लाडकी.......!!

सकाळी जाग येताच सारंगीची नजर तिच्या बाजूलाच ठेवलेल्या गिफ्टच्या बॉक्सकडे गेली. आणि आनंदाने ओरडतच तिने बाजूला झोपलेल्या स्वराजला विचारलं, ए आईबाबा आलेत का माझे? कधी आले, मला कसं कळलं नाही? तू मला उठवलं का नाही?

स्वराज तिने बाजूला सारलेलं पांघरूण तोंडावर ओढत झोपेतच म्हणाला, कोणी नाही आलं ग!!

"मग हे गिफ्ट कसं आलं?"

"मला काय माहीत सांता ठेऊन गेला असेल!!"

स्वराज सांग ना, उठ ना, तू पण माझ्या आईबाबांसारखा झालास का?, उठ नाहीतर मी तुझ्या कानातच ओरडेन आता जोरात!!, असं म्हणून सारंगीने त्याच्या जवळ येऊन आवाज वाढवायला सुरुवात केली, तो सहन न होऊन स्वराज उठला आणि म्हणाला, अगं खरंच सांताने पाठवलंय तुझ्यासाठी......

"स्वराज आता तू नीट संगणारेस का? माझे आईबाबा कुठे भेटले तुला?"

"नाही ग. ते कसे मला भेटतील? सांतानेच पाठवलं हे तुझ्यासाठी!!"

"तू गप हा आता, सांग मुकाट्याने सगळं."

अगं हे तुझ्या आईबाबांनी कुरिअर केलेलं माझ्या ऑफिसच्या पत्त्यावर. दोन दिवसांपूर्वीच मिळालं मला!! फोनही केला होता, नाताळच्या रात्री तुझ्या उशाशी आठवणीने ठेवायला सांगितलं मला त्यांनी. लग्न झालं म्हणून काय झालं, सांताचं गिफ्ट पोचलच पाहिजे आमच्या सोनुलीला, असं म्हणाले ते. वरून बजावलंही मला, तुला अजिबात सांगायचं नाही म्हणून. स्वराजने हे सर्व सांगितल्यावर टचकन् डोळे भरून आले सारंगीचे, तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाली.........

काय करू रे मी ह्यांचं !! माझ्यापेक्षा यांचीच हौस दांडगी !! मी मोठी झाले, आता तर लग्नही झालं, पण मला मोठी समजायला तयारच नाहीत हे.
माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींच्या घरी ते सहा- सात वर्षाचे झाल्यानंतर हे सांताबाबाचं प्रकरण थांबलं.
पण आमच्या घरी मात्र अजूनही चालूच आहे.

मलाही आठ- दहा वर्षापर्यंत खरंच वाटायचं रे, सांता येतो आणि गिफ्ट देऊन जातो. मग हळूहळू कळलं मैत्रिणी बोलायच्या ना, सांता-बिंता कोणी काही येत नाही.
मी घरी बोलायचेही आईबाबांना, मला माहीतीये तुम्हीच गिफ्ट आणता माझ्यासाठी. तर त्यांनी कधी ते कबुलच केलं नाही !! एकदा तर सहावीत असताना, मी रात्रभर हट्टाने जागी देखील राहिले होते, नक्की सांता कोण ते बघायला!! पण नाही, पहाटेला काय तो डोळा लागला माझा,अन् सकाळी माझ्या डोक्याशी गिफ्ट आलंच!! 
त्यानंतरही कितीदा प्रयत्न केले,पण नाहीच. कधी ते गिफ्ट ठेवायचे मला अजूनही कळलं नाही.
मी ठरवून सुद्धा नाही पकडू शकले रे त्या दोघांना. आणि पकडू शकले नाही म्हणून दरवर्षी माझ्या डोक्याशी गिफ्ट येतच राहीलं.

मग मी ही नाद सोडून दिला. नंतर तर मला कळलंच आईबाबाच असतात आपले सांता. पण मी ही ते दाखवायचं सोडलं. कारण मी ते गिफ्ट फोडताना त्यांच्या डोळ्यात दिसायचा तो आनंद, उत्साह माझ्यासाठी सगळ्यापेक्षा खूप मोठा झाला तोपर्यंत. मी ते गिफ्ट आवडलं, खूप खूप आवडलं म्हणत त्याला घेऊन नाचले, की आईबाबा एकमेकांकडे पाहून डोळे मिचकवायचे. त्यांना वाटायचं मी नाही बघितलं, पण मला दिसायचं सारं. त्यांचं ते माझ्यावरचं खट्याळ प्रेम आवडायचं मला खूप खूप.
स्वराज, त्यांना शक्य झालं असतं ना, तर मला कधी मोठं होऊच दिलं नसतं त्यांनी. आणि लग्न होऊन दुसऱ्या गावी तर कधी पाठवलंच नसतं. 
लग्नात किती बिथरलेले बघितलस ना तू?
सावरले कसेतरी नंतर. मला तर केवढी काळजी वाटत होती त्यांची. 

खूपच जीव आहे त्या़ंचा तुझ्यावर सारंगी, स्वराज तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, तशी ती पुन्हा त्यांच्या आठवणीत रमून बोलू लागली,
हो ना !! अगदी काल रात्रीच आलेलं माझ्या मनात, आता यावेळी गिफ्ट नाही मिळणार मला माझ्या दोन सांतांच. पहिल्यांदा होणार असं !! मलाही एकदम रितेपण जाणवलं रे.........
पण बघ ना, त्यांनी त्याचं ते प्रेम पोचवलंच माझ्यापर्यंत !!

थांब, कॉलच लावते त्यांना, त्यांच्यासमोरच उघडते गिफ्ट !!, असं म्हणत सारंगीने फोन घेतला आणि आपल्या घरी व्हिडिओ कॉल लावला.

लेकीचा फोन आला, म्हणून उत्साहाने तिकडूनही उचलला गेला. तो उचलल्यावर सारंगी जोरात ओरडून म्हणाली, हे बघा. सांताने मला लग्न झाल्यावर पण गिफ्ट पाठवलं. हा सांता मला मोठं होऊ देणारच नाही वाटतं कधी!!
तुम्हाला माहीत आहे का, काय आहे याच्यात?

तिच्या आईबाबांनी छ्याs, आम्हाला नाही बाबा माहीत काही, म्हणून नकारार्थी मान हलवली.

चला मग बघूया सगळेच, काय दिलंय सांताने ते, असं म्हणत सारंगीने ते गिफ्ट फोडलं, त्यातली सुंदरशी काश्मिरी शाल अंगावर पांघरली. आणि म्हणाली, वॉव्व!! सांता पण ग्रेट आहे हा. कसली एकेक गिफ्ट काढतो शोधून. आईबाबा ही शाल सांताने पाठवलीये खरी, पण पांघरल्यावर थेट तुमच्या प्रेमाची ऊब मिळल्यासारखं का वाटतय बरं?

ते ऐकून तिच्या आईबाबांनी एकमेकांकडे पाहून नेहमीसारखेच डोळे मिचकवले. 
आताही ते सारंगीने पाहिलंच, मात्र हे आणखी जराही वेळ समोर राहिले तर जोरात रडूच कोसळेल या भीतीने, मला तुम्ही खूप खूप आवडता आईबाबा !! असं मोठ्याने बोलून कॉल बंद करून टाकला.

मग तिने झट्कन ती शाल खांद्यावरून काढली आणि तिला घट्ट हृदयाशी कवटाळली. तसं इतक्या वेळ डोळ्यात अडकवून ठेवलेलं पाणी झरझर वाहू लागलं. थेंब शालीवरही पडले, अन् तिला दोन्हीकडच्या प्रेमाची पोच मिळाली.

तिकडे तिच्या आईवडिलांची स्थितीही काही वेगळी नव्हतीच!! हे पहिलं वर्ष होतं, जेव्हा नाताळच्या दिवशी त्यांची लाडकी सोनुली घरात नव्हती. नेहमी डोळ्यासमोर गिफ्ट उघडून आनंदाने नाचणारी, आज व्हिडीओ कॉलवर डोळ्यात पाणी आणून हसत होती. तरीही, तरीही त्यांना ती अजूनही मोठी झाल्यासारखी वाटतच नव्हती.........

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.

Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel