कौटुंबिक
मराठी कथा
उत्सव......!!
मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२१
त्या गावचा उत्सव हा गाव सोडून गेलेल्या मंडळींसाठी आवर्जून गावात यायचं आवडतं कारण होतं!! कुठल्या सणासुदीला गावाला यायचं सोडतील एकवेळ, पण उत्सवाला हटकून यायचं असायचाच सगळ्यांना. गावात एकुलतं एक मंदिर होतं गणपतीचं, वर्षानुवर्षे माघी गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा होती गावात.
गाव काही जास्त मोठं नव्हतं. पूर्वी निदान माणसं होती तरी, आता तर रिकामी घरच जास्त होती. बरीचशी मंडळी शहराकडे पळाली होती. जी होती ती आपली शेती करत, वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत गाव सोडवत नव्हतं म्हणून टिकून होती.
शशिकांतही त्यातलाच होता. त्याचे दोन्ही भाऊ नोकरीनिमित्त गाव सोडून कायमचे मुंबईकर होऊन बसले होते. शशिकांत मात्र आजोबांपासूनचं किराणामालाचं दुकान सांभाळत गावातच राहिला होता. अगदी काही छान नसली तरी वाईटही नव्हती परिस्थिती त्याची. घर होतं आणि गावात तसा खर्चही कमीच होता, त्यामुळे कमी काही पडत नव्हतं.
जमीनही होती थोडीफार. पण तिचं उत्पन्न जमेत घेता येण्याएवढं नव्हतं.
शशिकांतचं घरदेखील मागच्या वर्षीपर्यंत उत्सवाच्या दोन दिवस अगोदर खूप साऱ्या माणसांनी भरलेलं असायचं.
गावाबाहेर असणारे दोन्ही भाऊ त्यांच्या कुटुंबासह उत्सवाला यायचेच यायचे. मंदिराबरोबर शशिकांतच्या घरातही आनंदोत्सव असायचा.
शशिकांतची आणि त्याच्या बायकोची, शैलाची पंधरा दिवस आधीपासून लगबग सुरू व्हायची. माणसं वाढायची, कामही पडायचं खूप, पण शैला सर्वांचं सगळं अगदी मनापासून करायची.
कामात सरशी होती तिची चांगलीच. काही वाटायचं नाही तिला माणसं वाढली तरी!!
पण या वर्षी मात्र त्यांच्या घरात उत्सव दोन दिवसावर आला तरी काही गडबड नाही म्हटल्यावर गावातली लोक येऊन येऊन त्यांना विचारायला लागली होती. गावातली सगळी घरं भरली अन् तुमचं रिकामं कसं अजून? मुंबैकर येणार नाहीत काय यंदा?
हे ऐकून शैलाचे डोळे भरून येत होते. तर शशिकांतच्या मनात चलबिचल आणखी वाढत होती. आपण हट्ट धरून चुकलो तर नाही ना, असं उगीच वाटत होतं त्याला.
कारण म्हटलं तर छोटं आणि म्हटलं तर मोठं होतं.
चार गुंठे वडिलोपार्जित जमीन होती त्यांची गावात, सगळी जाऊन तेवढीच काय ती उरली होती. पण तीही धाकट्या भावाच्या डोळ्यात आली. ती विकावी असा प्रस्ताव मांडल्यावर दुसऱ्या भावानेही लगेच होकार दिला. दोन्ही भाऊ शशिकांतच्या मागे लागले, मात्र शशिकांतला आपल्या मागच्या लोकांचं सगळंच फुंकून टाकावं वाटत नव्हतं. जेमतेम का उत्पन्न देईना, पण विकायला त्याचं मन धजत नव्हतं. त्याने ठाम नकार दिला तशी भावांची तोंड फिरली. त्यानंतर फोन काय साधा मेसेजही महाग झाला त्याच्या भावांसाठी. रुसवा धरून बसले ते बसलेच.
काय तो एवढासा जमिनीचा तुकडा, आपल्या भावांना टोचावा, आणि त्यावरून एवढं रामायण होऊन सगळ्यांची तोंडं वेगळ्या दिशेला व्हावीत, याचं शशिकांतला खूप वाईट वाटत होतं.
शहरातली भावंड आल्यावर कल्ला करून घर आणि गावही हादरवून सोडणारी शशिकांतची पोरंही चार दिवसांपासून एवढुसं तोंड करून बसली होती.
मला वाटलेलं आज तरी येतील, आपलं काय असेल ते असेल पण उत्सवाकडं पाठ नाही फिरवणार कोण.........
माझ्या अगदी मनातलं बोललीस बघ तू शैला. मलाही असच वाटत होतं. आता बघ ना माझंही भांडण झालंच आहे ना त्यांच्याशी, पण मन वाट बघतच आहे ना तरी त्यांची. अगं जन्मापासून एकही वर्ष उत्सव चुकला नाही कोणाचा, केवढी ती हौस आम्हा भावंडांना असायची. गावातलं मंदिर हे आमचं पहिलं प्रेम ग. त्याचा उत्सव तो आमच्यासाठी मोठा सणच!!
छोट्या छोट्या गोष्टींंसाठी नवस बोलायचो आम्ही गणपतीला. आता विचार केला तरी हसायला येत बघ, शशिकांत भावांच्या आठवणीत रमून गेला अगदी.
मग आताही बघा की नवस बोलून, घेऊन ये म्हणावं माझ्या रुसलेल्या भावांना, गावातल्या दोन गरीब घरांंना पोटभर जेवायला घालतो म्हणावं दोन दिवस, शैला सहज बोलून गेली.
अगं ते काय बोललो नसेल का मी?, पण फेडायला एकशे एक मोदक बोललो, आता तू म्हणालीस ते जास्त पटलं मला, मोदकापेक्षा ते करू आपण. पण भावंड यावीत. गजानना तेवढं कर रे बाबा. नाहीतर तुझ्या उत्सवात काय जीव रमणार नाही आमचा, एवढं बोलून शशिकांतने तिथल्या तिथे मंदिराकडे तोंड करून लोटांगण घातलं.
आदला दिवस आला, जरा काही गाडीचा आवाज आला की वाटायचं मुंबैकर आले. पण सगळं फसवं ठरत होतं.
थोडं जास्तीच जेवणही करून ठेवलेलं शैलाने. आलं कोणी तर.......
मनातली आशा मरतच नव्हती.
दिवस गेला, संध्याकाळ गेली, रात्र तोंडावर आली. तरी कोणी येईना, वाट बघून बघून दोन दोन घास घश्यात उतरवले सगळ्यांनी कसेतरी. शशिकांत हात धुवायला उठला, तसा अंगणात कुणी आल्याची चाहूल लागल्यासारखी वाटली. गावातलंच असेल कोणी म्हणून त्याने लक्षच दिलं नाही.
पण अंगणात उभं राहून मुंबैच्या पोरांनी जोरात आपल्या भावंडाना हाक मारली, तशी घरातली पोरं पानावरुन उठली आणि अंंगणाकडे धावत सुटली. इतके दिवस वाट पहायला लावणारे मुंबैकर आलेच शेवटी.......
दोन्ही भाऊ शशिकांतची माफी मागून म्हणाले, दादा चुकलो आम्ही. तुझं खरं. आपल्या बापजादयाचं सगळंच उधळून टाकायला नकोच. ती मूळच शेवटी खेचून आणतात रे. आज आम्हाला आणलं उद्या आमच्या पोरांना आणतील.
गाव कधीच कायमचा सुटणार नाही कोणाचाच.........
घर भरलं, देवाने ऐकलं. म्हटल्यावर शशिकांतने पुन्हा मंदिराकडे तोंड करून लोटांगण घातलं. आणि म्हणाला, उद्या तसंही गावजेवण आहे.
पण परवापासून दोन दिवस मी तुझा नवस फेडणारच बघ.
भावांना नवसाचं कळलं तेव्हा ते ही म्हणाले, दोन घर तुझी, आणि अजून दोन दोन आमची. सगळे मिळून नवस फेडू.
ते ऐकून शैला म्हणाली, चला म्हणजे यंदाचा उत्सव चांगलाच सार्थकी लागणार म्हणायचं आपल्याला !!
त्यावर सगळ्यांनी हसून होकार भरला, अगदी मंदिरातल्या उत्सवमूर्तीने सुद्धा.........!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article