गावातलं घर.….....!!

दादा आम्हाला सर्वांनाच वाटतंय, हे आपलं वडिलोपार्जित घर आता पुन्हा नीट बांधावं. गावात सर्वच जणांनी जुनी तोडून नवी घरं बांधली आहेत. आपण इथे कोणी रहात नव्हतो म्हणून मनावर नाही घेतलं. पण आता फारच वाईट अवस्था झालीये घराची. वर्षातून दोनदा का होईना आपण जमतो ना इथे? त्यानिमित्ताने आपली मुलं एकत्र येतात. नाहीतर इतर वेळी आपण तीनही भाऊ वेगवेगळ्या दिशेला असतो. हे घर आहे म्हणून आपण ठरवून वेळ देतो तरी एकमेकांना, बालपण गेलंय आपलं इथे, त्यानिमित्ताने त्या आठवणी अनुभवायला मिळतात, मधल्या विकासने कल्पना मांडली.

धाकटा मनोज तत्परतेने म्हणाला, मला चालेल. माझ्याही मनात तेच होतं. नवीन बांधून घेऊ घर आपण. माझ्या पोरांना आवडतं गावात यायला. त्यानिमित्ताने आठ- दहा दिवस मजेत जातात. आई वडिलांच्या मागे आता आपणच टिकवून ठेवलं पाहिजे हे घर. कर्तव्य आहे आपलं.
काय म्हणतोस दादा तू?

मोठा श्रीधर विचारात पडला. तसं त्याचं स्वतःचं घर होतं, गावातल्या घरापासून दिड दोन तासांच्या अंतरावर. गावातलं घर अगदी छोट्या खेड्यात होतं. आणि त्याच घर नोकरीला सोयीस्कर म्हणून तिथून जवळच असणाऱ्या तालुक्याच्या गावात होतं. 
त्याला वाटत होतं, जिथे खराब झालाय तिथे डागडुजी करून घ्यावी, पूर्ण पाडून नवीन बांधायचं म्हणजे केवढा व्याप होईल. शिवाय हे दोघे राहतात तिकडे लांब मोठ्या शहरांत. घराचं सगळं माझ्यावर येऊन पडेल. माझी नोकरी चालू आहे अजून, मला एकट्याला झेपेल का फेऱ्या घालणं? कत्रांटदार ठेवला तरी त्याच्याकडे बघावं लागणारच.

श्रीधरला हे तितकंसं व्यवहारी वाटत नव्हतं, पण दोन भाऊ एवढे हौसेने बोलतायत, तर त्यांची बाजू कशाला खोडून काढा, म्हणून तो गप्प बसला आणि माझी हरकत नाही पण पैशाचं कसं करायचं? हे मात्र त्याने विचारलंच.
खर्च बराच होणार होता, विकासने आणि मनोजने आपण तिघांनी मिळून तो वाटून घेऊया असा एकमुखाने ठरवलं.

लगेच दुसऱ्या दिवशी श्रीधरने ओळखीच्या कंत्राटदाराला बोलवलं. त्याला नवीन घर कसं अपेक्षित आहे, हे सागितलं. कंत्राटदाराने सर्व ध्यानात घेऊन , रक्कम सांगितली. तिघा भावांनी घासाघीस करून थोडीफार कमी केली आणि त्याला पक्क करून टाकलं. दिवाळीच्या सुट्टीत जमलेले आता एकदम मे महिन्यातच भेटणार होते. त्यामुळे झालं तर आत्ताच म्हणून एका दमात त्याला  हो म्हणून टाकलं. अगदी काही मोठं नव्हतं बांधायचं, पण सर्व सोयींनी युक्त टुमदार हवं होतं. संपूर्ण खर्च नऊ लाखापर्यंत जाणार होता. तिघा भावांनी तीन तीन लाख काढायचे ठरवले. 

पुढच्या दहा दिवसांत काम सुरू करायलाही सांगितलं. विकास आणि मनोज चार दिवसात त्यांच्या घरी परतणार होते. श्रीधर जवळ म्हणून घरचं बांधकाम बघण्याची जबाबदारी त्याला वाटलं होतं तशीच त्याच्यावरच आली.
श्रीधरला जरी हे तितकं पटलं नव्हतं, तरी त्याची बायको आणि मुलं खूष झाली होती. त्याच्या बायकोने काही वर्ष त्या घरात सासुसासऱ्यांबरोबर काढली होती. तिच्या मनात ओलावा होता त्या घराबद्दल.

पुढच्या दहा दिवसांत ठरल्याप्रमाणे काम सुरू झालं, श्रीधरने स्वतःकडची कंत्राटदाराला पन्नास हजार रक्कम आगाऊ दिली. 

कंत्राटदार ओळखीचा आणि चटचट काम उरकण्यात वाकबगार होता. त्याने भराभर काम सुरू केलं. दोन्ही भाऊ शहरात त्यांच्या घरी पोचल्यावर काही रक्कम पाठवणं अपेक्षित होतं. पण तिकडे गेल्यावर आठ दिवस झाले तरी दोघांपैकी एकाचाही फोन आला नाही, म्हणून श्रीधरनेच त्यांना फोन करून काम कसं चालू आहे ते सागितलं. श्रीधरने एव्हाना आणखी लाखभर रुपये घालून झाले होते. फोनवरही पैशाचा विषय कोणी काढेना म्हणून संकोच सोडून श्रीधरच म्हणाला, पैसे पाठवले पाहिजेत तुम्हाला आता. दोन्ही भाऊ हो, हो, कामाच्या गडबडीत राहून गेलं म्हणाले. त्यांनी पैसे दोन दिवसात पाठवतो असं आश्वासन दिलं.
तरीही श्रीधरला धाकधूक वाटत होती. घाट तर घातलाय एवढा मोठा, कसं निभावलं जाणार काय माहीत? हे पैशाचे सबंध नको वाटतात मला.
आपल्याला नाही असं वागून चालत. व्यवहाराचे आणि शब्दाचे किती पक्के आपण!!
त्याच्या बायकोलाही श्रीधरकडे पाहून कसं होणार याची चिंता वाटलीच.

पण बोलल्याप्रमाणे दोन्ही भावांनी एक एक लाख रुपये ट्रान्सफर केले. श्रीधरच्या जीवात जीव आला. काम आणखी जोमाने सुरू झालं.
पुढे श्रीधरने स्वतःचे आणखी लाख पुढे केले. तसेही तीन लाख द्यायचे होते, आता काय अन् नंतर काय?
श्रीधरकडून आता पन्नास हजारच बाकी राहिले होते.
तो महिना गेला, काम चांगल सुरू होतच, मे महिन्यात शहरातल्या मंडळींची नवीन घरात यायचीच इच्छा होती.

लाख दिल्यावर पुन्हा विकास, मनोज शांत झाले, घराचं काम कुठवर आलंय हे विचारायला पण फोन  करावा वाटला नाही त्यांना. श्रीधरला आणि त्याच्या बायकोला हे फार खटकत होतं. त्यालाच सारखं फोन करून पैसे मागणं ही बरं वाटत नव्हतं. एकदा ठरलंय म्हटल्यावर दोघांकडून स्वतःहून हालचाल व्हायला पाहिजे होती. खरं तर हा घाट त्यांच्यासाठीच होता, त्यांची हौस म्हणून. श्रीधरचं घर होतच तालुक्यात, गावातल्या घरासारखच!!

चार पाच दिवस वाट बघून त्याने विकासाला फोन केला, तर विकास म्हणाला, माझे पैसे एका ठिकाणी अडकलेत, मी वाट बघतोय येण्याची. आले की देतो. श्रीधरला काय बोलावं कळेना?
कंत्राटदाराला हे सांगू शकतो का आपण?
तरी श्रीधरने आठवडा थांबवलच होतं. 
मनोजला फोन केला तर तो म्हणाला, दादा यावेळी जरा माझे पैसे तूच भर ना. मी तुला पुढच्या महिन्यात नक्की देतो.
श्रीधरला तर दडपणच आलं एकदम!!
दोन्ही भाऊ उत्तम कमावणारे असून, शहरात मोठं घर, गाड्या घेऊन हिंडणारे असून पैसे द्यायची टाळाटाळ करत होते. कारणं सांगून पुढे ढकलत होते.

एकट्या श्रीधरवरच भार पडल्यासारखं झालं होतं. त्याला त्याच्या सर्व ठेवी मोडव्या लागणार होत्या. त्याचही घर होतं, बायको पोरं होती. 
आणि काम थांबवून चालण्यासारखं नव्हतं, कंत्राटदाराचा खोळंबा होत होता. शिवाय गावचं घर बांधायला काढलंय ही बातमी अख्ख्या गावात पसरली होती. मधेच सोडून देणं म्हणजे त्याच्याबरोबरच आईवडिलांच्या नावाला धक्का पोचवल्यासारखं होतं.

त्याने आपल्या ठेवी मोडल्या काम सुरुच ठेवलं. विकासने दहा दिवसानंतर पन्नास हजार पाठवून दिले. श्रीधरला दिलासा मिळाला. त्याने आतापर्यंत स्वतःचे तीन लाख आणि भावांच्यातर्फे आणखी दोन लाख घातले होते. विकासाचे दीड आणि मनोजचे दोन लाख अजूनही बाकी होतेच.
दोन महिने झाले तरी मनोज पैशाचं नाव काढेना म्हणून पुन्हा श्रीधरने फोन केला, तर त्याने अनंत अडचणींचा पाढाच वाचला. आणि पुढचे पैसे देणं मला अजून चार महिने तरी शक्य होणार नाही, असं सांगून स्वतःचे हात वर केले. 

श्रीधरला ज्याची भीती होती तेच घडत होतं. तो जवळ म्हणून त्याच्या अंगावर सगळं येऊन पडलं होतं. अगदी घरावर देखरेख करण्यापासून ते पैसा उभा करण्यापर्यंत सगळंच. 

दिड लाख दिलेल्या विकासने पुढचे आणखी पन्नास हजार श्रीधरने चार फोन केल्यावर एकदाचे पाठवले. आणि श्रीधरने पैशासाठी चार वेळा फोन केला, मी काय कुठे पळून जाणार होतो का, असं म्हणून पुढच्या पैशासाठी सावकारासारखा तगादा लावू नका. मी पाठवेन जमेल तसे असं म्हणून फोन खट् करून ठेऊन दिला.

श्रीधरच्या मनाला खूप लागलं. त्याला वाटलं, मी त्याचवेळी भीड सोडून ठाम नकार दिला असता तर किती बरं झालं असत. गावतलं घर असं खितपत पडलं नसतं. असो, आता जे काय होईल ते होईल, मी कुणाकडेही हात न पसरता, ते पूर्ण करणार. त्या दोघांना वाटलं तर पाठवतील पैसे, नाहीतर राहतील तसेच. मी माझं कर्तव्य पूर्ण करणार. त्यांच्यासारखा हात झटकणं मला जमणार नाही. कंत्राटदाराला पैशाअभावी काम थांबव, म्हणता येणार नाही.
श्रीधरला स्वतःचे तीन लाख घालून वर विकासाचे एक लाख आणि मनोजचे दोन लाख टाकावे लागले.

नवऱ्याची अडचण लक्षात घेऊन श्रीधरच्या बायकोनेही त्याला आपले दागिने पुढे केले. 
दोन्ही भावांनी पुढचे दोन महिने फोनही केला नाही. श्रीधरनेच जिद्दीने एकदा सुरू केलय तर थांबायचं नाही, म्हणत घर पूर्णतेला नेलं.
 
गावातली लोकं म्हणू लागली आईबापाच्या पाठी तिन्ही पोरांनी घर उभं केलं. श्रीधर ऐकून घेत होता, एका शब्दाने त्याने कुणाला काही सागितलं नाही.

सहा महिने झाले होते, एकाही भावाचा पैशासाठी सोडा, साधा खुशालीसाठीही फोन आला नव्हता. आता वास्तुशांत करायची म्हणून श्रीधरनेच कार्ड पाठवून दिलं, अनायसे मे महिनाही आला होताच.
पण तो असूनही, कामाअभावी यावेळी यायला जमणार नाही असा मेसेज दोघांकडूनही आला. 

श्रीधर काय समजायचं ते समजला. 
ज्यांच्या हौसेसाठी घर बांधलं, त्यांनाच ते जड झालं. आणि ज्याला त्याची गरज नव्हती, त्याने ते तरीही पेलून धरलं. 
गावातलं घर नवीन रूप लेवून उभं तर राहिलं, पण पूर्वीसारखं माणसांनी भरलं नाहीच कधी, एक मिळावं तर एक सुटावं, हे दुःख त्यालाही पचवावं लागलंच.........!!


©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel