देवाच्या दारी.......!!

एका मोठ्या देवळाच्या घाटावर वैशुचं सगळं कुटुंब काम करत होतं. वैशुची आजी घाटावरच्या मोक्याच्या जागी हार फुलं विकायची. हार मागितला तर पन्नासचा अन् फुलं मागितली तर पंचवीसची. रेट पक्का होता तिचा. घ्यायचं तर त्याच्या वरचं, त्याहून कमी ती कोणाला द्यायची नाही.
देवाच्या दारी जास्त कोण झिगझिग करायचं नाही तसं तिच्याशी. 

वैशुची आई अगदी घाटाच्या खालच्या पायऱ्याजवळच्या कट्ट्यावर नारळ, हळदी कुंकुवाच्या पुड्या, पांढरी फुलं घेऊन बसायची.

आजोबा देवाचा फोटो गळ्यात अडकवून येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला टिळा लावत फिरायचे. नको म्हटलं तरी मागं पुढं करायचे. मग हौसेनं किंवा म्हाताऱ्या माणसाकडं बघून टिळा लावून घेणारा किमान दहा रुपये टाकायचाच त्याच्या परडीत. 

वैशुचा बाप नवीन माणसाला हेरून त्याची खायची प्यायची रहायची व्यवस्था करायचा. माणसाचा पेहराव वागणं दुरूनच बघून कुठं न्यायचं ते बरोबर ठरवायचा तो. इतक्या वर्षात चांगला तरबेज झाला होता तो गिऱ्हाईकं ओळखण्यात. कमिशन त्याला दोन्हीकडून मिळायचं, हॉटेलवाल्यांचं तर ठरलेलं होतच, पण गिऱ्हाईकांकडेही तो तोंड उघडून खुशाल हात पसरायचा. देवाच्या दारी कोणी तसं नाही म्हणायचं नाही त्याला. 

विस्तीर्ण पसरलेल्या मोठ्या नदीचा मोठाच्या मोठ्ठा घाट होता तो. वैशुचं काय अशी बरीच कुटुंब तो पोसत होता.
स्थानमहात्म्य होतं. गावोगावची, देशोदेशीची बरीच लोक यायची, देवाला, घाटाला भेट द्यायला. 

सात वर्षाची होती वैशु. तिचं काम होतं, घाटावर हिंडणाऱ्या नवख्या कुटुंबाला पकडायचं, कुठं जायचय ताई, कुठं जायचय दादा करायचं. मंदिराचा रस्ता दाखवू का?, विसर्जन घाटावर नेऊ का?, हारफुलं आणून देऊ का? नारळ पाहिजे का? करत त्यांच्या मागे लागायचं. तिच्याकडं बघून कोणी चांगल्या घरच्या माणसाला कणव येऊन काहीतरी काम द्यायचेच. आणि नाही दिलं तरी हातावर दहा वीस रुपये टेकवायचेच. कारण त्यांच्या डोळ्यासमोर आपली चांगल्या स्थितीतली पोरं यायची, आणि ह्या बारक्या पोरीला पैशासाठी किती हा त्रास, असं वाटून दयेचा पैसा निघायचाच त्यांच्या हातून.
तो पडावा म्हणून तर आईबाप पुढं करायचे तिला.

वैशु अशी दिवसभर घाटावर वणवण करायची. शाळा होती, पण तिचं जीवनातलं स्थान दुय्यम होतं. हे काम जास्त महत्वाचं होतं. तिच्या मागची बहीणही घाटावर आईजवळ बसून आणखी वेगळं महत्वाचं काम करायची.
ती असेल पाच साडेपाच वर्षाची. पण दिलेलं काम मात्र सराईतपणे करायची. तिच्याच वयाची पोरं घेऊन आलेले आई बाप आपल्या पोरांना जीवापाड जपायचे, घाटावरून चालताना, पायऱ्यांवरून पाण्यात पाय धुताना. घसरुन पडू नये म्हणून घट्ट पकडून असायचे. अन् ही एवढीशी पोरगी जाळी लावलेली लांब काठी पाण्यात टाकून, लोकांनी पाण्यात सोडलेले नारळ गोळा करून आईला आणून द्यायची. झालं तर दुसऱ्या काठीच्या तोंडाला लावलेला जाडजूड चुंबकाचा ठोकळा पाण्यात सोडून त्याला चिकटणारी लोकांनी कृतज्ञतेने पाण्यात टाकलेली नाणी गोळा करत बसायची.
नाणी दिवसाला शे- दिडशे तरी कुठं जात नव्हती. वर काढलेले नारळ तिची आई पुन्हा विकायला घेऊन बसायची. तेच नारळ भक्तिभावाने कोणी तरी घ्यायचं, अन् पुन्हा पाण्यात सोडायचं. विकलेल्या नारळाचे पैसे मिळत होते अन् नंतर नारळही. इतक्या माणसांनी भरलेला घाट तो, यांच्याकडे बघत बसायला वेळ तो कोणाला होता?
बरं नाहीच उत्तम चाललं होतं वैशुच्या कुटुंबाचं.
पण समोरच्याला दिसताना मात्र दयनीय अवस्था दिसायची एवढंच. 
जवळच्याच खेड्यात तीन खोल्याचं स्वतःचं घर होतं त्यांचं. थोडीफार जमीन सुद्धा घेतलेली. घरातला प्रत्येक माणूस कामावर म्हटल्यावर काय होणारच की!!
साध्यासुध्या नाही तर देवाच्या दारी देवाच्या कामावर होता. बारा महिने कमाई होती.
कुटुंबातल्या एकाच्या मनाला सुद्धा काही टोचत नव्हतं. एवढा मोठा पाप पुण्याचा विचार करायला वेळच नव्हता त्यांच्याकडे. बाकीची लोक आपली यायची कुठून कुठून देवाच्या दारी पुण्य कमवायला. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत, देव ह्याने रुसला असेल की त्याने करत देवाची माफी मागायला.  

कोरोनाच्या काळात मात्र हाच घाट ओस पडला होता. वैशुचं कुटुंब गपचिप घरी बसलं होतं. उपासमारीचा प्रश्न नव्हता. इतक्या वर्षाची घाटाची कृपा होती. 

अशातच एके दिवशी शहरात राहणाऱ्या पाहुण्याचा वैशुच्या बापाला फोन आला. पाहुणा रडवेला होऊन सांगत होता, नोकरी धंदा सुटला. बचत करण्याएवढं कधी काही मिळालं नाही. दोन महिने काढले कसेबसे. आता जगावं कसं कळेना? वैशूच्या बापानं तेव्हा वरवर समजावून फोन ठेवला. पण आतून मन हाललं अन् पाहुण्यासाठी काहीतरी करावं वाटू लागलं.
आई बापाशी बोलला, बायकोशी बोलला. आपल्यातलं काढून द्यावं, सर्वांना मनापासून वाटलं.
कुणी दुःख सांगितलं, आणि ते ऐकून सोडून देणं, सर्वांना टोचायला लागलं.

वैशुचा आजोबा म्हणाला, देवाच्या कृपेने काही कमी नाही आपल्याला. इतके दिवस आपण हात पुढं करत होतो, आता आपली वेळ आली. द्यायला पाहिजेच आपल्याला. नसतं तर गोष्ट वेगळी होती.
तरी आजी म्हणाली, पण रोग कधी जाणार कुणाला माहीत? आपल्यातलं काढून आपण रस्त्यावर आलो तर??
त्यावर वैशुचा आजोबा म्हणाला, ती काळजी आपल्याला नको. देव आहे की. त्याच्या जीवावर तर भार आपला. त्याच्या नावावर तर कमावतो आपण.
आज तोच मागतोय समजुया अन् आहे त्यातलं काढून देऊया.  
वैशु तिथंच बसून सगळं ऐकत होती. बाई म्हणतात, शाळा शिकून माणूस शाणं होतं. ह्यातलं कुणी पण शाळेत नाही गेलं मग एवढं शाणं त्यांना कुणी केलं? 
मनात आलं तसं खुदकन हसली, आणि आजीच्या जवळ जाऊन म्हणाली, रोग गेला की देव आपल्याला पुष्कळ देईल.

दुसऱ्या दिवशी सायकल काढली, अन् जवळच्या शहरात असणाऱ्या पाहुण्याकडं वैशुचा बाप चालू पडला.
पोलिसांनी हटकलं, फाटका माणूस बघून कारण बिरण न  विचारता दोन दांडक्याही पाठीवर मारल्या. उपाशी पावण्याचं घर भरायला जातोय, हे त्यानं कळवळून सांगितलं तेव्हा मात्र माफी मागून त्याच्याबरोबर सेल्फी घेऊन त्याला शाबासकी देऊन पुढे पाठवलं.
पाहुण्याला दोन महिन्याचा किराणा भरून दिला, हातात थोडेफार पैसे दिले. 
दोन घरं समाधानी झाली. दिलं म्हणून त्याचं स्वतःचं आणि महामारीत पोटाला मिळालं, म्हणून त्याच्या पाहुण्यांचं. 
आणखी चार पाच महिने गेले. होतं त्यातलं वेळोवेळी पाहुण्याला काढून देऊनही काही कमी पडलं नाही, वैशुच कुटूंब तरलं.

पुढं दिवाळी आली तशी घाटावर थोडी थोडी लगबग सुरू झाली. देवही पुन्हा माणसात आला. 
वैशुचं घर कामाला लागलं. 
सगळं तसंच चालू झालं. आजीचं चढ्या भावात फुल विकणं, आजोबांचं टिळा लावण्यासाठी लोकांना मधेच अडकवून धरणं, बापाचं कमिशनसाठी माणूस टिपणं, वैशुचं एवढसं तोंड करत लोकांच्या मध्ये मध्ये घुटमळणं, बहिणीचं  नाणी गोळा करणं, नारळ जमा करणं अन् आईचं तेच नारळ पुन्हा विकणं.........

ज्याच्या नावावर मिळत होतं, त्याने साधा सुटसुटीत हिशोब ठेवला होता. त्याला तो लागल्यावर कुणाला कसलं टेन्शन घ्यायचं कामच नव्हतं.......

आपल्याला वाटतं, पण देवाच्या दारी तसं सगळं चोख असतं........!!

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.

Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel