मराठी कथा
विनोदी
मोहमाया........!!
गुरुवार, १० डिसेंबर, २०२०
अंतराने सकाळी उठून आपल्या नवऱ्याचा आरुषचा काही स्टेटस् दिसतोय का पाहिलं. काहीच टाकलेलं नव्हतं, म्हणून मन जरा खट्टू झालं, तरी ती उठून पुढच्या कामाला लागली.
तसं नीट लक्ष लागतच नव्हतं तिचं कशात.
थोड्या वेळाने तिने बेडरूममध्ये डोकावलं, तर नुकताच उठलेला आरुष मोबाईल हातात घेऊन काहीतरी करताना दिसला.
ते पाहून तिचं मन आनंदलं. तिने मस्तपैकी त्याच्यासाठी कॉफी तयार केली. त्यानंतर न राहवून पुन्हा त्याच्या स्टेटसचा स्टेटस् बघितला. छे, अजूनही नाहीच, बघून तर डोकच फिरलं तिचं. ह्याच्या तर आता......म्हणत दात ओठ खात तिने पुन्हा फोन जागेवर ठेऊन दिला.
तेवढ्यात आरुषही फ्रेश होऊन आला, तसा तिने त्याला वाफाळत्या कॉफीचा मग हातात दिला. तो घेताना आरुषने तिच्याकडे गोड हसून पाहिलं.
पण अंतराने मात्र त्याच्याकडे मारक्या म्हशीसारखं रोखून बघितलं.
आरुषच्या पोटात भीतीने कालवाकालव झाली, अचानक बयेला काय झालं असावं असा विचार करून तो म्हणाला, काय ग काही चुकलं का माझं?
अंतरालाही मनातली सल बोलून दाखवायची होतीच केव्हापासून, जराही वेळ न दवडता ती सुरूच झाली एकदम.
तुला आठवतं, बरोब्बर चार महिन्यांपूर्वी वाढदिवस होता तुझा?
हो आठवत की!! त्याचं काय आता ? तुला ना कधीही काहीही आठवतं, आरुषने तिला उडवूनच लावलं.
आणि तुला ना कधीही काहीही कळतच नाही. अंतराने एकदम आपला आवाज चढवला.
आरुष गांगरला, झटकन कॉफीचा मग खाली ठेवला आणि तिच्यापुढे हात जोडून म्हणाला, नाही कळत बाई मला. असं बायकांचं मन जाणता आलं असतं तर सगळे संसार आनंदाच्या डोहात तरंगले नसते का? डोकं कशाला बडवून घ्यावं लागलं असतं कुणाला?
आज माsझा वाढदिवस आहे आरुष!!
हो माहिती आहे की मला!! म्हणून तर सुट्टी घेऊन तुझ्या पुढ्यात बसलोय ना खास!!, आरुषने बोलता बोलता एक उडती पप्पीही पाठवून दिली अंतराला.
अंतराने मात्र, काही नको ठेव तुलाच करत तोंड वेंगाडलं. आणि म्हणाली, तुला आठवतं, मी तुझ्या वाढदिवसाला तुझे छान छान फोटो स्टेटसवर लावून किती सुंदर शुभेच्छा दिलेल्या तुला!!
हो चांगलं होतं की ते, गाणं पण लावलेलस ना बॅकग्राऊंडला. तुम दिलकी धडकन मे रहते हो, रहते हो......
प्रत्यक्षात मात्र मला बघून शिव्या घालतेस हा फक्त, अशी गाणी म्हणत प्रेमाचा वर्षाव करताना तर तुला पाहिलच नाही आतापर्यंत, आरुष बोलता बोलताच हसायला लागला.
अंतराचा राग जास्तच वाढला, ती झटकन उभी राहिली आणि दोन्ही हात कंबरेवर ठेऊन मोठ्याने म्हणाली, मग तुला नाही वाटलं माझ्यासाठीही असं काही करावं?
अsरे बापरेss!! अस्स् आहे होय सगळं? किती गोल गोल घुमवलस ग मला?, आरुषने कपाळावर हात मारून घेतला.
सांग ना, का नाही केलस माझ्यासाठी असं काही?,
दुःखाचा कडेलोट होऊन अंतराच्या डोळ्यातून टप टप पाणी गळायला लागलं.
तसा आरुष उठून तिच्याजवळ गेला, आणि तिला समजावत म्हणाला, तू मला बघितलस का कधी कुठलाही स्टेटस ठेवताना आजपर्यंत? मी नाही तसं काही करत. तुझं वेगळं माझं वेगळं, मी तुझ्यासारखंच वागावं अशी सक्ती का?
जा तिकडं काही बोलू नको माझ्याशी, म्हणत अंतराने त्याला त्याच्या जागेवर ढकलून दिलं.
अगं, तू इथे माझ्या बाजूलाच!! मग स्टेटस् वर कशाला शुभेच्छा द्यायच्या तुला? आणि रात्री बारा वाजता मीच तर सर्वात पहिल्या दिल्या नाही का? म्हणशील तर आताही दिवसभर समोर आलीस की सारख्या देत राहतो बस्स्!!, असं म्हणतच आरुषने प्रेमाने तिला जवळ ओढलं.
चल हो बाजूला, रागाचा फणकारा येऊन अंतरा उठली, लांब जाऊन बसली आणि गाल फुगवून म्हणाली, तो स्टेटस् बघून माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधल्या झाडून सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या तुला!! सर्वांना कळलेलं तुझा वाढदिवस आहे म्हणून!!
सांग तुझ्या लिस्टमधल्या एकाला तरी कळलं का माझ्या वाढदिवसाचं?
अरे ज्यांना तू ओळखत नाहीस, जे तुला ओळखत नाहीत, त्यांच्या शुभेच्छा घेऊन तुला करायचंय तरी काय? आणि माझ्या बायकोचा वाढदिवस आहे हे कशाला कळलं पाहिजे सर्वांना बरं? काहीही असतं हा तुझं, आरुषला तिचा फणकारा समजेचना!!
हो हो, आम्ही बायकांनी मात्र तुमच्या वाढदिवसाला जिकडे तिकडे ढिंडोरा पिटवून धो धो प्रेम ओतू घालवायचं, अन् तुमच्याकडे मात्र बाराही महिने प्रेमाचा कोरडा दुष्काळच!!
ठेवला असतास स्टेटस् तर किती छान वाटलं असतं माहितीये मला!!
असं का बोलतेस ग? तुझ्या आवडत्या रंगाचा ड्रेस तुला गिफ्ट केला, दिवसभर तुझे लाड करायला सुट्टी घेतलीये. आपल्या जवळच्या माणसांना बोलावून संध्याकाळी तुझ्यासाठी खास कौतुक सोहळा आयोजित केलाय, ते सर्व छान वाटण्यासारखं नाहीये का?
आता काय आमच्या प्रेमाचं मोजमाप स्टेट्सवरून लावत बसणार का तुम्ही बायका?
नाही जमत मला असं काही करायला आणि आवडतही नाही. जे जमतं जे मनापासून वाटतं ते करतोय ना पण?
काय तुमच्या मनात येईल, आणि काय एकेक खूळं डोक्यात भरून घ्याल ना, तो देवच जाणे बाबा!! असं म्हणत आरुष तिथून नाराजीने उठला आणि गॅलरीत जाऊन बाहेर बघत उभा राहिला.
तशी शहाणी होती अंतरा, तिला आरुषचं पटलं. मी केलं म्हणून तू ही कर, हा अट्टाहास चुकीचाच, हे तिलाही कळलं. एका स्टेट्सच्या आहारी जाऊन, आरुषचं मन दुखावलं याचं वाईट वाटून अंतराही त्याच्या मागोमाग गॅलरीत गेली. आणि त्याला कान पकडून सॉरी म्हणाली.
आरुषही लगेच पाघळला आणि फोन घेत म्हणाला, मला पटत नाही खरं, पण तुझ्या खुषीसाठी ठेवतो आता स्टेटस्.
मारून मुटकून काही नको, त्यापेक्षा उद्याही दांडी मार आणि कुठंतरी लांब फिरायला घेऊन जा,असं म्हणत अंतराने डोळे मिचकावले.
हे बरंय, एकीकडे हवं ते सगळं नवऱ्याकडून करून घ्यायचं अन् वर स्टेटसमधून इतरांना प्रेम नाही दाखवलं, म्हणून फुगून बसायचं, आरुषने टोला हाणलाच.
सॉरी बोलले ना आता, असं म्हणत अंतराने प्रेमाने त्याचा हात हातात घेतला, आणि घरातला त्यांचा स्टेटस् रुसव्या-फुगव्यावरून क्षणात गुलुगुलुत बदलून गेला.......
हे मला सुचलं कारण एका ग्रुपवर कोणी विचारलं होतं, आपण बायका स्टेटस् ठेवतो, नवऱ्यांच्या वाढदिवसाचे, तसे नवरे का नाही ठेवत बरं??
त्यांना का असं कौतुक नसतं आपल्या बायकांचं?
मग ते मलाही शोधावं वाटलं, आणि ही गोष्ट तयार झाली.😆
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article