इन्स्पेक्शन..........!!

एक साथ नमस्तेss.....

वर्गात इन्स्पेक्शनला आलेल्या साहेबांकडे बघत चौथीच्या वर्गातली पोरं जीव तोडून ओरडली.
बाईंनी सागितलं होतच तसं!!
साहेब आले की एका दमात सर्वांनी नमस्ते करायचं.
साहेबांनी पोरांना बसायला सांगितलं. पोर चटदिशी खाली बसली, टक लावून फक्त साहेबांकडेच बघू लागली.

बाई रुमालाने घाम पुसू लागल्या. इन्स्पेक्शन म्हणजे पोरांसकट त्यांच्याही जीवाला घोर.
तशा पोरांना घोर लावायला कारणीभूतही त्याच.

आठ दिवस अगोदरपासूनच पोरांना आता इन्स्पेक्शन होणार आहे, मोठे साहेब येणार आहेत.
त्यांच्यापुढं असं वागायचं, तसं वागायचं. दंगा अजिबात करायचा नाही. हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन गप्प बसायचं. सगळं दप्तर नीट भरून आणायचं. साहेबांनी प्रश्न विचारला की हात वर करून उत्तर द्यायचं. मध्ये बोलायचं नाही. आणि सर्वात महत्वाचं, 'शु'ला जाऊ का? म्हणून कोणीही विचारायचं नाही. साहेब जाईपर्यंत कळ काढायची. बकाबका खाऊन यायचं नाही.
सर्वांनी स्वच्छ धुतलेला गणवेश घालून, केसांना व्यवस्थित तेल लावून, तोंडाला पावडर लावून यायचं. आपल्या वर्गाचं कौतुक केलं पाहिजे साहेबांनी. 
स्वतःचा आणि पोरांचाही घसा कोरडा होईपर्यंत घोकवून घेतलेलं.
घोरपड्यांचा विनू शेवटी कंटाळून म्हणाला सुद्धा, आमाला म्हाईती हाय सगळं. पयलीपासून लय साहेब येऊन गेले असे.
बाईंना खरंतर त्याच्या आगावपणाबद्दल त्याच्या पाठीत चांगला धपाटा घालावासा वाटत होता. इतरवेळी घातलाही असता, पण ऐन इन्स्पेक्शनीत या वांड पोरांनं घोळ घालू नये म्हणून 'शुद्ध बोलायचं शुद्ध' एवढंच म्हणून बाई गप पडल्या.
पण चुकीचं नव्हतं पोराचं. बाईच नवीन होत्या. त्यांचच या शाळेतलं पहिलं इन्स्पेक्शन होतं. 
त्यांना धाकधूक जास्त होती. वाईट शेरा त्यांच्या नोकरीवर गदा आणेल, याची बाईंना भीती होती.

इन्स्पेक्शनचा दिवस जसा जवळ येत होता तशी बाईंची रात्रीची झोप कमी कमी होत चालली होती.
आणि आली तरी पोरं धिंगाणा घालतायत, कुणी वर्गात गाढवासारखं लोळतय, कुणी माकडासारखं उड्या मारतय, पोरी एकमेकींच्या वेण्या सोडतायत, कुणाच्या डोक्यात पाट्या घालतायत हे आणि असलंच दिसत होतं समोर.
झालं तर कुणी गणवेशच घालून आलं नाहीये,  साहेबाकडं बघून कुणाच्या तोंडातून एकही शब्द फुटत नाहीये, अन् ते पाहून साहेब रागावून ताड ताड वर्गातून निघून जातायत.......
भीतीनं बाई रात्री अपरात्री दचकून उठायला लागलेल्या. या गावातल्या शाळेतल्या पोरांचा फार धसका घेतलेला त्यांनी. पहिलीच नोकरी होती त्यांची, सहज म्हणून अर्ज केला आणि मिळाली. आणि त्यापायी शहरातून गावात यायचा घाट घातला. नाही म्हटलं तरी गरजही होती पैशांची.

अन् बघता बघता तो दिवस उजाडलाच.

बाईंनी सगळी भीती मनात ठेवून जरा दबकतच पाऊल ठेवलं वर्गात. तोंडात देवाचं नाव घेतच त्यांनी वर्गाकडे नजर फिरवली.

एकूण एक पोरांनी सांगितलेलं ऐकलं होतं. सगळे अगदी टापटीप आले होते. बाईंच्या तोंडातून जोरात हुश्यs बाहेर पडलं.
तशी चारपाच पोरींची पावडर जास्त झाली होती, ती बाईंनीच त्यांच्या रुमालाने टिपुन दिली.
दिन्या नाईकाच्या नाकाच्या भोकातून डालडा बाहेर झिरपत होता, तो शर्टाच्या बाहिने पुसायला जाणार एवढ्यात बाईंनी त्याला हटकलं, आणि आपला जास्तीचा रुमाल त्याला देऊन टाकला.  शाळेत लागल्यापासून जास्तीचे दोन तीन रुमाल ठेवायची सवयच करून घेतलेली बाईंनी. 
बाई एकेक पोरा- पोरीला निरखत होत्या. कर्व्यांच्या राणीच्या तोंडावर बारा वाजलेले दिसले, तसं त्यांनी विचारलं, काय ग काय झालं?
ओकारी येती वाटतंय......
हे ऐकून बाईनाच मळमळायला लागलं. त्यांनी पर्समधली आवळा सुपारी तिला दिली, आणि तोंड दाबून गप्प बसायला सागितलं.

तेवढ्यात साहेब वर्गात शिरले. बाईंनी गंभीर तोंड केलं. पोरांनी उभं राहून एका सुरात नमस्ते केलं.
एक मिनिटं असच गेलं. साहेब पोरांकडं अन् पोरं साहेबांकडं शांततेने बघतायत हे बाईंनाच बघवलं नाही आणि त्यांनी पोरांना कविता म्हणायला सांगितली.
पोरांचा सूर गगनाला भिडायला लागला, तेव्हा साहेबांनीच हातानी त्यांना शांत बसायला सागितलं.
पोर गुंगली होती, त्यांच्या मेंदूपर्यंत ते पोचलच नाही. मग साहेब तोंडाने म्हणाले बास, पोरांना तेही ऐकू गेलंच नाही. पोरांबरोबर बाईही तल्लिन झाल्या होत्या. साहेबांना कान फोडून घेणं भाग पडलं.
कविता संपली तशी साहेबांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. 

आपल्या देशाचे पंतप्रधान कोण?

सगळी मुलं मी सांगू, मी सांगू म्हणून हात वर करून ओरडू लागली. बाईंनी स्वतःच्या तोंडावर बोट ठेऊन शू s केलं. मुलांना आणखी चेव चढला.
साहेबांनी समोरच्या रांगेतला तिसरा पोरगा निवडला. त्याने आत्मविश्वासाने उत्तर दिलं. पंडित जवाहरलाल नेहरू!!

बाळ मी आत्ताचे विचारलं.
ते काय बाईंनी नाय सागितलं अजून, असं म्हणून पोरगं खाली बसलं.

बेअक्कल कुठला !! माझं नाव कशाला घ्यायचं, नुसतं नाही माहीत म्हटला असता तर चाललं नसतं का?, बाईंनी त्याच्याकडे तीव्र रागाने कटाक्ष टाकत दातओठ चावले.

चला, आता मला सतराचा पाढा कोण म्हणून दाखवणार?, साहेबांनी भुवया उंचावून विचारलं.

मोजून चार हात वर झाले.

साहेबांनी मागच्या रांगेतल्या मुलीला उठवलं, चिमणे, तू म्हण बर. चिमणीचं लक्षच नव्हतं.
तिचा मस्त टाईमपास चाललेला. पुढच्या पोरीच्या डोक्यात उवा फिरत होत्या, ती त्या नजरेने टिपत बसलेली.
तिच्या कानापर्यंत काही गेलंच नाही. बाई तिच्या नावाने जोरात ओरडल्या तेव्हा तिने त्या उवांमधलं मन काढलं.
श्या आता सुटणार सगळ्या, असं म्हणत ती मूड हाफ झाल्यासारखं तोंड करत उठली. 
साहेब परत म्हणाले, चिमणे सतराचा पाढा म्हणून दाखव बघू. 
उवा टिपणारी चिमणी म्हणाली, नवाचा म्हणू का नाहीतर अकराचा? सतराचा काय डोक्यात घुसत नाही.........

बाईंचं तोंड बघण्यासारखं झालं.

बरं म्हण कुठलाही. साहेब असं म्हणताच, चिमणीने अकराचा सोप्पा पाढा भरभर चिवचिवला.

आता धडा कोण वाचून दाखवणार बरं?

पुन्हा 'मी वाचू मी वाचू' असा मोठा गलका झाला.

दोन पोरांनी हात वरती केला नव्हता, त्यातल्या एकाला साहेबानी उभं केलं,आणि म्हणाले, वाच मराठीच्या पुस्तकातला कुठलाही धडा.

पोरगा खाली येणारी चड्डी सांभाळत म्हणाला, मराठीचं पुस्तक नाई घावलं आज.

बाई ओरडल्या, सापडलंsss.

साहेबांनी बाईंकडे पाहिलं, आणि पोराला म्हणाले, का रे बाबा?

म्हैत नै. कुठं तरी दडून बसलं घरात......

बाईंच्या हृदयाचे ठोके ढणढणायला लागले.

वर्गातलं एक पोरगं धड बोलत नव्हतं.  

शेवटी बाईंनीच वर्गातल्या त्यातल्या त्यात हुशार पोरीला उठवलं, आणि धडा वाचायला सांगितला.

पोरीने तो धडाधडा वाचला, पण बसताना बाईंना विचारलं, बाई आतातरी शु ला जाऊ द्या की वं? केवापास्नं धरून ठेवलीये. फ्राकात झाली तर घरची लय कावतील.

बाईंच्या चेहऱ्यावर बारा वाजले. संपलं सगळं आता. नोकरी काय रहात नाही, असा विचार करून बाईंनी तिला एकदाचं जायला सागितलं.

त्याबरोबर साहेबही झालं इन्स्पेक्शन म्हणून निघून गेले.

पोरं तर सुटली. मधली सुट्टीची बेल झाली, तशी वर्गाबाहेरही पळाली.
बाई आता आपलं खरं नाही म्हणून डोकं धरून बसल्या. शिपाई बोलवायला आला तेव्हा उठल्या आणि कशाबशा मुख्याध्यापकांच्या खोलीत गेल्या.  

मुख्याध्यापक म्हणाले, या बसा. घाबरू नका. तुमच्या वर्गाच इन्स्पेक्शन चांगलं झालं. पोरं आहेत तशी वागली ते आवडलं साहेबाला. येऊन जाऊन लहानगी पोरंच ती. त्यांना काय कळतंय कशातलं? त्यांच्यासाठी सगळीच मज्जा. तसच असावं त्यांनी!!
त्या साहेबांनी सांगितलं, बाईंना लिंबु सरबत द्या पहिले. फार टेन्शन घेतलय त्यांनी. आणखी थांबलो असतो तर फिट येऊनच पडल्या असत्या बहुतेक. 
घाबरू नका काही वावगा रिपोर्ट नाही पाठवणार ते. अहो ते पण आपल्यासारखेच की. यातून गेलेत ते ही. तुम्ही नवीन आहात सांगितलं होतं मी. गावाकडे माणसं समजुन घेतात एकमेकांना. 
बाईंना ऐकून फार बरं वाटलं. समोर ठेवलेलं लिंबु सरबत घटाघटा पिऊन टाकलं त्यांनी.

तिथून उठल्या, अन् शिपायाला पटकन जाऊन लिमलेटच्या गोळ्यांचं पुडकं आणायला सागितलं.
मधल्या सुट्टीनंतर बाईंनी वर्गात पाऊल ठेवताच सगळा वर्ग चिडीचूप झाला. 
आता बाई बुकलणार, सर्वांना खात्रीच होती.

पण बाई आल्या, आणि कौतुकाने टाळ्या वाजवत म्हणाल्या, आपलं इन्स्पेक्शन चागलं झालं बरं का!!

आता मी तुम्हाला गोळी देणार आहे, ती खायची आणि बाहेर मैदानात आपण सर्वांनी खेळायला जायचं. आज अभ्यासाला सुट्टी!!
पोरं आनंदाने चित्कारली, आणि गोळी तोंडात टाकून बाईंंमागून अगदी शहाण्यासारखी एका रांगेत खेळायला बाहेर पडली........ 

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel