प्रेरणादायक
मराठी कथा
मोकळा हात.......!!
बुधवार, २३ डिसेंबर, २०२०
काका बघा झाली का?
घाल की आणखी दोन तीन......
मला पाव किलोच पाहिजेत हं फक्त !!
हो हो पाव किलोच देणार. गेली एक दोन वांगी जास्त तर एवढं काय होतं त्यात?
भाजीवाले काका हे बोलले, आणि इतकं छान वाटलं मनाला. अगदी काटेकोरपणे वजन करून देणाऱ्या, किंचितही वजन जास्त भरलं, कांदा बटाटाट्याचं; तर लगेच काढून घेणाऱ्या, म्हटलं तर वजनापेक्षा थोडं कमीच देणाऱ्या दुसऱ्या भाजीवाल्यांंपेक्षा यांचं गणित वेगळं वाटलं मला. इतरवेळी वाटतं, भाजीवाला वजनात गंडवत तर नाही ना? पण इथे पहिल्यांदा वाटलं यांचा वजनकाटा ठिक आहे ना?
कारण खरंतर माझी पाव किलो वांगी मला अर्धा किलोच्या जवळपास वाटत होती. आणि नंतर घेतलेले टॉमेटो सुद्धा.
त्या काकांनी भाजी नाही दिली फक्त, आपला हात मोकळा सोडून माणूसही जोडला कायमचा!!
माझ्या मनातून कितीतरी वेळ त्यांचं ते वागणं जाईचना. खूप दिवसांनी असा अनुभव मिळाला होता मला.
त्यांच्यामुळे मग अशी एकेक मोकळा हात सोडणारी माणसं डोळ्यासमोर येऊ लागली........
लहानपणी आम्ही एका नातेवाईकांकडे जायचो, त्यांचाही हात असाच मोकळा सुटायचा. पण माणसांना जेवायला वाढताना. थोडं कधी सुटायचंच नाही त्यांच्या हातून, सवयच नसावी बहुतेक हाताला. वाढणार ते भरपूरच!! आणि अतिशय आग्रह करून करून. त्यातून समोर कोणी बारकुंडा असेल तर त्याला तर एकदम जबरदस्तीच वाढलं जायचं. म्हणायचे, भरपूर खा. खाणार तर होणार ना!!
बहुतेक त्यांना वाटायचं, आत्ता आपण वाढलेलं याने सगळं खाल्लं तर हत्तीसारखा फुगणारच एकदम!!
पण सगळं असायचं मनापासून, अगदी आपुलकीने, म्हणूनच ती माणसं आणि त्यांचं आल्या- गेलेल्याला खाऊ पिऊ घालणं अजूनही डोळ्यासमोर तसंच आहे. मोकळा हात तिथेच पहिल्यांदा बघितला मी!!
माझ्या एका मैत्रिणीची आई पण अशीच, त्यांच्या गावावरून आलेला किंवा ते गेल्यावर त्यांनी आणलेला वेगवेगळा खाऊ मोकळ्या हाताने पाठवायची माझ्यासाठी. खूप सारा असायचा तो.
आणि आता माझी मैत्रिण तिच्या घरी काही छान केलं की मोकळ्या हाताने माझ्याकडे आणून देते.
अगदी सर्वांसाठी पोटभर असतं ते.....
बाकी सगळं एकवेळ ठिक. पण पैशाला मोकळा हात कोण सोडतं का? एक ओळखीचे काका असेच पैशालाही हात मोकळा करणारे. कोणी त्यांच्याकडे पैसे मागितले, आणि यांनी दिले नाहीत असं होणारच नाही कधी. या स्वभावामुळे बरेचदा फसगत होते त्यांची, पैसे बुडतातही, मागणारा परत आणून देतोच असं नाही. अडीअडचणीला आठवणारे काका, ती निस्तरली गेल्यावर विसरले जातात. पण काका सुधारत नाहीत,आपला हात कधीही आखडता घेत नाहीत. सुदैवाने त्यांना काही कमीही नाही.
काहींचे हात तर आपल्या घरच्यांसाठीही मोकळे सुटत नाहीत, बाहेरच्यांची तर गोष्टच वेगळी मग!!
हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच माणसं असतात अशी, म्हणूनच कायम लक्षातही राहतात.......
तुम्हालाही भेटली आहेत का हो अशी कोणी?
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article