून बघितलं आणि म्हणाली, बायजी, अब मै पयले घरकुही जायेगी, बच्चा लोग भोsत खूश हो जायेगा!! उनको सब चलता, वो सब खाता बायजी......

नुपूर किंचित हसून म्हणाली, कल तुम फिर आना, मै सब प्लॅस्टिक निकालके रखती हुँ..…. 

ती बाई मान डोलावून निघून गेली. 

नुपूर वर आली, तिचा मुलगा तिच्यावर रुसून बसला होता. ती त्याला समजवायला गेली तर तो उठून बाजूला जाऊन बसला. सहा वर्षाचा तर होता तोही. त्यात एकटाच असल्याने घरात येणारं त्याचं एकट्याचच असायचं सारं. 

नुपूर पुन्हा त्याच्या बाजूला गेली, आणि म्हणाली, बाळा, आपलं गेलं तर आणता येतं ना आपल्याला नवीन. लगेच आणू शकतो आपण. पण त्या बाईचं तस नाही. आपल्यासारखं मनात आलं की ती नाही घेऊ शकत काही. तेच आपण मात्र मनात आलं तर घेऊही शकतो आणि देऊही शकतो कोणालाही काही!!
कित्ती छान ना!!

तू बघितलस का तिला ती रस्त्यावर आपण टाकून दिलेलं गोळा करते, ती कचऱ्यात दिवसभर काय काय वेचत बसते रे. तिच्या घरी पण छोटी मुलं आहेत तुझ्यासारखी. त्यांना नाही मिळत असं तुझ्यासारखं. जे मिळेल ते खातात ती. काहीही कुठेही पडलेलं चालतं त्यांना. 
तुला बिस्कीटं आणलेली, ती तुला खाऊन कंटाळा आला तरी संपतच नव्हती. 

पण म्हणून काय माझं आवडतं पण देवून टाकायचं का? मला खायचा होता आत्ता तो केक, मुलगा तिच्याकडे बघून रागाने गाल फुगवत म्हणाला.

हो तुला त्या पोरांना दिलं म्हणून लगेच खावंसं वाटलं का? नाहीतर मलाच आठवण करून दयावी लागते खाण्याची. तुमच्या मागे आई घेऊन फिरते, आणि ती पोरं आईच्या मागे दे दे करत फिरतात, माहितीये तुला?
आपण आणू संध्याकाळी, तुला खायचंय ते. 

मुलाला किती कळलं कुणास ठाऊक, पण तो शांत झाला. तसंही तिला जास्त काही लेक्चर देत बसायचं नव्हतंच त्याला, तिला माहिती होतं, तो सांगून नाही बघूनच शिकणार सगळं.

दुसऱ्या दिवशी वॉचमन खालून हाका मारायला लागला, म्हणून ती गॅलरीत गेली, तर तिला ती बाई  डोकं खाजवत तिच्याकडेच बघत असताना दिसली.

नुपूरने सगळं प्लास्टिक सामान, न लागणाऱ्या गोष्टी गोळा करून पोत्यात भरून ठेवल्याच   होत्या. ती आली तसं उचललं आणि खाली तिला द्यायला गेली. ते सगळं घेऊनही ती हलेना, म्हणून नुपूर तिला म्हणाली, क्या हुआ?

ती बाई म्हणाली, वो कल खाया तो.......

नुपूरला एकदम उगाच भीती वाटली, मनात आलं,  काय झालं खाऊन, चांगलं तर होतं सगळं. 

त्या बाईने वाक्य पूर्ण केलं, वो कल पेट भरके खाया तो, बच्चा लोग शांतीसे सोया. रोज आधे पेट सोता. बच्चा सोया पर मेरेकू निंद नही आई.....

नुपूर म्हणाली, क्यो? तुमने नही खाया क्या?

ती बाई म्हणाली, नै खाई. उनको देखके मेरेकू कुछ खाने को हुवाच नई......

ऐसा कुछ रहेगा तो  बुलाना मेरेकू. मै रोज इधर आती.....
मेरा बच्चा लोग सब सब खाता है बायजी........

नुपूरने तिला हो म्हणून सागितलं आणि ती भरल्या डोळ्याने घराकडे वळाली.
मनात आलं, तिची पोरं सर्व खातात कारण त्यांना मिळतच नाही काही. ती आपल्या पोरांच्या जागी असती तर असंच वागली असती.

शेवटी ज्याच्याकडे नसतं त्यालाच त्या गोष्टीची किंमत असते, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. 

कुठे आपली अन् त्यांंची तुलना करा उगीच......


©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel