मराठी कथा
विनोदी
तू खींच मेरी फोटो पियाsss
सोमवार, २१ डिसेंबर, २०२०
किती फोटो काढायचे? तुझं समाधानच होत नाही कधी, हात दुखायला लागला माझा, बस् झालं हा आता, मोबाईल बाजूला ठेवत जवळजवळ ओरडलाच ओम अदितीवर!!
कधीतरी काही करायचं म्हटलं बायकोसाठी तर तुझं आपलं तोंड वाकडच!!, जा मी रागवले आता तुझ्यावर, मी पण काढला ना तुझा फोटो छानसा, अदितीने फुरंगटून अबोला धरला.
तू एकच फोटो काढला ग, एका मिनिटाच्या आत झाला तो. मी इथे तास झाला, तुझे फोटोवर फोटो काढतोय . पहिले काय तर सगळ्या अंशात माना वळवायच्या, मग काय तर डोळ्यांच्या सगळ्या कोपऱ्यात नजरा फिरवायच्या, मग काय तर गालात हसायचं, मग काय तर दात दाखवून हसायचं, एकदा केस बांधून, एकदा मोकळे सोडून, एकदा काय तर साडीचा पदर दाखवायचा, एकदा काय तर अख्खी साडी दाखवायची, नंतर काय तर ब्लाऊजवरची पाठीमागची डिझाइन दाखवायची, त्या मॉडेलपण एवढं छळत नसतील ग फोटोग्राफरला!!, तू तर त्यांच्या वरताण आहेस ग बाई, ओम तिच्यापुढे हात जोडून म्हणाला.
तरी बरं, कधीतरीच मी साडी नेसते. येतो हुरूप अशावेळी दोन चार फोटो काढायचा, एवढं काय त्याच्यात!! आणि तूच म्हणतोस ना साडीत मी खुलून दिसते, मग अशी छान खुललेली मी डोळ्यात का टोचते तुझ्या?, इतर वेळी म्हणते का काही तुला?, तुला ना माझं सुख पहावंतच नाही, बोलू नको तू माझ्याशी, अदिती आरशासमोर स्वतःला न्याहळत म्हणाली.
कधीतरी काय? कुठेही बाहेर जायचं म्हटलं तर घरात फोटोपूजा करूनच निघतेस तू. चांगले कपडे घातले, ते डोळ्यात काजळ भरलं आणि ओठांना लिपस्टिक फासली की स्वतःवर फिदा होतेसच तू, फोटो हवाच असतो तुला. एक ओठांचा चंबूवाला सेल्फी तुझ्याकडून आणि एक हिरॉईनवाला लूक देत माझ्याकडून, हे दोन तर पक्के ठरलेलेच असतात तुझे!!, ओम असं बोलताच अदिती आरशात बघतच खांदे उडवून म्हणाली,
मग काय होतं, मी संधी देते तुला तुझ्यातलं टॅलेंट बाहेर काढायची. पण तुम्हाला स्वतःच्या बायकोचे फोटो काढण्यात उत्साह नसतोच मुळी. घरची मॉडेल, म्हैस बराबर!!
ऑफिसमधल्या नटव्यांचे काढत असशील उगाच पुढे पुढे करत!!
ए बाई, तोंड सांभाळून बोल. मी काय ऑफिसमध्ये कुणाचे फोटो काढायला जातो की काय? एक तास फोटो काढले तुझे, एखादी असती तर नवऱ्याला खूष होऊन गोड पप्पी दिली असती!! तू तर बिनबुडाचे आरोप करत बसलीयेस नुसती.
हे बघ तू पंचवीस फोटो काढतोस ना तेव्हा त्यातले पाच बरे येतात. एकतर चांगल्या मनाने काढत नाहीस, जेव्हा पंचवीसच्या पंचवीस चांगले येतील ना तेव्हा देईन हा मी तुला गोड गोड पप्पी!!, एवढं बोलून अदितीने आरशातल्या स्वतःच्याच रूपावर फिदा होऊन स्वतःलाच एक पप्पी दिली.
म्हणजे फोटो चांगले येत नाहीत ती फक्त माझी चुकी का?
म्हणायचंय काय तुला, मग ओमss?
नाहीs काही नाही...... तुला नावं ठेवीन का कधीतरी मी?
अगं कॅमेरा क्वालिटी पण चांगली नसेल कदाचित. असं कर माझ्या बड्डेला ना तू एकदम हायफाय फोन मला गिफ्ट कर. कदाचित त्याने तुझे सगळेच्या सगळे फोटो छान येतील!! ओमने आपला खडा टाकून पाहिला.
पण अदिती त्याच्यापेक्षा स्मार्ट होती, ती लग्गेच म्हणाली, येडी वाटते का रे तुला मी? तुला देण्यापेक्षा मीच घेईन की मला. माझा सेल्फीही आणखी उजळून येईल मग!! असं करूया, आता एवीतेवी लग्नाचा वाढदिवस तोंडावर आलाच आहे. मलाच गिफ्ट करून टाक एखादा!! बाकी सगळं ठिकठाक असलं तरी चालेल, कॅमेरा क्वालिटी तेवढी जबराट असली पाहिजे!!
झोपेतून उठलेली जरी असली मी तरी हिरोईन दिसायला पाहिजे, काय म्हणतोस?
काही म्हणत नाहीss. ऍक्च्युली बायकांसमोर ना कुठल्याही नवऱ्याने काही बोलायलाच नको खरंतर!! बोलला तो फसलाच!!
असं करतो, चार फोटो आणखी काढतो हवंतर, मगाशी त्या गालावरच्या खळीला फोकस करायचं राहीलं होतं, तेही करून घेऊया एकदाचं, असं म्हणत बाजूला टाकलेला मोबाईल ओमने पुन्हा उचलला.
अदितीलाही अगोदरच्या फोटोशूटमधला एकही फोटो डिपीला शोभेलासा न वाटल्याने, आता पिया म्हणतोच आहे तर कशाला चान्स सोडा, असंच वाटलं. अन् गालावरच्या खळीसकट पुन्हा एकदा विविध पोझ मारायला ती अगदी आनंदाने तय्यार झाली.......!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article