पापमार्जन........!!

जेवणात आमटीभाताच्या पहिल्याच घासाला भला मोठा लांबसडक केस हातातल्या घासात अडकून तोंडात शिरू पाहतोय हे बघून जाई ईss करून जोरात ओरडली. तिच्यासमोर जेवत असलेल्या तिच्या दोन्ही मुलीही दचकल्या. त्यांनी आपल्या हातात घेतलेला घास खाली टाकला, आणि आईला विचारलं, काय ग? चुकून काही वेगळं टाकलंयस की काय भातात?

काही वेगळं नाही टाकलं, खावा गप. हे बघा केस आला माझ्या पानात केवढा मोठा!!, अगदी बेक्कार तोंड करत जाईने तो केस त्यांच्यासमोर धरला.

शीss आम्हाला कशाला दाखवतेयस आणखी? तुझाच असणार तो, मोठी मुलगी अगोचरपणे बोलली तशी जाई म्हणाली, माझा नाहीच. मी नाही तुमच्यासारखी केस मोकळे सोडून घरभर हिंडत.

चुणचुणीत छोटी म्हणाली, अगं आई, पण मोकळे सोडलेले केस घरभर उडून उडून एकमेकांना जॉईंट होतात का ग? केवढा मोठा केस आहे तो.
आपल्या तिघींच्या डोक्यावरचा एक एक केस घेतला तरी तेवढा होणार नाही. तिघी तर बॉबकटवल्या आपण!!

मोठी चटकन म्हणाली, अय्या मग कोणाचा? अन् आपल्या घरी कसा?

कोणाचा का असेना! मेलं माझ्याच पानात कडमडायचं होतं त्याला? ते सुद्धा आमटीभाताच्या पहिल्याच घासाला? आज वेगळ्या पद्धतीने केली होती मी आमटी. आता हे खावं पण वाटेना आणि टाकावही वाटेना. भातही संपला नेमका.
जाई हिरमुसून तशीच ताटाकडे बघत बसली.

मोठी म्हणाली, काही वेगळी लागत नाही आमटी. नको दुःख करू. रोज सारखीच 'बे' चव आहे.

"काय?"

माझा सायलेंट 'बे' तुला कसा ग ऐकू गेला? मज्जा केली मी. तुला जास्त वाईट वाटू नये म्हणून. बोलता बोलता छोटीला मारलेला डोळा जाईला दिसलाच. तरी तिने तिकडे कानाडोळा केला. वाद घालण्यात तिला इंटरेस्ट नव्हता. 
तरी बरं दोन पोळ्या खाऊन झालेल्या माझ्या, नाहीतर आज उपासच घडला असता, असं म्हणत तिने ताट उचललं, आणि त्यातला भात नीट बघून पक्षांच्या ताटलीत टाकला. 
कितीही म्हटलं तरी पहिल्या घासाला लागलेला केस डोळ्यासमोर न आणता खाणं, तिला जमणं शक्यच नव्हतं.

मुलींचं उरकलं तसं बाकी सगळं आवरून तिने सोफ्यावर लवंडत टिव्ही सुरू केला. 
सिरीयलमधली बाई तिच्या बाहेर जाणाऱ्या नवऱ्याला मिठी मारत होती. पोरी बाजूला होत्या, तिला कसंतरी वाटलं म्हणून चॅनल बदलायला गेली, तर चॅनल बदललं जाईना. दोन तीन वेळा रिमोट आपटला, तरी समोरचं चित्र हलेना. म्हणून तिने छोटीला टिव्हीजवळ जाऊन चॅनल बदलायला सागितलं. छोटी गेली, बटनाला हात लावणार इतक्यात..... जाई मोठयाने ओरडली, थांsब!!

छोटीला छातीत धस्स् झालं आणि तिने पटकन आईकडे पाहिलं. मोठीनेही झट्कन तिच्याकडे मान वळवली.

पण जाईचं कुणाकडेच लक्ष नव्हतं. ती जीव टाकून टिव्हीकडं बघत होती.

मिठी मारता मारता सिरियलमधल्या बाईच्या हाताला नवऱ्याच्या शर्टवरचा मोठा लांबसडक केस लागला होता. मिठी मारून नवरा पळाला. पण त्या चतुर स्त्रीने तो केस अलगद उचलला होता, आणि त्याकडे बघत डोळे बारीक करून संतापाने थरथरत, ती त्याला घरी आल्यावर चौदावं रत्न दाखवायची योजना आखत होती.

इथेच.......इथेच जाईला साम्य वाटलं. आणि तो केस दिसताच तिला आपल्या आमटीभातात गुंतलेला केस झर्रकन् डोळ्यासमोर आला, आणि ती ओरडली, थांब. तिला अचानक त्या सिरीयलमध्ये इंटरेस्ट आला. ती अगदी एकाग्र चित्ताने पाहू लागली.

पण आईला शांतपणे पाहू देतील ती मुलं कसली? आई काहीतरी इंटरेस्ट घेऊन बघतीये असं दिसल्यावरच पोरींना उत आला,आणि त्या कुठल्यातरी फडतूस कारणाने एकमेकींच्या झिंज्या उपटू लागल्या. 
जाईला सिरियलमधल्या बाईची केसात अडकलेली केस सोडून, आपल्या पोरींच्या हातातले एकमेकींचे केस सोडवणं भाग पडलं.

दोघींना शांत करून तिने पुन्हा टिव्ही चालू केला, तर नवऱ्याने एन्ट्री घेताच त्याला खाऊ की गिळू अशा नजरेने बघणाऱ्या बायकोच्या चेहऱ्यावर स्टेचू करून, तमाम बायकांची उत्सुकता ताणणारा  तो अति उत्कंठावर्धक भाग त्यांनी नेहमीप्रमाणेच उद्यावर टाकून दिला होता.

जळलं लक्षण मेल्यांचं!! त्या बाईच्या केसाची केस आजच मार्गी लावली असती तर काय गेलं असतं यांचं असं काहीतरी पुटपुटत तिने टिव्ही बंद केला. पोरी आत बेडरूम मध्ये काहीतरी खुडबुडत होत्या. म्हणून ती बाहेर सोफ्यावरच लवंडली.
डोळे मिटले तसा जेवणातला लांबसडक केस तिच्या डोळ्यासमोर आला. अन् त्याबरोबर सिरीयल मधल्या बाईच्या हातातला नवऱ्याच्या शर्टवरचा केसही बाईच्या एक्सप्रेशनसहीत पुढं पुढं नाचू लागला. दोन्ही केस एकमेकांना क्लँश झाले, आणि ........
आणि इतकी वर्ष भोळासांबागत वाटणाऱ्या नवऱ्याबद्दल जाईच्या मनी संशय आलाच!!

नेमक्या पहिल्या घासाला आलेल्या त्या लांबसडक केसाला मला सुचवायचं तर नव्हतं ना काही!!
कशावरून देवाला एखादा क्ल्यू द्यावा वाटला नसेल मला??
कशावरून तो शर्टवरून उडून स्वैपाकघरात शिरला नसेल?
कुणी सटवी माझ्या नवऱ्याची बायको होण्याच्या मार्गावर तर नाही ना?
मनात काय अन् कायच्या काय येऊ लागलं. झोप यायला हवी होती ती मात्र आलीच नाही.

तेवढ्यात बेल वाजली, म्हणून जाईनं दार उघडलं.
बाजूच्या मोहित्यांची मल्लिका लगबगीनं घरात घुसली आणि जाईसमोर आपले कंबरेच्या खालपर्यंत जाणारे लांबच्या लांब केस सोडून  म्हणाली, तुझी ती स्पेशल सागर वेणी घालुन दे ना ताई. माझ्या नवऱ्याला फार आवडते ती हेअरस्टाईल. तो आल्यावर नाटकाला जाणार आहोत आम्ही.

आज खरंतर मुळीच मुड नव्हता, त्या केसात  हात घालायचा जाईचा. पण ज्यापासून दूर जावं तेच जास्त समोर येतं. तसंच होत होतं जाईबरोबर. भातात केस, टिव्हीत केस, झोपताना डोळ्यासमोर केस, आणि आता ही मल्लिकाही केसांचं जंजाळ पसरवून उभी होती. त्यातून उगाच नवऱ्यानेही केसानेच गळा कापला की काय ही रुखरुख लागलेली ती वेगळीच!!

मल्लिकाची हौस उतू जात होती, आताशी कुठे वर्ष झालेलं लग्नाला. जाईचं मन नव्हतं तरी मल्लिकाचं मन तिला मोडवेना झालं, तिने छानशी हवी तशी वेणी घालून दिली मल्लिकाला. 
अवखळ मल्लिका उड्या मारत घरी गेली. जाई जागेवरून उठणारच होती, तेवढ्यात
तिकडनं पोरी येऊन लाडाने मांडीवर पडल्या. 
पडताक्षणी समोर पुंजका दिसला तशी छोटी ओरडली, आई तुझ्या गाऊनवर केस बघ किती!!
शीs आता माझ्याही अंगाला लागले असतील.
मोठीही पटकन बाजूला झाली. 
जाईनं उठून गाऊन झटकला. मोठे मोठे लांब केस खाली पडून उडू लागले.  
मोठी पटकन ओरडली, आई तू त्या मल्लिका मावशीचे केस बांधणं सोडून टाक पहिले. 
तुझ्या भातात आलेला केस तिचाच होता, परवा रविवारीच नाही का अशीच मुरडत आलेली ती!! 
ते तू चक्क विसरलीस आणि आमच्या साध्यासुध्या बाबांवर मात्र संशय घेतलास. हो ना?

जाई एकदम आश्चर्याने म्हणाली, तुम्हाला कसं ग कळलं?

टिव्ही बघताना तुझ्या चेहऱ्यावर त्या बाईसाखेच एक्स्प्रेशन आले होते सगळे. छोटीने हळूच कानात सागितलं माझ्या, आज बाबाची खैर नाही. 
तसंही काही झालं की तुम्हा बायकांचा संशय नवऱ्यावरच जातो ना पहिले. 

कुठून शिकल्या ग तुम्ही एवढं? बघितल्या तर आताशी एवढुश्या!!, मोठे डोळे करून जाईने विचारलं.

तुझ्या सिरीयलमधून......दोघीही जोरात ओरडल्या, तसा जाईने कपाळावर हात मारून घेतला. 

खरंच, आमटीभातात आलेला लांबसडक केस  मल्लिकाचा असू शकतो, हे फक्त त्या सिरीयलमुळेच लक्षात नाही आलं आपल्या. तिने डोक्यात वेगळंच खूळ टाकलं आणि आपला भोळासांब क्षणात स्त्रीलंपट वाटू लागला आपल्याला!!

बस्स् आता पापमार्जन झालंच पाहिजे.
उद्यापासून एकजात सगळ्या सिरीयल बंद म्हणजे बंद, तिने मुलींपुढे मोठ्याने ओरडून प्रतिज्ञा घेतली.

मुली म्हणाल्या, आता उद्या का? तूच म्हणतेस ना, कुठलीही चांगली गोष्ट उद्यावर ढकलायची नाही. ताबडतोब आचरणात आणायची.

हो, माझा नवरा तर सुटला. तेवढा तिचा पण नवरा सुटतोय का अडकतोय ते बघितल्याशिवाय जीवाला शांती नाही मिळणार माझ्या!!

मुली एकमेकींना टाळ्या देत म्हणाल्या, मग ती तुझी प्रतिज्ञा बासनात गुंडाळूनच ठेव आपली. उद्याचं काय घेऊन बसलीस, आणखी महिनाभर तरी शांती मिळणं शक्य नाही तुला!! 

जाई त्वेषाने म्हणाली, ते काहीही असो, मला तिच्या नवऱ्याच्या शर्टवरचा केस नेमका कुठल्या भवानीचा होता, हे कळणं फार म्हणजे फार गरजेचं आहे, अगदी त्या पापमार्जनापेक्षाही........

आटली बाटली कचकन् फुटली, आईची प्रतिज्ञा मिनिटात तुटली, असं म्हणत दोन्ही मुली खेळायला धूsम् पळून गेल्या !!

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel