रट्टा.......!!


शाळा सुटली तरी पॅसेजमध्ये रेंगाळत बसलेली पाच- सहा मुलं-मुली बघून नुकत्याच केबीनबाहेर आलेल्या हेडमास्तरांचं डोकं सटकलं. आणि झरझर पुढे येऊन त्यांनी दिसतील त्याच्या पाठीत जोरदार रट्टे घातले. 
बेसावधपणे पाठीत बसलेल्या त्या रट्ट्यांनी ती मुलं कावरीबावरी झाली. 
त्या मुलांच्यात आठवीतली सुमेधाही होती. अभावितपणे पाठीत बसलेल्या रट्ट्याने तिची तर छातीही दडपल्यासारखी झाली. 
एवढं जोरात तिला आजपर्यंत कुणी मारलच नव्हतं.
नव्हे तिच्या घरी मुलांना मारलं जायचं नाहीच फारसं कधी!!

पण ती ज्या शाळेत होती, तिथले हेडमास्तर श्रीरंग मोहिते, अतिशय कडक आणि मारकुटे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना मात्र एकेकाला झोडून काढायला खूप आवडायचं.

सगळी मुलं त्यांना वचकून असत. एरवी सुमेधाही अशी कुठे मधे-अधे थांबलीही नसती, पण तिला तिच्या संस्कृतच्या बाईंनी शाळा सुटल्यावर भेटायला सांगितलं होतं, म्हणून ती त्यांची वाट बघत स्टाफरूमच्या बाहेर उभी होती.
पण हेडमांस्तरानी कुणाला काही कारण न विचारताच अचानक पाठीमागून वार केला आणि त्यात इतरांबरोबर सुमेधाची पाठही शिजून निघाली.

ती बाईंना न भेटताच तशीच घरी आली. पाठ तर जबरदस्त दुखत होती तिची. तशी नाजूकच होती ती. तिचा पडलेला चेहरा बघून आईनं विचारलं, काय ग काही झालं का? 
तिने घडलेलं सगळं सांंगितलं. बघू दाखव म्हणून आईने तिची पाठ बघितली तर लालेलाल झाली होती चांगली!! आईच्या डोळ्यात पाणी भरून आलं.
तिने त्यांच्या नावाने बोटं मोडायलाच सुरुवात केली. हात आहे की काय आहे त्या माणसाचा? स्वतःची पोरगी असती तर मारलं असतं का एवढ्या जोरात? दुसऱ्याची पोरं काय रस्त्यावर पडलेली आहेत होय? 
साध्या कारणासाठी एवढं मारायची काय गरज होती?
अगदी असंच सुमेधालाही वाटलं होतं, नुसते ओरडले असते तरी आम्ही सगळी मुलं पळालो असतोच तिथून, मारायची काही गरजच नव्हती.
नेमका कुठला राग काढला त्यांनी आमच्यावर?

असं कोवळ्या पोरांना मारून कधी भलं होणार नाही त्या मास्तरड्याचं, माझ्या पोरीला उगाच दिलेला रट्टा त्याला चांगलाच महागात पडणार!! तिन्हीसांजेच्या वेळी तिच्या आईच्या तोंडून निघून गेलंच.
तिच्याच कशाला अगदी शाळेतल्या ज्या ज्या पोरांना त्यांचा हात लागला होता, त्या पोरांच्या, त्यांच्या घरच्यांच्या तोंडूनही हेडमास्तरांसाठी वाईटच बाहेर पडायचं. 

श्रीरंग मोहित्यांना मात्र त्याचं काही नव्हतं. त्यांच्यासाठी शाळेवर स्वतःचा वचक असणं सर्वात महत्वाचं होतं. कडक हेडमास्तर हे बिरुद त्यांना मिरवायला फार आवडायचं.
पण त्यामुळे ती शाळा केवळ पठडीतलं शिक्षण देणाऱ्या शाळांपैकीच एक ठरली होती. कोणाला कसलीही मोकळीक नव्हती. अगदी शिक्षकही नवे काही प्रयोग करायला घाबरायचे. मोहिते सरांना काही पटवून द्यायचं म्हणजे युद्धावर जाण्यासारखं  वाटायचं त्यांना!! 
जे चाललंय ते चालू ठेवलेलं आपलं सगळ्यांनी.
बऱ्याचशा शाळेत मुलांना धोपटून शिकवण्याचे प्रकार बंद झाले होते, तरी ह्या शाळेत मात्र ते सर्रास चालूच होतं. 

खरंतर श्रीरंग मोहित्यांचं पण चांगलं कुटुंब होतं. मुलगा मुलगी, बायको, आई वडील भरलं घर होतं त्यांचं. मुलं कॉलेजला जाणारी होती. शाळेतल्या सारखा दरारा घरीही होताच. ते घरी नसलेलेच घरच्यांनाही आवडायचं. अगदी त्यांच्या आईवडीलांनाही!! शाळेतली हिटलरशाही घरीही आणली होतीच त्यांनी. स्वभावातच रुजली होती त्यांच्या ती.........
बायकोला तर सतत काळजी वाटायची, ह्यांच्या असल्या वागण्यामुळे कधीतरी गोत्यात येऊ नये म्हणजे झालं.

पण ते होणार होतंच. सुमेधाने मार खाल्ला त्याच्या दुसऱ्याच दिवशी, काय त्यांच्या मनात आलं, कोण जाणे? शाळा भरायच्या वेळेला ते गेटवर जाऊन उभे राहिले. आणि उशिरा येणाऱ्या सगळ्या मुलामुलींना त्यांनी डबल पट्टी घेऊन फोडून काढलं. 'विनाशकाले विपरीत बुद्धी', म्हणतात तसंच झालं अगदी. 
मुलं कळवळली, त्याच्या अंगावरचे व्रण पाहून त्यांची घरं कळवळली. 
मुलांनी तर शाळेचा धसकाच घेतला, पालकांनी एकत्र येऊन शाळेवर मोर्चा काढला. 
आतापर्यंत ज्यांना छळलं होतं, मारलं होतं त्या साऱ्यांचे शिव्याशाप भोवले.
श्रीरंग मोहित्यांचं पद गेलं, त्याबरोबर त्यांची पतही गेली.
इतके वर्ष वचकून असणारे सगळे त्यांची खिल्ली उडवायला लागले. कारण फासा पलटला होता आता!!

नको होते घरच्यांना ते घरी, तरीही ते घरीच राहू लागले. 
कर्माचे भोग त्यांच्याबरोबर, त्यांच्या घरच्यांनाही भोगायला लागले. 

सुमेधाच्या घरीही बातमी कळली तशी तिच्या आईने देवापुढे साखर ठेवली. मुलीला मारून तिची लालेलाल केलेली पाठ, तिच्या डोळ्यासमोरुन जातच नव्हती. त्या रट्टयाने तिचा जीव जळवला होता.
खरंतर तिनेही ठरवलेलंच आपणच जाऊन इंगा दाखवायचा त्या हेडमास्तरला, पण तिन्हीसांजेला तिच्या तोंडातून बाहेर पडलेला शब्द खरा ठरला, बोलाफुलाची गाठ पडली आणि अगदी दुसऱ्या दिवशीच हेडमास्तरांचे ग्रह फिरले!!

दुसरे नवीन हेडमास्तर आले, मोहित्यांचा अनुभवाने ते थोडे संभाळूनच वागत सर्वांशी. शाळेतलं मुलांना मारणं तर कायमस्वरूपी बंदच करून टाकलं त्यांनी.

कोवळी मुलं तर शिक्षेतून सुटली, पण त्यांचे मारकुटे हेडमास्तर मात्र जन्मभरासाठी मानहानीच्या  शिक्षेत अडकले........

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel