मराठी कथा
सामाजिक
स्त्रीवादी
मापदंड.......!!
मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०
अगं असा तडकाफडकी राजीनामा का देऊन टाकलास पोरी; जरा विचार तरी करायचा ना?, दिशाची आई काळजीच्या सुरात म्हणाली.
ऐकत नाहीत तर काय करावं मग मी? ते काहीही कसेही वागतील ते सहन करत बसायचं का? एवढं नाही अडलं माझं काही!!
अगं मी सर्वार्थाने वरच्या पोस्टसाठी लायक असताना मला डावलून माझ्यामागून आलेल्या सहकाऱ्याला वरची जागा आणि पगारातही चांगलीच वाढ मिळालीये. दिशाला हे बोलतानाही नुसता राग उफाळून येत होता.
असंच असतं अगं, जिकडे तिकडे सगळीकडे तेच!!, माझ्याबाबतही हेच झालं होतं. वर्षाच्या सुरुवातीचे चार महिने तुझ्या बाळंतपणात मी रजा घेतली, आणि नंतर मान मोडून, जीव तोडून काम केलं, तरी त्या वर्षी बढतीसाठी माझा विचारच केला गेला नाही. खूप वाद घातला मीही पण नाही ऐकलं कोणी. खूप वाईट वाटलेलं मलाही. हे सगळ्याच बायकांना झेलावं लागतं ग, आई दिशाला समजावत म्हणाली खरी, पण तिलाही हे दिशाबरोबर इतक्या लवकर होणं अपेक्षित नव्हतं.
आई, मी देखील विचारायला गेले माझ्या बॉसला, तर मला काय उत्तर दिलं माहितीये?
म्हणे आता तुझं लग्न ठरलंय. एकदा ते झालं ना की मुलींची कामातली आस्था कमी होते. सारख्या दांड्या सुरू होतात. उशिरा येणं सुरू होतं. चार महिने तर तुम्ही हवेतच असता. नंतर बाळंतपण आहेच ठरलेलं. मग काय अडकल्याच तुम्ही!!
बढती द्यायला तुम्हाला ती पेलली तर पाहिजे ना?
त्यांचा अनुभव बोलत असेल त्यांच्या तोंडातून, काही अंशी खरं आहेच त्यांचं, मुलींचा प्राधान्यक्रम बदलतो अगं लग्न झाल्यावर. आपल्या आईनेही त्यांची बाजू घ्यावी, ते पाहून दिशा रागाने उसळून म्हणाली, आई पण हे असं खात्रीने माझ्या बाबतीतही होणार, असा तर्क काढणारे हे कोण?
मागच्या कुणी केलं असं म्हणून पुढच्या सर्वांंसाठी डोळयांंवर मुद्दाम झापडं ओढून तेच मापदंड लावणं कितपत योग्य?
मी त्यांना म्हटलही लग्नानंतर किमान पाच वर्ष मी फक्त करिअरचाच विचार करणार आहे. तसं आमचं ठरलंही आहे.
पण नाही, त्यांचा त्यावर विश्वासच नाही. आणि ज्या सहकाऱ्याला त्यांनी बढती दिलीये ना, लग्न त्याचंही ठरलंय आई!!
मग माझ्या लग्नाचच एवढं भांडवल कशाला?
मला माझं काम चोख बजावूनही भांडावं लागतंय, स्पष्टीकरण द्यावं लागतंय कारण मी स्त्री आहे म्हणून. नंतर मी जबाबदाऱ्यांमध्ये अडकणार असं समोरचा गृहीतच धरतोय म्हणून. मी वेगळी असू शकते की!! किंवा मी भविष्यात ऑफिस आणि घर यांचा समतोल साधणारीही होऊ शकते की?
आणि विशेष म्हणजे माझ्या मागून आलेल्या त्या सहकाऱ्याला मात्र कोणी कसलाही जाब विचारत नाहीये. म्हणजे बघ ना, लग्न होताना दोघांचं होणार असतं. पण त्यात अडकणार मात्र एकच आणि तीही स्त्रीच, असंच पहिल्यापासूनच गृहीत धरलं जातं, हे कधी बदलणारच नाही का? का कुणाला मुद्दाम बदलायचंच नाही ते?
माझं तर लग्न झालंही नाही अजून, नुसतं ठरलंय. तरी सर्वांनी सोयीचे आराखडे बांधले माझ्याबाबत, आणि दिलं नेहमीच्या प्रवाहात ढकलून मलाही!!
मग दिला मी ही राजीनामा, जिथं मला काही कारण नसताना कमी लेखल जातंय, फक्त स्त्री म्हणून माझा पाय मागे खेचला जातोय, तिथं का राहू मी?
बरं, तुला योग्य वाटतय ना? पण आता काय करायचं ठरवलयस तू?, आईला पुढची चिंता लागलीच.
आई, माझा विश्वास आहे स्वतःवर, उच्चशिक्षित आहे मी. मला माझ्या विषयाची सखोल माहितीही आहे. अनुभव म्हणालीस तर तोही भरपूर आहे. माझ्याकडे केवळ एक स्त्री म्हणून न बघता, माझ्यातल्या गुणांची पारख करून, माझी योग्य दखल घेतली जाईल, अशा ठिकाणीच मी काम करणार!!
आणि नाही मिळालं असं ठिकाण तर माझ्यासाठी माझा मार्ग मी तयार करणार, पण चुकूनही जिथे स्त्रीला फक्त स्त्री म्हणून मागे ओढलं जातं, अशा ठिकाणी मन मारून काम करणार नाही आता कधी!!
माझी योग्यता मला चांगलीच माहीत आहे आई!!
दिशा अगोदर मला काळजी वाटत होती, पण आता मला कळलंय तू सक्षम आहेस, तुझी मागणी योग्य आहे. आणि तू नक्किच तुझ्या कर्तृत्ववाने समाजाला विचार बदलायला भाग पाडशील.
तुझ्याकडे बघून मला माझंच वाईट वाटतय आता, हा ठामपणा मी दाखवला असता त्यावेळी, तर कदाचित आज तुझा मार्ग सुकर व्हायला मदत झाली असती.......
असो, मी दडपले गेले असमानतेच्या चक्रात, तू मात्र चक्रात अडकणं झुगारलस, याचा मला खूपच अभिमान वाटतोय!!
खरंच आता केवळ बोलण्यात नाही, प्रत्यक्ष कृतीतही समानता यावी, आणि त्यासाठी तुझ्यासारख्या अनेकींनी पाऊलं उचलावीत, असं म्हणत दिशाच्या आईने तिला अगदी मनापासून पाठींबा दर्शवला!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article