कौटुंबिक
मराठी कथा
साटंलोटं.......!!
बुधवार, १० फेब्रुवारी, २०२१
संध्याकाळी कामावरून घरी परत आल्यावर समोर जे चित्र दिसलं त्याने एक क्षण हबकलाच सिद्धेश!!
सकाळी कचाकचा भांडणाऱ्या सासू सुना चक्क गप्पा गोष्टी करत मटारचे दाणे काढत बसल्या होत्या.
हे असं पहिल्यांदाच समोर दिसत होतं, नाहीतर सकाळी भांडण झालं असेल, तर संध्याकाळी दोघींचे नवरे आल्यावर त्यांना आणखी चेव चढायचा. नवऱ्यांनी घरात पाऊल ठेवलं रे ठेवलं की या दिवसभराची कोंडी त्यांच्यावरच फोडायला अधीर व्हायच्या. नवऱ्यांना बिचाऱ्यांना कळायचं नाही सकाळी सुरू होतात, आम्ही कामाला गेल्यावर मधल्या वेळेत काय 'टाईम प्लिज' घेतात की काय या बायका?
आम्ही आल्यावर पुन्हा तिथपासूनच कसं कंटिन्यू होतं?
पण आज काही वेगळीच बात होती. सिद्धेश आला तसं दोघींनीही चहा करायला उठायचं म्हणून अंग हलवलं, सासूबाईंची गती हळू होती, तेवढ्यात सुनबाई, गौरांगी अर्धी उठली होती, म्हणून त्यांनी मोठ्या मनाने तिलाच चहा करण्याची अनुमती दिली.
त्या अनुमतीचा आदर करून गौरांगीनेही ताबडतोब सिद्धेशच्या हातात कडक चहाचा कप ठेवला. वरून सासूबाईनाही विचारलं, तुम्ही घेणार का घोटभर?
सासूबाईंनी गालात हसून मानेनेच नाही म्हटलं.
ते सर्व बघून सिद्धेश मोठ्या अचंब्याने म्हणाला, काय सासू सून फॉर्मात दिसताय आज? सकाळी आकाडतांडाव केलात त्यावरून तर वाटलं की आता घरी गेल्यावर एकमेकींची डोकी फोडण्याचा कार्यक्रम बघायला मिळतोय की काय?
चहा पाण्याची तर अपेक्षाच नव्हती. बाबांनाही आल्यावर शॉक बसेल एकदम!!
फोन करून सांगतो त्यांना, उगाच वेळ काढत फिरत असतील इकडं तिकडं. तेवढा शॉक पण कमी लागेल, फोनवरच आज घरी आलबेल आहे कळल्यावर.
काय नेमका बेत काय आहे दोघींचा?
काही नाही रे........सासूबाई बोलल्या तशी गौरांगीही पटकन म्हणाली, खरंच काहीच नाही.
पण सिद्धेशला दोघीही धडधडीत खोटं बोलतायत असंच वाटलं. जाऊ दे, बाबा आल्यावर सांगतील, असं म्हणत त्याने तो विषय सोडून दिला.
"आश्चर्यकारक रित्या आज घरी सर्व सुरळीत आहे", असा बाबांंना चटकन मेसेज मात्र त्याने करून टाकला.
थोड्या वेळाने बाबाही घरी आले, डोळ्यांनी पाहिलं तेव्हाच त्यांचा विश्वास बसला आणि सिद्धेशला म्हणाले, मला वाटलं तू मस्करी करतोयस. काय भानगड असावी रे?
काय कळत नाही बुवा, म्हणत सिद्धेशनेही खांदे उडवले.
स्वैपाकपाणी, जेवणखाण सगळं शांततेत पार पडलं. आता झोपायचं तेवढं बाकी होतं. बापलेकाला खात्री झाली, एवढं केलं तर बायका तेवढं तर नक्की सुखाने करून देतील.
पण मोठ्या बाईने आता तात्काळ हॉलमध्ये मिटिंग घेतली जाणार आहे, अशी घोषणा केली. आणि एकाएकी बापलेकांना अजीर्ण झाल्यासारखं वाटू लागलं.
हॉलमध्ये दोन्ही बाया आधीच ठाण मांडून बसल्या होत्या.
दोघं बापलेक बापूडवाणे चेहरे करून मिटींगला बसले.
गौरांगीने त्यांच्या हातात पाकीट दिलं.
सिद्धेशने विचारलं, काय आहे हे?
गौरांगी म्हणाली, मला काय विचारता विचारा तुमच्या आईला.....
सिद्धेशने आईकडं पाहिलं. ती म्हणाली, मला काही विचारू नकोस, विचार तुझ्या बायकोलाच....
कोणी सांगणार आहे का?, सिद्धेशने त्यातल्या त्यात आवाज वाढवून विचारलं.
गौरांगी म्हणाली, नोटीस आहे.
कसली? असं म्हणत सिद्धेशने घाईनं पाकीट उघडून ती नोटीस पटकन वाचून काढली. अन् बाबांकडे पास केली.
बाबांनीही वाचलं आणि म्हणाले, अगं बायांनो, सोसायटीने नोटीस पाठवलीये आपल्याला.
सगळ्यांच्या एकमताने सह्या आहेत याच्यावर.
तुमचा धिंगाणा त्यांना सहन होण्यापलीकडचा आहे असं त्यांचं मत आहे.
त्यांना मत दयायला काय जातय? तसंही या सोसायटीत राहायचय कोणाला?, सासूबाई आवाज चढवून म्हणाल्या.
म्हणजे? बापलेकांनी एकदमच विचारलं.
म्हणजे आम्ही ठरवलंय. इथून बाहेर पडायचं. तशाही ह्या खोल्या जरा लहानच आहेत. किती वर्ष काढली मी इथे. पोराचा जन्म पण इथेच झाला, लग्न झालं. म्हणता म्हणता तीस वर्षे झाली इथे. सासूबाई हे म्हणाल्या तसं गौरांगीही त्याला दुजोरा देत म्हणाली, हो ना, आम्हा दोघींनाही वाटतय. इथून बाहेर पडावं. इथली लोकं पण उगीच दुसऱ्याच्या घरात तोंडं घालणारी आहेत. भांडणं काय कुणाच्या घरात होत नाहीत?
तुमच्याएवढी नाही होत ग, बाबा जोर देऊन म्हणाले.
गप्प बसा. अशा सह्या करून नोटीस पाठवून त्यांनी आमचा अपमान केला आहे, आम्हाला इथे राहण्यात मुळीच इंटरेस्ट नाही. तुम्ही दोघं दिवसभर बाहेर असता, आम्हाला आता मनासारखं घर हवं.
तुमचीही नोकरी आहे अजून चार वर्ष. सिद्धेश पण कमावतो भरपूर. सोनं चांदी मागतोय का आम्ही? मनाजोगं घरच मागतोय ना?
आमच्या मागण्यांकडे लक्ष कधी देणार तुम्ही?
ते काही नाही आज काय तो फैसला झालाच पाहिजे, सासूबाईंनी मागणी धरून ठेवली. तसा सुनेनही जोर लावला, नव्या घरात आम्ही सासू सूना गोडीगुलाबीने राहू, आम्ही ठरवलं आहे आता तसं. संध्याकाळी बघितलात तो डेमो होता त्याचा.
अस्स् का? तुम्ही घरात शांती प्रस्थापित करायचं एवढं मनावर घेतलंय तर घराचं बघतो आम्हीही, काय रे सिद्धेश?
हो बाबा विचार करावा लागेल आता आपल्याला.
शोधायला लागूया जागा, सिद्धेशकडेही पर्याय नव्हता. तशी गौरांगी रोज रात्री नव्या जागेसाठी भुंगा घालायचीच कानाशी. आता आईनेही तिला हाताशी घेऊन हेका धरला म्हटल्यावर ना बोलायची सोयच नव्हती काही.
दोघांच्याही होकाराची लक्षणं दिसताच, गौरांगी उत्साहाने म्हणाली, जागा शोधायचं टेन्शन घेऊ नका. ती आम्ही दोघी बघून पसंत करून आलोय.
अगदी आम्हाला हवं तसं घर आहे. माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याचीच डेव्हलपमेंट आहे. फसायचा काही प्रश्न नाही. तसंही उद्या सुट्टीच आहे, आम्हाला आवडला म्हणजे तुम्हाला नक्की आवडेलच, यात शंकाच नाही. दिवसही चांगला आहे.
शुभमुहूर्तावर बुकिंगच करून येऊया........
बापलेकाने एकमेकांकडे बघितलं. सासुसूनेचं 'साटंलोटं' आत्ता कुठे त्यांच्या नेमकं लक्षात आलं!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article