सोन्याचं पेन.......!!

बाबा द्या ना हो तुमचं ते सोन्याचं पेन मला, उद्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आहे माझ्या शाळेत......

नाही हं, पाडशील, हरवशील कुठेतरी. एवढ्याश्या मुलीला कशाला हवीयेत असली पेनं?

बाबा एक दिवसासाठी फक्त, मला केव्हापासून वापरून बघायचं होतं तुमचं ते पेन. मी एवढीशी कुठेय? सहावीत गेले की हो आता!! द्या ना, द्या ना, द्या ना.......
मी अगदी अगदी नीट वापरेन!!

बरं एकदाच हं, पुन्हा देणार नाही. माझं खूप खूप आवडतं पेन आहे हे.....

इतके दिवस बाबांच्या खिशात पाहिलेलं पेन हातात आल्यावर बबलीला केवढा आनंद झाला होता. किरमिजी रंगाच्या त्या पेनाला सोनेरी टोपण होतं. खरं तर ते टोपणच आकर्षणबिंदू होतं, बबलीसाठी. ते पेन हातात आलं तसं तिने पहिले त्या पेनाच्या टोपणावरून चार पाच वेळा नुसताच हात फिरवला. चकाकणारं सगळं सोनचं वाटायचं तिला त्यावेळी!! ते पेन हातात आल्यावर एखादी मौल्यवान वस्तू मिळाल्यासारखं वाटलेलं तिला!!

बाबांनी तिला त्यात शाई भरून दिली, आणि तिने स्पर्धेची तयारी करण्यासाठी धड्यातला एक उतारा लिहून काढला. 
पहिल्या दोन- चार ओळी पेनाची सवय नसल्याने फारशा चांगल्या आल्या नाहीत, पण नंतर मात्र पकड बसली. नेहमीच्या पेनापेक्षा बारीकशी निब होती त्याला, पटापट लिहिलं तर तुटेल की काय याचीच जास्त भीती वाटत होती तिला.
सराव करून झाल्यावर तिने ते पेन अगदी नीट कंपासात ठेवलं. तिच्या लहान भावाने बघायला मागितलं तर, मोठ्यांचं असतं आपण हात लावायचा नाही, असं सांगून गप केलं तिनं.
पेन मिळल्यापासून बबली तर अगदी हवेतच तरंगत होती. 
मोठी जबाबदारी अंगावर असल्यासारखंही वाटत होतं तिला. उद्या शाळेत जाऊन फक्त स्पर्धेसाठी ते पेन वापरायचं आणि मग ठेऊन द्यायचं हा विचार झोपतानाच पक्का केला तिनं.

शाळेत गेल्यावर प्रत्येकवेळी कंपासपेटी उघडताना ती त्या पेनकडे डोळे भरून पहात होती. बाबांना खूप आवडणारं ते पेन आपल्या कंपासपेटीत आहे, याचं फारच अप्रूप वाटत होतं तिला. 
खरंतर मैत्रिणींना ते दाखवावसंही फार वाटत होतं तिला, पण भीतीही होती की चुकून कुणी हातात घेतलं आणि खाली पडलं, त्याला काही झालं तर बाबा कित्ती रागावतील मला!!
पण ती स्वतःच इतक्या वेळा कंपासपेटी उघडून बघत होती की आजुबाजूच्या चिमण्यांना कळलंच, तिच्या कंपासपेटीत काहीतरी खास आहे म्हणून. मधल्या सुट्टीत तिच्यापाशी येऊन दाखव ना दाखव ना करत मागे लागल्याच त्या. तिने तसं बरेचदा नाही नाही केलं, पण शेवटी मनात हौस तिच्याही होती. मग तिनेही नुसतं लांबून बघायचं बरं का सगळ्यांनी असं म्हणून कंपासपेटी उघडून ते पेन दाखवलं.
एक तर ओरडलीच एकदम, अय्या सोन्याचं पेन? शाळेत का आणलं? तुझं नाव सांगणार आता मी बाईंना!!
तशी दुसरी म्हणाली, ए सोन्याचं नाईय्ये काही. नुसतं पाणी लावलय त्याचं. माझ्या काकांकडे पण आहे अगदी सेम टू सेम. मला नाही हात लावू देत ते त्याला. तुला कसं मिळालं ग? तू चोरून आणलं?

माझ्या बाबांनी दिलंय मला, हस्ताक्षर स्पर्धेसाठी खास, असं म्हणत बबलीने पट्दिशी कंपासपेटी बंद करून आत ठेवली. 
जास्तच करतीये ही, पेन मिळालाय तर, बबलीच्या मैत्रिणी जरासुद्धा हात लावून नाही दिला पेनाला, म्हणून आपापसात बोलत बसल्या.

शेवटच्या तासाला हस्ताक्षर स्पर्धा सुरू झाली. बबली किती वेळापासून वाट पाहत होती त्याची.
तिने हळूच पेन काढला, बाईंनी उतारा सांगितला. तिने तो लिहायला घेतला,तर पेन चालेचना. तिची नेहमीची शाईची पेनं चालली नाही तर थोडी शाई बाजूला शिंपडली की चालू व्हायची. तिने तसं केलं, तरी पेन सुरू होईना. वेळ जात होता. पण तिला लिहायचं त्यानेच होतं. म्हणून ती जोरात शिंपडायला गेली, तर पेन हातातून सटकून लांब उडालं. नेमकं बाईंंच्या जवळ!! त्यांना लागता लागता राहीलं. सगळा वर्ग हसायला लागला. बाईही खूप रागावल्या, जप्तच करत होत्या पेन. उद्या घरच्यांना घेऊन ये मग देईन, अशा म्हणाल्या तेव्हा तर बाबलीला रडूच फुटलं. सगळा वर्ग हसत होता आणि बबली एकटी रडत होती. तिच्या त्या पेनाला हात लावून न दिलेल्या मैत्रिणींना तर वाटलं तसच पाहिजे हिला. चांगली शिक्षा मिळाली.

नेहमीच्या शाईच्या पेनाने बबलीने रडत रडतच स्पर्धा पूर्ण केली. मग शाळा सुटल्याची घंटा झाल्यावर बाईंनी तिला जवळ बोलवून पेन परत केलं. आणि पुन्हा असलं पेन शाळेत आणायचं नाही हे ही बजावलं. पेन हातात घेवून ती टोपण लावायला गेली तर तिला त्याची निब तुटलेली दिसली. तिची छाती भीतीने धडधडायला लागली. आणि ती परत रडायला लागली.

घरी बरोबर जाणाऱ्या मैत्रिणी होत्याच थांबलेल्या बाजूला, त्यांनीही तिला घाबरवायला सुरुवात केली, आता तुला बाबा चोप देणार!! 

बबलीला घरी जावसच वाटत नव्हतं, पण इलाजही नव्हता दुसरा काही. 
गेली तेव्हापासूनच चुपचाप बसली होती ती, आईला वाटलं. भांडली असेल कुणाशी शाळेत. होईल संध्याकाळपर्यंत नीट.

संध्याकाळ झाली तशी बबलीला खूपच भीती वाटायला लागली. आज बाबा उशिरा यावे, मी झोपल्यावर असंच वाटत होतं तिला, पण झालं उलटंच बाबा नेहमीपेक्षाही लवकर आले.
बबली त्यांच्यासमोर जायचं टाळतच होती.
पण एकाच घरात टाळणार तरी किती?
बाबाचं चहापाणी झाल्यावर मात्र कोपऱ्यात बसलेल्या तिला विचारलच, काय बबली, कशी झाली तुझी स्पर्धा? आलं का नाही मोत्यासारखं अक्षर? पेन चाललं ना ग नीट?

ते ऐकून बबली मोठ्याने रडायलाच लागली. त्याने बाबाच घाबरून तिच्या जवळ गेले आणि म्हणाले, अगं काय झालं गळा काढून रडायला?

बाबा मी तुमचं सोन्याचं पेन मोडलं हो!! चालत नव्हतं म्हणून मी शाई शिंपडायला गेले तर हातातून लांबच उडालं. 

बघू घेऊन ये पाहू, बाबा म्हणाले तसं तिनं कंपासपेटीत ठेवलेलं पेन आणून त्यांना दाखवलं.
तिच्या बाबांनी टोपण उघडलं, आणि म्हणाले, अगं कुठं मोडलस? निब तुटलीये फक्त याची. मी आणेन उद्या दुसरी बसवून. एवढी कशाला ग घाबरली तू?

बबली डोळे पुसत म्हणली, बाबा तुम्ही मला मारणार नाही ना मग?

बबले, मी तुला हात तरी लावलाय का ग कधी? पेनाला काही झाल्याचं नाही, तू हे बोलल्याने जास्त वाईट वाटलंय मला. का वाटलं तुला असं? 

माझ्या मैत्रिणी म्हणाल्या, तुला बाबा खूप मारणार आता!!

पण तू ओळखतेस ना मला? त्या कुठे ओळखतात?
मी कधी तुम्हा पोरांना मारलय का आजपर्यंत. मला नाही आवडत ते. पुन्हा नको हा असा विचार करू, आणि घाबरू तर मुळीच नको कशाला!!

दिवसभराचं दडपण बाबांनी एका क्षणात दूर केल्यावर बबलीला जे वाटलं, ते शब्दात व्यक्त करता येण्यासारखं नव्हतंच......मारणं तर दूर तिचे बाबा ओरडलेही नव्हते तिला!!  
ती कधीच नाही विसरली तो प्रसंग......

म्हणून तर अगदी आताही बबलीच्या डोळ्यासमोर पुन्हा सगळं जिवंत झालं. आता तिचे आई बाबा तिच्याकडेच रहायला होते कायमसाठी. भाऊ परदेशी होता, आणि तिथे त्यांना रमत नव्हतं म्हणून.

आता वार्धक्याने तिच्या बाबांच्या हाताला कंप सुटू लागला होता. आणि त्यामुळेच घरातून फिरताना टेबलावर ठेवलेला तिचा महागडा मोबाईल, त्यांचा चुकून धक्का लागून थोड्या वेळापूर्वी खाली पडला, तर तिच्याही नकळत ती व्हसकन्
ओरडली त्याच्या अंगावर!!
चूकून झालं गं, म्हणत खजिल होऊन तिचे बाबा बेडवर जाऊन पडले.

आणि भानावर आल्यावर आपण असं वागायला नको होतं हा विचार करता करताच तिच्या डोळ्यासमोर सोन्याच्या पेनाचा तो प्रसंग जस्साच्या तसा उभा राहिला. 

तशीच रडत रडत ती बाबांजवळ गेली, बाबा उठून बसले आणि त्यांनी विचारलं, फुटला का ग मोबाईल. चुकून झालं ग माझ्याकडून.
तिने रडतच त्यांंच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि म्हणाली, बाबा चूक तर माझ्याकडूनच झाली हो. मोबाईलपेक्षा खूप महत्वाचे आहात तुम्ही मला. माझाच तोल सुटला बाबा. मला माफ करा....

बाबांनासुद्धा गहिवरून आलं, मूकपणे थरथरता हात तिच्या डोक्यावरून फिरवत बसले तेही, आपल्या लाडक्या मुलीचं पश्चातापाचं रडणं आवरेपर्यंत..........!!

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel