लालसा........!!

महिन्याभराची कमाई हातात पडली, तशी दर्शना आनंदाने हरखून गेली. खूप दिवसांनी स्वतःच्या कमाईचे पैसे बघितले होते तिने. 
आतापर्यंत लहान मुलांना शाळेत सोडायचं आणायचं काम करत होती ती. पण कोरोना आला तशा शाळा बंद झाल्या. तिचं काम ठप्प झालं. तसच तिच्या नवऱ्याचंही. तोही एका खाजगी शाळेत शिपाई म्हणून काम करत होता. सारख्या ह्या त्या नोकऱ्या धरसोड करून शेवटी या नोकरीत वर्ष झालं स्थिरावला होता. अजून नोकरीही पक्की झाली नव्हती. 
पण त्याने वर्षभर टिकवून तरी ठेवलीये म्हणून जरा कुठे निवांत वाटलेलं दर्शनाला, तर नेमका कोरोना आडवा आला होता.

शाळेने पहिले दोन- तीन महिने कसाबसा पगार दिला, आणि नंतर त्याला डिच्चूच दिला. 
हिला पण दहा पोरांपैकी तिघांच्या घरून दोन महिने मदत झाली. पण सारखं तरी कोण कसं देणार? तशी अडचण सगळ्यांचीच झाली होती.

हातपाय मारायला पण बाहेर पडणं कठीण वाटत होतं. प्रश्न जीवाचा होता. अजून पोरं बाळं झाली नव्हती, म्हणून कसं तरी रेटलं गेलं. 

मग हळूहळू सगळे बाहेर पडायला लागले, तसं तिने नवऱ्याला काम शोधायला सांगितलं तर त्याच्या अंगात भरलेला आळस त्याला हलू देईना. 
ही जास्तच बोलायला लागली तर म्हणायचा, एवढंच आहे तर तू शोध की काम. तू आरामात बसून राहणार आणि मी तेवढं रोगराईत बाहेर पडायच का?

नकर्त्याला कारणं हजार, असं होतं त्याचं.

तिला खूप वाईट वाटायचं. मनात यायचं मी कधी घरी राहिलीये अशी? कित्तीवेळा हाच नोकऱ्या सोडून घरी लोळत पडायचा. पण मी एक दिवस चुकवला नाही कधी. आता याला बोलताना काही वाटत पण नाही. 
आणि खरंच तिला हौसही नव्हती घरी बसायची. शिक्षण जेमतेम, त्यात हा रोग. 
तरी तिने पोरांच्या आयांनाही फोन करून सांगितलं होतं, माझ्यासाठी काही काम असेल तर कळवा. 
बरेच महिने रिकामे गेले. नंतर मात्र नवरा कुठंतरी ऑफिसात शिपाई म्हणून जायला लागला. ते सुद्धा काम हिनेच शोधून दिलं त्याला. नुसतं बसायचं होतं म्हणून तोही जायला तयार झाला.
त्याला मिळालं तसं लगेच, हिलाही एका म्हाताऱ्या बाईच्या सोबतीला दिवसभर बसायचं काम मिळालं. तिला लागेल ते खायला प्यायला करून द्यायचं, वेळेवर औषधपाणी द्यायचं. तिच्या सूनेला केव्हापासून दोन-तीन महिन्यांसाठी पोरांना घेऊन  माहेरी जायचं होतं, म्हाताऱ्या सासूमुळे जाता येत नव्हतं. कंटाळली होती ती एका जागी राहून. पैसा खूप होता, पण सांभाळणारा माणूस नव्हता. दर्शनाला दिवसभर सांभाळायचं होतं. रात्री म्हाताऱ्या बाईचा मुलगा बघणार होता. 
दर्शनामुळे तिची सोय झाली. आणि तिच्यामुळे दर्शनाची. 
हातात पैसा येणार या सुखात दर्शनाचा महिना भर्रकन गेला. 
तो एकदाचा हातात पडल्यावर मात्र तिला सर्वात पहिले जाऊन साधा का होईना मिक्सर आणावा वाटला. घरचा मिक्सर इतक्या वेळा दुरुस्त करून आणला होता की दुकानदार त्याला दुरुस्त करायलाही हात लावेना झाले होते.
ती थेट दुकानात गेली. थोडंफार नॉर्मल झालं होतं सगळं. दुकानात आणखी दोन गिऱ्हाईकं होती. 
तरी जागा होती म्हणून ती आत शिरली. 
तिच्या बजेटमधला साधा मिक्सर तिने उचलला. अठराशे झाले, दोन हजाराची नोट तिने दिली तर दुकानदाराने तंद्रीत तिला दोनशे रुपये देण्याऐवजी आठशे रुपये दिले. तिला कळेना, असं काय झालं. पण काही न बोलता ती तिथून निघाली.
मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. लालसा उत्पन्न झाली. वाटलं मिक्सर तर मिळाला, वर सहाशे रुपयांचा फायदा झाला. किती उपयोगी पडतील मला हे. तो दुकानदार काय कमावत असेल रग्गड!! 

तिने बाजारातुन आणखी लागणारं सामान घेतलं. भाजीवालीकडून भाजी घेतली, आणि निघाली तसा भाजीवाल्या बाईने मोठ्याने आवाज दिला. अगं पन्नासची नोट दिली तू मला. भाजीचे पस्तीस झाले. मी तुला पाच रुपये चुकून कमी दिले ग बाय. 
ती खुशीत होती, म्हणाली काय मावशी राहू द्यायचं की. मला एवढं पुढं गेलेलं बोलवून घेतलं ते. मला तर कळलंही नव्हतं.

पण मला कळलं ना बाय. कळून लंपास करणं नाही जमत बाबा आपल्याला. तसली बुद्धी देवानं नाही दिली अजून.
दर्शनाने पाच रुपये घेतले. तिथून तशीच वळली, तडक जाऊन मिक्सरवाल्याला त्याचे चुकून आलेले पैसे परत केले.  
ते घेऊन तिचे भरपूर आभार मानून त्याने ओळखीच्या गिऱ्हाईकाचा फोन फिरवला आणि म्हणाला, तुम्ही तो वॉटर फिल्टर नेलात त्याचे माझ्याकडून नजरचुकीने मूळ किंंमतीपेक्षा जास्त पैसे घेतले गेले. तुम्ही येता परत की पोराला पाठवू घरी?

दर्शनाच्या ते कानावर पडलं. तिने मोह सोडल्याबद्दल स्वतःला शाबासकी दिली. 
त्याबरोबरच ही साखळी अखंड सुरू रहावी, अशीही तिने मनापासून प्रार्थना केली.

मात्र त्यासाठी देवाला नाही आपल्या सर्वांनाच तिला 'तथास्तु' म्हणावं लागेल. कारण काही झालं तरी तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूसच चांगल्या गोष्टीत हातभार लावायला सर्वांत पुढे असतो, हो ना?

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel