तिला चालेल ना.......??


क्षितीच्या सासूबाईंना जाऊन सात दिवस झाले. पुढच्या दिवसकार्याचं सर्व आटोपशीर पद्धतीने करावं, असं तिने ठरवलं. बाकीच्या जवळच्या नातेवाईकांनाही ते पटलं. तसं सासऱ्यांच्याही कानावर घालावं म्हणून ती त्यांना सांगायला गेली.
तिने त्यांना समजावून सांगितलं, सर्व दिवस वेगवेगळे करण्यापेक्षा आपण एकाच दिवशी सर्व करणार आहोत. सर्वकाही व्यवस्थित पण थोडक्यात होणार आहे. 
सासरे म्हणाले, ठिक आहे. जसं तुम्हाला योग्य वाटतं. माझी काही हरकत नाही. पण तिला चालेल ना? तिला राग तर येणार नाही ना?

ते असं बोलले, मात्र त्याने क्षितीचा तोल सुटला. 
तिला राहवलं नाही आणि म्हणाली, तुम्ही विचारताय हे? तिला चालेल ना?
याची पर्वा जर अगोदर केली असती तर अजून खूप जगल्या असत्या हो माझ्या सासूबाई!!
बासष्ट काही वय नव्हतं, त्यांच्या जाण्याचं........

काहीही काय बोलतीयेस सुनबाई? मी काय केलं? उलट तिच्या शेवटच्या दिवसात तिचा एक शब्द खाली पडू दिला नाही मी. ती म्हणेल ते तिच्या समोर हजर करत होतो, सासरेबुवा तत्परतेने म्हणाले.

क्षितीच्या डोळ्यात निखार भरला. कितीही आवरलं तरी आत धुमसणारा राग बाहेर पडलाच आणि ती म्हणाली, शेवटच्या दिवसात ना? काय उपयोग त्याचा? 
जन्मभर तुमच्या मनासारखं नाचवत आलात तुम्ही त्यांना. स्वतःला प्राधान्य देऊन नेहमी जगलात.
लग्न झाल्यावर वर्षातच भर कुटुंबातून तुमच्या बढतीच्या अट्टहासापायी उठवून नेलंत तुम्ही त्यांना,
कुठल्यातरी अनोळखी प्रदेशात. त्यांची मुळीच यायची इच्छा नव्हती, एकत्र कुटुंब आवडत होतं त्यांना, माणसात रहायला आवडत होतं. त्या म्हणाल्याही होत्या तुम्हाला, तुम्ही जावा. मला इथेच रहायचय, नाहीतर बढती नाकारा. काहीतरी दुसरा उपाय काढा. पण मला माणसांच्यातून काढू नका. 
पण ऐकलं नाहीत तुम्ही. फरफटवलं तुमच्या मागे तुम्ही त्यांना. तुमची सोय बघण्यासाठी......
तेव्हा नाही विचार आला, तिला चालेल ना?

असं काही नाही अगदी. मला वाटलं, तेवढाच तिलाही बदल मिळेल. ती रुळली नाही. माझी काय चूक त्याच्यात?

तेच तर तुम्हाला तुमची चूक कळलीच नाही कधी!!, क्षिती डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली.

तेव्हाच काय, अगदी आताही तेच केलत........
आमचं लग्न झालं. नातवंडं आली. सासूबाईंचं मन त्यांच्यात छान रमायला लागलं. पण तेही तुम्हाला पाहवलं नाही. रिटायर झालात आणि डोक्यात खूळ काढलंत. गावी घर बांधून रहायचं. गाव एन्जॉय करायचा. पण त्यांना नव्हतं हो तसं वाटत. त्यांना त्यांची नातवंड, आजीपणा एन्जॉय करावा वाटत होता. त्या नको म्हणत होत्या, आम्ही नको म्हणत होतो, तरी तुमच्या 'हो' साठी त्यांना तुम्ही पुन्हा एकदा फरफटवलत.
तरी त्या म्हणाल्या कितीदातरी, मी राहते इथेच. 
तू नसशील तर माझं कसं होणार, या वयात हाल होतील. म्हणून माणसातून पुन्हा एकदा उठवून नेलत त्यांना तुम्ही. 
का नाही विचार केलात तेव्हा तिला चालेल का?
एकट्या पडल्या हो त्या तिथे. त्यांना बोलायला नातवंड हवी होती, आपल्या घरातली माणसं हवी होती, तुमच्यासारख्या माणुसघाण्या नव्हत्या हो माझ्या सासूबाई.......
नाही रमला जीव त्यांचा, मानसिक आजार जडला. अन् तेव्हा मात्र स्वतःला झेपेना म्हणून इकडे घेऊन आलात. 

का नाही प्रश्न आला मनात तेव्हा, तिला चालेल ना?
माणूस गेल्यावर बरं सुचतय हो तुम्हाला विचारायला, तिला चालेल ना?

आता जाऊन रहा खुशाल, गावच्या घरात. तशीही माणसं नकोच तुम्हाला. एन्जॉय करा गावचं घर एकट्यानेच, कधी न बोलणारी क्षिती आज इतकी घडाघडा बोलताना पाहून सासरेबुवा केविलवाणं तोंड करून म्हणाले, 
बायको गेली म्हणून एकटं पाडताय तुम्ही मला. तुम्हाला काय माहीत माझा किती जीव होता तिच्यावर. बोलता बोलता भडभडून रडायलाही लागले.

पण त्याने क्षितीच्या आत काहीच हललं नाही....
नाटकी वाटलं तिला ते सगळं. त्याहून खूप खूप वेळा तिने आपल्या सासूबाईंचे घळाघळा वाहणारे डोळे पुसले होते........

त्यांचाच आवडता एकटेपणा त्यांच्या अंगावर टाकून, ती पुढची कामं आवरायला निघून गेली..........

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel