कौटुंबिक
मराठी कथा
शांती........!!
गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१
समृद्धीच्या नवीन घरी वास्तुशांतीची पूजा चालली होती. समृद्धीचे सासर- माहेरचे मोजके नातेवाईक जमले होते.
गुरुजींची पूजा अतिशय नेटक्या पद्धतीने चालली होती. आपण नेमकं काय काय करतोय ते सगळ्यांना समजावून देत त्यात उपस्थितांना सामावून घेत सर्व चाललं होतं. त्यामुळे तिथे असलेल्या प्रत्येक जणांना प्रसन्न वाटत होतं. वेगळा अनुभव मिळाला होता. नाहीतर बरेच ठिकाणी नातेवाईकांची फक्त उपस्थिती असते, गुरुजींचं पूजापाणी होईपर्यत नातेवाईक एकतर कंटाळून तरी जातात, नाहीतर दुसऱ्या खोलीत गप्पा हाकत बसतात.
पण ही सर्वांना एकत्रित आणणारी, त्यामागचे विचार स्पष्ट करणारी पूजा सर्वांना भावून गेली.
गुरुजी सर्व आटोपून उठले, तशी समृद्धीची आत्या त्यांच्याजवळ गेली, आणि म्हणाली, काय हो गुरुजी, श्राद्ध घालणं बंद केलं तर काय गेलेला माणूस कामात अडथळा घालतो का हो?
तिने पटकन असं विचारल्यावर गुरुजींसकट घरातले बाकीचेही तिच्याकडे आ वासून पाहू लागले.
गुरुजींनी मंद स्मित केलं आणि म्हणाले, काय ते सविस्तर सांगा.
समृद्धीची आत्या म्हणाली, अहो आमचे सासरे जाऊन दहा वर्ष झाली, पाच वर्ष आम्ही श्राद्ध घातलं. नंतर सोडून दिलं. पण चार वर्ष झाली, माझ्या मुलाचं लग्न ठरत नाहीये, म्हणून आमच्या गावाकडच्या गुरुजींना विचारलं तर त्यांनी कुठली एक पूजा घालायला सांगितली, ती पण घातली आम्ही.
त्यानेही काही झालं नाही मग म्हणाले, तुमच्या घरातल्या गेलेल्या माणसानं अडवून ठेवलंय कार्य.
त्याच्या शांतीसाठी बरंच काही करायला सांगितलंय आणि खर्चही मोठा आहे खूप.
तुमचं सगळं बुद्धीला पटणार वाटलं म्हणून तुम्हाला विचारतेय हो........
गुरुजींनी शांतपणे विचारलं, गेलेला माणूस तुमच्या मुलाचा कोण होता?
आत्याने सागितलं, नातू होता की हो!!
हिडीस फिडीस करायचे का ते नातवाला सारखे? पाण्यात पहायचे का त्याला?, गुरुजींनी पुढचा प्रश्न केला.
छे हो!! लाडका नातू होता त्यांचा. जीव होता हो माझ्या पोरावर त्यांचा, बोलता बोलताच आत्याचा कंठ दाटून आला.
अहो मग मला सांगा, तेच आजोबा आपल्या लाडक्या नातवाच्या लग्नात खो घालणं शक्य तरी आहे का? कुठल्या आजीआजोबांना आपल्या नातवंडांच भलं झालेलं पाहवणार नाही?
आजीआजोबाच नाही तर गेलेलं कुठलंच माणूस आपल्या कुठल्याही कार्यात कधीही विघ्न घालत नाही. पण जरा कुठल्या गोष्टीला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला तर आपण आपलं खुशाल त्या गेलेल्या माणसांवर सारं ढकलून देतो. कधी काही योग यायचे तेव्हा येतात, किंवा बरेचवेळा ते आपल्याकडूनच पुढे ढकलले जातात. आपलं काही चुकतंय का हे शोधायचं सोडून आपण भलताच विचार करून वेळ तर दवडतोच, अन् भरमसाठ पैसेही वाया घालवतो. लग्नाचं म्हणाल, तर आता सर्वांच्याच अतिचिकित्सकपणामुळे आणि अवाजवी अपेक्षांमुळे सगळीकडेच तो एक गंभीर प्रश्न होऊन बसला आहे. बरीच लग्न लवकर ठरत नाहीयेत. तुमच्यासारखी मुलाच्या- मुलीच्या लग्नाची वाट पाहणारी भरपूर घर आहेत.
समृद्धीने आत्याला विचारलं, झाल्या का एकदाच्या तुझ्या शंका दूर?
आत्याचा नवराही म्हणाला लगेच, बघ मी तरी तुला सांगत होतो. जिवंतपणी कधी आमच्या वडिलांनी कुणाला त्रास नाही दिला, गेल्यावर ते काय देणार?
मग ते सांगितलेलं काय काय करू नको ना आम्ही? नक्की ना?, आत्याचं मन तरी साशंक होतच.
बघा आता. मी माझ्या परीनं खुलासा केला. बाकी काय तो तुम्ही सारासार विचार करा आणि ठरवा.
नको तिथे वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ आणखी चार स्थळं शोधण्यात घालवलेला बरा किंवा आपल्याला नेमकं काय पाहिजे हे ठरवण्यात घालवला तर काहीतरी चांगलं जमून येऊ शकतं, गुरुजी अगदी मुद्देसूद बोलत होते, उपस्थित सर्वांना पटत होतं.
समृद्धीकडच्या वास्तुशांतीला हजेरी लावल्याबद्दल सर्वानाच समाधान वाटत होतं. बऱ्याच गोष्टी मनात अगदी क्लिअर होऊन गेल्या होत्या.
पण आत्याला पटलं की नाही ते कळायला मार्ग नव्हता. कितीही म्हटलं तरी मनावर जुन्या विचारांचा पगडा जास्त होता. नवीन स्विकारायला मन कचरत होतं. कार्यात येणारं अपयश कुणावर तरी ढकलून मोकळं होणं सोप्पं, मात्र ते आपल्या अंगावर घेऊन त्यातून स्वतःच मार्ग काढणं तसं जिकिरीचं!!
समृद्धीला आत्याची काळजी कळत होती. एकुलता एक मुलगा होता तिचा. तिचे डोळे सूनमुख पाहण्यासाठी आसुसले होते. तिने अजूनही संभ्रमात असलेल्या आत्याला आपल्या जवळ बसवलं, आणि आश्वासन दिलं, आम्ही इथे जमलेले सगळे तुला सून आणण्यासाठी तितकेच प्रयत्न करू. पण आता भलतं सलतं कुणाबद्दल मनात आणू नकोस. आणि कुणाच्या सांगीव़ांगीनं बुद्धी गहाण ठेऊन तर काहीही करू नकोस.
आत्याला जरा धीर आला. त्यातून उपस्थित सर्वांनीच मुलगी शोधण्याचं काम अंगावर घेतलं म्हटल्यावर, तिला नव्याने हुरूप चढला.
अहो, सर्वांना पोराची पत्रिका व्हाट्सप करून टाका बरं चट्कन, असं म्हणत तिने लगेच आपल्या नवऱ्याला कामाला लावलं.
वास्तुशांतीबरोबर आत्याबाईंंच्या मनाची शांती तर झालीच पण वरती आजोबांवर टाकलेला वक्रदृष्टीचा आळ निवळल्यामुळे त्यांनाही खऱ्या अर्थांनं सुटल्यासारखं झालं असणार नक्कीच!!
काय वाटत तुम्हाला?
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article