मराठी कथा
सामाजिक
बेफिकीर........!!
शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१
अगदी ताजा अनुभव. देवाला हार घेण्यासाठी मी आमच्या इथल्या चौकातल्या फुलवाल्याकडे गेले. एक छान फुलांनी भरलेला हार फक्त दहा रुपयाला होता. मी तो द्यायला सांगितला.
त्याने पुडी बांधण्यासाठी कागद घेतला, त्यात त्याने दुर्वांचा गुच्छ टाकला, भरपूर तुळशीची पाने टाकली, झेंडूची पिवळी, केशरी सातआठ फुलं, गणपतीसाठी लाल मोठं फुल टाकलं, आणखी चार पांढरी पिवळी फुलं टाकली.
मला कळेना, मी म्हटलं मी दहा रुपये वाला हार सांगितला तुम्हाला द्यायला. फुलं नाही.
फुलवाला म्हणाला, हो देतोय की मग.
मी म्हटलं, तुम्ही फुलं, दुर्वा, तुळस इतकं जास्त देताय मला वाटलं, तुम्हाला फुलाची पुडी द्या, असंच ऐकू आलं असावं.
फुलवाला म्हटला, हे जास्त वाटलं तुम्हाला? अगदी परवाच एक बाई भांडली हो माझ्याशी. हेच सगळं मी नेहमी देतो सर्वांना, तरीही हे तिला कमी वाटलं.
बऱ्याच जणांना हे कमी वाटतं. अजून थोडी फुलं घाला, हे घाला ते घाला करतात. किती दिलं तरी समाधान नाहीच.
ती बाई तर मला फार बोलली त्या दिवशी. खूप वाईट वाटलं मला. मन इतकं दुखावलं की मी त्यादिवशी धंदा बंद केला, आणि सरळ निघून गेलो घरी.
मला खरंच आश्चर्य वाटलं, दहा रुपयांच्या मनाने खूपच जास्त होतं ते सगळं. एवढं देऊनही कोणी भांडू शकतं, हे माझ्या कल्पनेच्या बाहेर होतं.
दुसरा अनुभव अगदी याउलट मी महिन्यापूर्वी घेतलेला.........
एका बऱ्यापैकी प्रसिद्ध देवळात गेले होते. चार फुलं घ्यावी म्हणून मी तिथल्या जवळच्याच दुकानात फुलं विकणाऱ्या बाईंकडे पाच रुपयांची फुलं मागितली. तिने तुच्छतेने माझ्याकडे पाहून म्हटलं, पाच रुपयांची नाही मिळणार. म्हटलं ठिक आहे दहाची दे. त्यात तुळस, दोन पांढरी फुलं घाल. त्यावर ती म्हणाली, तीस रुपयांची घ्या, सर्व येईल. तिला म्हटलं एवढी नको, दहामध्ये घालून दे येईल तसं.
असं करा तुम्ही घेऊच नका काही. तेवढी तरी कशाला घेता?, तोंड वाकडं करून तिने हातातली फुलं होती तिथं टाकून दिली.
मी तिथून निघाले. मला खूपच माजुरीपणाचं वाटलं वागणं तिचं. देवाच्या दारातच श्रद्धेपाई अडवणूक करणारं......
मग पुढच्या दुकानातल्या बाईने दहा रुपयाची नाही वीस रुपयांची देईन, म्हणून कपाळावर आठ्या पाडत सांगितलं.
दोन्ही बायकांच्या चेहऱ्यावर पाच दहा रुपयांची फुलं मागतायत म्हणजे काय फालतू गिऱ्हाईक आहे, असाच भाव होता.
बघितलं तर दोघही एकच गोष्ट विकत होते. ठिकाणं वेगवेगळी होती फक्त.
मात्र चौकातल्या रस्त्यावर कोपऱ्यात बसून हारफुलं विकणारा फुलवाला, जणू देवानेच गिऱ्हाईक पाठवलं असं समजून थोड्याच किंमतीत भरपूर देऊन कृतज्ञता व्यक्त करत होता. तर दुसरीकडे देवाच्याच दारात बसूनही आल्या गिऱ्हाईकाला आम्ही सांगू त्या भावात घ्यायचं तर घे नाहीतर चल फूट, म्हणून वाटेला लावलं जात होतं!!
फुलं विकून देवावरच जणू उपकार आमचे, असा एकंदरीत थाट होता.
असो........
तो जिथे आहे तिथून बघतोय साऱ्यांकडेच.
पण त्याच्या बघण्याची पर्वा करणारे हल्ली कमी झालेत एवढं खरं.
काय वाटतं तुम्हाला.....??
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article