आई समजून घेताना........!!


सुमुखीला हल्ली जरा जास्तच जाणवायला लागलं होतं. त्यात तिची मुलगीही तिला सारखी बोलत होती, तू ना आता सेम आजीसारखी करतेयस. तू ना डिट्टो तशी वागायला लागलीयेस. चेहराही तुझा आता तिच्यासारखाच वाटायला लागलाय मला.

सुमुखी म्हणायची तशी झलक असतेच आईची मुलीत. पण तिलाही वाटत होतं, वय वाढतंय तसं आई जास्तच शिरायला लागलीये आपल्या अंगात.
तिच्यासारखच बोलतो आपण बरेचदा, हावभावही तसेच होतात, प्रकर्षाने जाणवतंय हल्ली!!

सुमुखीला पहिल्यापासून ही बाबांसारखी दिसते हेच ऐकायची सवय होती. सगळं तिच्या बाबांसारखच घेतलेलं तिने. तसाच लांबट चेहरा, तरतरीत नाक, बोलके डोळे, दुधासारखा रंग सगळं तसच. आणि तिला ते आवडायचं. खूप खूप आवडायचं. बाबा तिला खूप छान वाटायचे आईसमोर. आई चांगली होती, पण बाबांसमोर सर्वसाधारण वाटायची. अगदी आजीही बऱ्याचदा म्हणायची सुमुखीला, बरं झालं माझ्या पोराचं तोंड घेतलंस ते. 
सुमुखीच्याही डोक्यात तेच बसलेलं बाबांसारखी आहे म्हणून मी इतकी छान आहे.
आई तिला आवडायची, नाही असं नाही. पण तरी सुमुखी एक अंतर ठेवूनच वागायची तिच्याशी. आई तर तिला किती जीव लावायची, पण कुणी काही मनात भरवल्यासारखं सुमुखी नेहमी तिच्यापासून लांब पळायची. तिच्या आजीच्या, बाबांच्या आईच्या डोक्यात सारखं असायचं, माझ्या पोरापुढं काही नाही ही. उच्चशिक्षित, उत्तम पगार घेणारी, म्हणून दिसण्याच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करून सून म्हणून आणली होती तिला. लग्नाच्या वेळी देखील सुमुखीच्या बाबांपेक्षा जास्त पगार होता तिला. नंतरही कायम तसच राहिलं. जेवढी दिसण्यात तफावत तेवढीच पगारातही होती.

सुमुखीचे बाबा खूष नव्हते लग्न करताना, पण आईने गळ घातली, म्हणून त्यांनी मान्य केलं.
नंतर मात्र सहवासाने त्यांनी सुमुखीच्या आईला अगदी मनापासून स्वीकारलं. 
पण तिची सासू मात्र उगीच दु:स्वास करू लागली. 
लग्न करून आणल्यावर तिचं रूप खटकायला लागलं. जे चांगलं होतं, पण त्यांच्या मुलाएवढं चांगलं नव्हतं म्हणून. तिच्या मैत्रिणी नातेवाईक बरेचदा बोलायचे ना, सून मुलाला साजेशी नाही.
त्यांना कुठे खरी गोम माहिती होती. सून तिच्या रुपाकडे नाही तर पगाराकडे बघून पसंत केली होती. हे स्पष्ट सांगायची त्याची हिम्मतही नव्हती सासुकडे. 

पुढे सुमुखीने तोंडावळा बाबांसारखा घेतल्याने तिच्यासमोर येता जाता तिच्या आईबद्दल उगाच काय काय बोलायची, काही गरज नसताना. त्यात आई नोकरीला म्हणून सुमुखी दिवसभर आजीच्या ताब्यातच. तिचा प्रभाव नाही म्हटलं तरी पडत होताच सुमुखीवर.
मोठी होता होता आजीचं मन तिच्यात उतरलं.
आणि आपली आई तिला परकी वाटायला लागली. भरपूर लाड करत असूनही. तिला अभिमान वाटायचा आपण बाबांसारखे दिसतो याचा. आईच्या छोट्या छोट्या गोष्टी तिलाही टोचायला लागल्या.
एवढी मोठी ऑफिसर असलेली आई तिला कधी वेंधळी वाटायची तर कधी उगीच काहीही कुठेही बोलणारी!!
लहानपणापासून सतत आईचे दुर्गुणच कानावर पडलेले तिच्या, तिची नजर तशीच बनली.

पुढे आई रिटायर व्हायच्या दोन वर्ष अगोदर सुमुखीचं लग्न झालं. चार वर्षात मुलगी. ती आल्यावर सुमुखीला मोकळं करायला म्हणून तिची आता मोकळी असलेली आई तिच्या घरी आली. सुमखी सहा महिन्यानंतर कामाला जाऊ लागली. घर आईवर सोडायची, पण मनात यायचंच कशी सांभाळत असेल देवजाणे. तिला कुठे सवय आहे? मला तर आजीनेच संभाळलं.
दिवसातून पाच सहा वेळा सूचना द्यायला फोन करायची ती. 
आई प्रत्येक कामात चोखच होती. लवकर उठून सुमुखीचा नाष्टा डबा सगळं तयार ठेवायची. तिच्या खाण्यापिण्याची हेळसांड नको हाच मुख्य हेतू असायचा.
सुमुखीच्या ऑफिसमधल्या मैत्रिणी म्हणायच्या तिला, ग्रेट यार, तुझी आई नाष्टा आणि डबा दोन्ही देते तुला. वरून मुलीलाही बघते. तिला तरीही ते तेवढं ग्रेट वाटायचं नाही. घरी तर आहे त्यात काय?
पण सवयीनं मन हळूच आजीशी तुलना करायला जायचं तर तिथेही सकाळी लवकर उठून स्वतःचा डबा आणि बाकीच्यांसाठी कुकर सोडून सर्व करताना आईच दिसायची. आजी फक्त वरचं बघत होती, आणि तिला संभाळत होती. मग कुठेतरी हळूच वाटायचं, आई खरंच का ग्रेट होती? 
मग आजी का.......?? जास्त खोलात नाही शिरायची सुमुखी.

अगदी पुढच्या दोन महिन्यातच आईने तिच्या घरचा सगळा ताबा घेऊन प्रत्येक गोष्ट न थकता, न कुरकुरता मॅनेज केली. आपल्या मुलीसाठी आतून येत होतं सगळं तिच्यात. बाबा होते, पण त्यांचं त्याचं स्वतःचं असायचं सगळं. ते रिटायर होऊन फक्त स्वतःला संभाळत होते. आणि आई रिटायर होऊन त्यांंच्यासहीत सुमुखीचा संसार संभाळत होती, तेही कुठल्याही अपेक्षेविरहीत.
सुमुखी काही दिवसात बिनधास्त झाली, आई मागे सगळं बघणारी होती म्हणून यशाच्या भराऱ्या मारू लागली. 
तरी आईचं तोंडभरून कौतुक केलं नाहीच तिनं कधी. जमलं नाही तिला......
पण मुलीला खूप लळा लागला आजीचा. आजी म्हणजे जीव की प्राण झाली तिच्यासाठी. अन् मोठी होता होता तिला प्रश्न पडू लागला, आपली आई तितकी मोकळी का नाही वागत आजीशी?
तिने तसं विचारलही आईला, सुमुखी म्हणाली, मला माझ्या आजीचा लळा होता. तिने संभाळलं मला, म्हणून आईपासून जरा दुरावले मी.

त्यावर दहा वर्षाच्या तिच्या मुलीने उत्तर दिलं, मग तर माझ्या आजीनेही मला संभाळलं, मलाही तिचा लळा आहे, पण मी नाही दुरावले तुझ्यापासून.

सुमुखीला कळायचं ते कळलं होतं, तरी पण मन धजावतच नव्हतं, आईपुढे मोकळं होता येतच नव्हतं. कितीही वाटलं तरी.......

पण दिवसेंदिवस ती तिची आईप्रती वागणूक जपायला लागली होती. तिला दवदव नको म्हणून, आई नको म्हणत असताना पूर्ण दिवस कामाला बाई ठेवली तिने.
आईला तिचा मोकळा वेळ मिळावा, आणि तो तिने हवा तसा घालवावा, असं वाटू लागलं तिला.

सगळं होत होतं नीट, पण नातं खुलत नव्हतं. तशी आतून खंत होतीच आईलाही, मोकळं झाल्यावर ती खंत आणखीच जाणवू लागली. नातं खुलवायचं दोघीनीही होतं, पण.......

खंतेने की कशाने कामातून मोकळं झाल्यावर आईची तब्बेत वरचेवर बिघडू लागली, आणि सुमुखी दुरूनच तिच्यासाठी अधिकाधिक हळवी होऊ लागली. हळवेपणा मनात होता, पण व्यक्त करता येत नव्हता. आई काही सुधारलीच नाही, सुमुखी तिचं करत होती, मायेने वागत होती, पण ते आईला कळण्याच्या बाहेर ती पोचली होती. आई तशीच गेली, सुमुखीपेक्षा तिची मुलगी जास्त कोसळली. तिने आजी जाण्याचा जास्त धसका घेतला. आणि तिला नीट करता करता सुमुखीला आपली आई कळली. जास्तच कळली. कारण तिची आजी गेली तेव्हा तिला एवढं काही जीवाला लागलं नव्हतं. वाईट वाटलेलं पण इतकं पराकोटीचं प्रेम तिला आजीकडून अनुभवायला मिळालं नव्हतं. 
जर माझ्या मुलीवर ती एवढा जीव लावू शकतो तर माझ्यावर किती लावला असेल, आणि मी काय दिलं तिला?
तिच्या मनाला खंत लागली. ती रडली खूप खूप रडली, आई गेल्यावर आईच्या फोटोकडे बघत रडून रडून होता होईल तेवढी मोकळी झाली.

अन् आता तिला आई परत आलेली जाणवत होतं, तिचं वय वाढत होतं तसं तिच्यात आई शिरायला लागली होती, बाबांसारखी दिसणारी ती आता तिच्या मुलीलाच नाही तर आईला ओळखणाऱ्या सर्वांनाच तिच्या आईची आठवण करून देत होती.

आता तिला ते सगळं मनापासून आवडायला लागलं होतं. तिच्या चेहऱ्यात, बोलण्याच्या शैलीत, वागण्यात डोकावणारी आई तिला सुखावून जात होती........
तिच्या अस्तित्वात तिच्या आईचं असणं, आणि ते सतत जाणवत राहणं, तिला क्षणभरही आईला  विसरू देत नव्हतं. तसंही आता तिला तेच गोड वाटत होतं. फार फार गोड वाटत होतं.......

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel