मराठी कथा
स्त्रीवादी
तिलाही व्यवहार कळतो........!!
शनिवार, १२ डिसेंबर, २०२०
पेपरमधली जागा विकण्याची जाहिरात पाहून केतकी एकटीच, तिच्या नवऱ्याला यायला जमणार नव्हतं, म्हणून ती जागा बघायला गेली.
दार उघडलं साधारण सत्तरीच्या आजीबाईंनी. केतकीने जागा बघायला आलीये हे सांगितल्यावर, आजींनी पहिला प्रश्न केला, तुम्ही एकट्याच? तुमचे मिस्टर नाही का आले बरोबर?
नाही त्यांना जमलं नाही, केतकीने उत्तर दिलं.
अहो घेऊन यायचं की, शेवटी ठरवणार तेच ना?, आजीबाई थोड्या नाराजीतच बोलल्या.
नाही हो असं काही नाही. माझीच पसंती महत्वाची आहे. मला आवडलं तर त्यांनाही आवडेल, केतकीच्या बोलण्यातून आत्मविश्वास ओसंडत होता. पण तो आजीबाईंना मात्र जाणवत नव्हता. त्या म्हणाल्याच पुढे तरीही, नाही पण पैसे देणारे तेच असतात ना?
नाही हो हल्ली दोघं मिळून घर घेतात. बाईही कमावती असतेच की!!, केतकीला आता खरंतर राग येत होता.
ते आहेच, पण तरी आणलं असतं तर बरं झालं असतं, आजीबाईंचा जीव तिच्या न आलेल्या नवऱ्यातच अडकला होता.
केतकीने पुढे जास्त काही न बोलता घर बघून घेतलं. आणि नंतर कळवते म्हणून तिथून निघून आली.
पण तिच्या मनाला आजीबाईंंच्या बोलण्याने अस्वस्थ केलंच तरीही. स्त्रीनेच स्त्रीकडे अविश्वासाने बघावं? कधी बदलणार हे?
सगळीकडे बाईबरोबर पुरुष कशाला हवा? नसेल एखाद्या बाईंकडे पुरुष तर तिने कुठले व्यवहार करूच नयेत का?
ती देखील महत्वाचे निर्णय घेऊ शकते, ती ही तोडीस तोड सर्व करू शकते यावर लोकांचा पूर्ण विश्वास नेमका कधी बसणार?
विचार करता करताच असाच दोन महिन्यापूर्वी आलेला अनुभवही आठवला लगेच तिला.
पलंग बनवून घ्यायचा म्हणून तिने सुताराला फोन केला, तर तो म्हणाला, तुमचे साहेब घरी कधी असतील तेव्हा येतो.
त्यावर तिने का? असं विचारल्यावर तो म्हणाला, म्हणजे हेलपाटा नको ना. पैशाचंही बोलून घेता येईल.
ते ऐकताच केतकीने त्याला ठणकावून सागितलं,
आमच्या घरी पैशाचं मीच बघते, या तुम्ही केव्हाही.
खरंच होतं ते, केतकीच्या नवऱ्याला पैशाचं कोणाशी नीट बोलताच यायचं नाही. केतकी मात्र योग्य भाव करण्यात, पैशाचा हिशोब चोख ठेवण्यात, एकंदर सर्व व्यवहारात पटाईत होती, म्हणून तिच्या नवऱ्याने सगळं केतकीवरच सोपवलं होतं.
केतकीला नाही पण कुठलाही व्यवहार करायचा म्हटलं, की समोरच्या माणसाला तिचा नवरा लागायचाच. एखादी बाई व्यवहाराच्या गोष्टी बोलू शकते हे पचायला जड का जावं लोकांना प्रश्न तिला तसा नेहमीच पडायचा.
पण जड बाहेरच नव्हतं, तर अगदी घरातही तसंच होतं. त्याचाही अनुभव अगदी अलीकडेच तिने घेतला होता.
पंधरा दिवसांपूर्वी थोडं लांब राहणारे सासरे असेच नवऱ्याकडं काही काम होतं म्हणून आले होते. त्याला यायला उशीर होत होता म्हणून त्यांची होणारी चलबिचल पाहून केतकीने विचारलं, काही महत्वाचं काम होतं का?
तर पहिल्यांदा ते नाही असंच म्हणाले.
पण त्याला होणाऱ्या उशिराने यांची अस्वस्थता जास्तच वाढतीये हे बघून केतकीने पुन्हा विचारलं, मला सांगा काही असेल तर.
त्यावर ते म्हणाले, मला दोन- तीन बिलं भरायची होती ऑनलाईन आणि तो डिमॅट अकाऊंट सुरू करून देणार होता.
केतकी म्हणाली, ते मी देखील करून देऊ शकते, मला येतं सगळं!!
पण ते म्हणाले, नको येईल तो एवढ्यात. करेल आल्यावर, थांबतो मी.
केतकीला वाईट वाटलं आणि ती गप्प बसली.
तेवढ्यात तिच्या नवऱ्याचा फोन आला, आणि त्याने यायला आणखी तासभर लागेल म्हणून सागितलं. त्यानंतर सासरे मग राहू दे उद्या येतो मी, म्हणत जाऊ लागले.
तेव्हा हिने पुन्हा विचारलं, मी देऊ का करून?
प्रॉब्लेम नाही ना होणार काही? असं म्हणत त्यांनी फोन पुढे केला, तिने त्यांना हवं ते सगळं करून दिलं, अगदी डिमॅट अकाऊंटही ओपन करून दिलं.
पण तरी तिच्या सासऱ्यांंच्या चेहऱ्यावर, हिने केलं असेल का सगळं बरोबर? हा भाव होताच.
त्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन स्वतःच्या मुलाकडनं खात्री करून घेतली तेव्हा कुठे त्यांचं मन शांत झालं. खूप दुखावली केतकी.
ती माझ्यापेक्षा एक्सपर्ट आहे हो, हे नवरा त्यांना म्हणाला, एवढंच काय ते समाधान वाटलं तिला.
स्वतःच घेतलेले सगळे अनुभव आजीबाईच्या निमित्ताने एकामागोमाग डोळ्यासमोर आले. अन् तिला वाटलं, अजून नक्की काय करावं लागेल स्त्रियांना म्हणजे लोकांचा चटकन विश्वास बसेल त्यांच्या हुशारीवर?
कित्येक स्त्रियांनी एवढं कर्तृत्व गाजवून देखील, पुरुषांनाच त्यांच्यापेक्षा जास्त कळतं, ह्या गैरसमजात रहायला मुद्दाम आवडत असावं का काहीजणांना?
इतरांंचं जाऊ द्या, पण किमान स्त्रियांनी तरी 'मला त्यातलं काही कळत नाही' हे बोलणं सोडून द्यावं, आणि एखाद्या पुढे सरसावणाऱ्या एकट्या बाईकडे विश्वासाने बघावं, असं मात्र अगदी मनापासून वाटलं केतकीला.......
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article