कौटुंबिक
मराठी कथा
ठेच.......!!
सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१
"आई तू खरंच खूष आहेस ना?"
हो रे बाबा, मला अगदी मनापासून छान वाटतय. आपला मुलगा डॉक्टर झाला याचा आनंद कुठल्या आईला होणार नाही सांग?, नभा आपल्या मुलाकडे हर्षिलकडे बघत अभिमानाने म्हणाली.
मात्र हर्षिल पेचात पडला आणि म्हणाला, पण मी जेव्हा त्या दिशेने तयारी करत होतो. तेव्हा तर तू काहीच उत्साह दाखवला नाहीस कधी. मला तर वाटलं मी दुसरं कशात तरी करिअर करावं अशी इच्छा असेल तुझी!!
"बरं मग मी तसं म्हटलं असतं तर ऐकलं असतस का माझं? अगदी खरं सांग?"
"बहुतेक नाहीच. मला लहानपणासुन डॉक्टरच व्हायचं होतं!!"
"आणि तुला सांगू, मलाही तुला डॉक्टरच झालेलं पाहायचं होतं. मला फार वाटायचं घरात कुणीतरी डॉक्टर हवा."
आपल्या आईचं बोलणं ऐकून हर्षिलला तर आश्चर्याचा धक्काच बसला. पण तू तर हे मला आजपर्यंत कधीही सागितलं नाहीस? मला काही कळतच नाहीये आई!! हर्षिलच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं.
नभाने दिर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, याला कारण तुझा दादा आहे हर्षिल.
तुला सांगू, तुझा प्रतिक दादा लहान असताना सारखा स्वैपाकघरात माझ्या मागेमागे लुडबुड करायचा. एवढं मोठं घर आपलं, तरी त्याचं मन माझ्यामागे स्वैपाकघरातच रमायचं. थोडा मोठा झाल्यावर स्टूल घेऊन एका कोपऱ्यात उभा राहायचा आणि मी कणिक कशी भिजवते, पोळ्या कशी करते, कुकर कसा लावते, डाळीला फोडणी कशी देते, कुठल्या भाज्या कशा करते सगळं सगळं अगदी मन लावून बघत बसायचा. त्याच ते इतकं सगळं डोक्यात फिट्ट बसलं की नंतर नंतर तर तोच मला एकेक कृती सांगायला लागला.
थोडा मोठा झाल्यावर तर कधी एखादी भाजी, कधी चार दोन पोळ्या, कधी नाष्टयाचा एखादा पदार्थ अगदी आवडीने करायचा तो.
मी आणि बाबा अगदी मनापासून कौतुक करायचो त्याचं. हाताला चवही होती पोराच्या चांगली.
मग मीही त्याला इंटरेस्ट घेऊन एकेक शिकवायला लागले. तो शिकायचाही.
ते सगळं बघून माझ्या मनात फार यायला लागलं, नव्हे मला जागेपणी डोळ्यासमोर स्वप्न दिसायला लागलं. माझा मुलगा मोठेपणी नामांकित शेफ होणार!!
मी येईल जाईल त्याला सांगायला लागले. त्यालाही बोलून दाखवायला लागले. तू ना शेफच हो, म्हणजे मलाही नंतर जरा आराम मिळेल. तू एकेक मस्त मस्त पदार्थ करून मला खायला घालशील, आणि मी मनसोक्त ताव मारीन.
त्यालाही फार मज्जा वाटायची लहानपणी!!
पण जसजसा मोठा होऊ लागला, तशी डोक्यात काय हवा गेली देव जाणे?
मी जे बोलेन त्याच्या विरुद्ध वागायलाच त्याला जास्त आवडायला लागलं. माझा जाच वाटू लागला त्याला.
आता आपल्या हातात कला आहे, त्याला जोपास, त्यावर आणखी थोडी मेहनत घे. रोज जाऊदे निदान चार दिवसाआड तरी एखादा पदार्थ करून बघ, हे सांगणं जाच झालं का?
कुणी मित्रांनी एकदा काय डिवचलं, पोरीसारखा स्वैपाक काय करतोस तर याने जास्तच मनावर घेऊन आपल्या आनंदाकडेच पाठ फिरवली.
आणि त्याबरोबर माझ्या इच्छेकडेही.......!!
आता सॉफ्टवेअर इंजिनिअर झालाय, पैसा कमावतोय. पण सृजनाचा आनंद मात्र हरवून बसलाय.
आई, तुम्ही एकदा गावाला गेला होतात ना, आम्हाला आजीकडे ठेऊन. तेव्हा त्याने एकदा साधी मुगडाळीची खिचडीच बनवली होती स्वतःहून, पण मी आणि आजीनी ती चाटूनपुसून खाल्ली. नंतर कितीवेळा बोललो मी ही दादाला,
पण त्याने काही केलंच नाही परत. तू म्हणतेस ते खरंय, त्याच्या हाताला भारी चव आहे, हर्षिलला ती खिचडी आठवून आत्ताही तोंडाला पाणी सुटलं.
म्हणूनच मग तुझाही कल लक्षात आल्यावर गप्पच बसायचं ठरवलं. कारण कुठल्या क्षणी तुम्ही बिथराल, आणि हातचं सोडून टाकाल काय भरोसा?
लहानपणी अगदी लाडके असणारे आईबाबा किशोरवयात उगाच जाचक वाटायला लागतात तुम्हाला.
वयाची, मित्राची धुंदी असते ना, आई बाबा सांगतील त्याच्या मुद्दाम उलट वागावं वाटू लागतं तुम्हाला........
बोलता बोलता नभाने आवंढा गिळला, पण स्वतःला सावरून पुढे म्हणाली,
तू लहानपणी सारखा सगळ्यांना चेकअप करत बसायचास, आणि म्हणायचास मोठा होऊन मी डॉक्टर होणार. त्यावेळी माझ्याही मनात सुप्त इच्छा जागृत झाली होती, पण मी दाखवलं नाही मात्र तसं!! आपल्या अगदी घरात डॉक्टर असणं किती छान!!
अरे, आज मला काय वाटतय हे शब्दात सांगूच शकत नाही.........
बस्स् आई, मला आज सर्व मिळालं. मला सारखं वाटायचं, अगदी आतापर्यंत वाटायचं, माझ्या आईला आवडेल ना? तिची काही वेगळी इच्छा तर नव्हती ना!! मी माझ्या स्वप्नाच्या मागे लागून तिला दुखावलं तर नाही ना?
पण आज तुझंही तेच स्वप्न होतं कळल्यावर मला झालेला आनंद अवर्णनीय आहे आई, असं म्हणत हर्षिलने आनंदाने ओरडून आईला उचलूनच घेतलं.
मी तुझ्यासाठी खरंच खूप खूष आहे हर्षिल!!
आता वाटतं, तुझ्या दादासाठीही हेच करायला हवं होतं. उगीच मी इंटरेस्ट घेतला त्याच्यात.....
उगीच माझी इच्छा बोलून दाखवली त्याला........
आईवडील सगळीकडून अडकतात हे मात्र खरं, अगदी मुलांचं कौतुक केलं तरी, त्यांना त्यांच्या आवडीचं काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं तरीही..........
पुढच्यास ठेच मागचा शहाणा म्हणतात ना. त्या ठेचेनंच शहाणं केलं मला.
नभाने डोळ्यातलं पाणी डोळ्यातच थोपवलं, आणि देवापुढे साखर ठेवून माझ्या दोन्ही पोरांना त्यांच्या कामात आत्मिक आनंद मिळो अशी मनापासून प्रार्थना केली!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article