रिक्षावाली........!!


आई चल ना त्या रिक्षेतून मला त्यात बसायचंचय एकदा......

अबोली रंगाच्या रिक्षेकडे बोट दाखवत छोटी ओवी आपल्या आईला ज्योतिकाला म्हणाली.
आता नको नंतर कधी, म्हणून ज्योतिका जवळच उभ्या असलेल्या दुसऱ्या रिक्षेत शिरू लागली. पण तिने ठिकाण सांगितल्यावर, रिक्षावाल्याने 'तिकडं नाही जात दुसरी रिक्षा बघा' म्हणून तिला सरळ झटकून टाकलं.

इकडं नाही जायचं तिकडं नाही जायचं, नक्की व्हायचं तरी कुठं असत ह्यांना, कोणास ठाऊक?, ज्योतिका तणतणत दुसरी रिक्षा पाहू लागली.

तेवढ्यात ती अबोली रिक्षाच समोर येऊन थांबली, रिक्षावालीने विचारलं, कुठे जायचं ताई?

ज्योतिका 'कुठं नाही' म्हणत बाजूला झाली, पण ओवी याच रिक्षेतून चल ना आई, करत तिला पुढे खेचायला लागली. तशी रिक्षावाली म्हणाली, ओ ताई घाबरू नका, मी सोडीन तुम्हाला बरोबर.
कुठं जायचं ते सांगा फक्त.........

ज्योतिकाला वाटलं ही पण नाहीच म्हणेल, कुठं जायचं ते सांगितल्यावर, म्हणून तिने पटकन आपलं ठिकाण सांगितलं. 

चला बसा या, अगदी सहज समोरून उत्तर आलं.
तशी छोटी ओवी आनंदाने पुढे जाऊन आत घुसली. ज्योतिकाचाही मग नाईलाज झाला. 
तिने मनात देवाचं नाव घेतलं, आणि रिक्षेत पाय ठेवला.  

ओवी रिक्षा सुरू झाल्यापासून कायकाय बडबडत आनंद घेत होती, पण ज्योतिका मात्र दबून बसल्याने गप्प होती. तिला एकच काळजी लागून राहिली होती, ही बया चालवेल ना नीट? सोडेल ना व्यवस्थित घरी? वीस पंचवीस मिनिटांच अंतर होतं. 
ज्योतिकाला नुसती धाकधूक लागली होती.

पण पुढच्या पाच- सात मिनिटात तिला अंदाज आला. बया एकदम शिस्तीत चालवते आहे. आपण घरी अगदी नीट पोचणार. मग ती थोडी रिलॅक्स झाली.
अन् त्यानंतर मात्र तिला बाईनेच बाईवर विश्वास ठेवू नये, याची लाज वाटली. 
शीs, प्रोत्साहन देणं सोडा, मी तर चक्क खचवत होते हिला. हिच्या रिक्षेत चढायचच नव्हतं मला.
खरंतर मुलीमुळे चढले. तिला वेगळं वाटलं. तिला मज्जा वाटली, एखादी बाई रिक्षा चालवत असताना त्या रिक्षेत बसायची. आणि मला? मला भीती वाटली.........पुरुषाच्या तोडीस तोड उभं राहणाऱ्या बाईच्या रिक्षेतून जायची!! इतकं शिकून विचार मागासलेलेच राहिले की माझे.

चूक उमगली तशी, ज्योतिका स्वतःहून तिला म्हणाली, माफ करा ताई, मी मगाशी चुकले. तुम्ही अगदी छान चालवता रिक्षा.

ताई हे नवीन नाही हो मला. काही बायका पटकन बसतात, अन् काही मात्र कितीही वेळ ताटकळत उभं राहतील पण बाईच्या रिक्षेत बसायला तयार नसतात. 
बाईच बाईला नाही म्हणती, तेव्हा वाईट वाटतं हो खूप.

पण पोटासाठी, कुणी नाही म्हटलं; तरी पुढे पुढे करावं लागतं. नवऱ्याची रिक्षा चालवतेय ताई. तो मेला नाही काही, दुसऱ्या बाईंकडं गेला आम्हाला सोडून.
मग मी पण चांगली जिरवली त्याची. रिक्षा सोडलीच नाही, म्हटलं हात तर लाव रिक्षेला, मुडदा बसलाच तुझा समज.

टरकला तो आलाच नाही परत तोंड दाखवायला. ड्रायव्हर ठेवला होता, पण पैसा काय फारसा सुटत नव्हता. मग मीच मनावर घेऊन शिकले पोरांसाठी. आता तरबेज आहे चांगली. पण बसल्याशिवाय भरोसा कसा होईल कुणाला?  

खरंय ग, मला पण तेव्हाच झाला ना!!, ज्योतिका चुटपुटत म्हणाली.

आता ती बघ समोर बिल्डिंग दिसते ना तिथे थांबव. साईडला रिक्षा लाव आणि चल माझ्या घरी चहा प्यायला.

अहो ताई, नको नको. ही आली तुमची बिल्डिंग. बघा, तुम्हाला सुखरूप पोचवलं की नाही सांगा? परत कुठल्या बाईवर अविश्वास दाखवू नका चहा पाजण्यापेक्षा तेवढं एक मात्र नक्की करा. एका बाईला दुसऱ्या बाईचा धीर आणि शाबासकी लय महत्वाची असते हो!!, रिक्षावाली बोलली तशी ज्योतिका म्हणाली, तेच द्यायला तर घेऊन जातेय ना माझ्या घरी तुला. माझ्या सासूबाईंना तुला भेटवून त्यांनाही सांगेन तुझ्याबद्दल. हा तुझा डायलॉग मार, धीर आणि शाबासकीवाला, त्यांनाही उमजलं तर उमजेल काही!!
माझ्या- त्यांच्यासकट सगळ्याच बायकांना गरज आहे हे समजण्याची......

तसं असेल तर मग होऊनच जाऊ दे फक्कड चहा, ही रिक्षावाली तुमच्या सासूबाई कधी विसरणार नाही बघा!!

मी ही नाही विसरणार, मला खूप आवडली ही रिक्षावाली मावशी, असं म्हणत छोटुशी ओवी टाळ्या वाजवून उड्या मारू लागली.

आणि मलाही आवडली !! कुठल्या होतकरू बाईकडे आता ही बाई कधीच पाठ फिरवणार नाही, थाप देण्यासाठी मात्र जरूर पुढे होईल, ज्योतिका रिक्षावालीकडे बघत अभिमानाने म्हणाली.

रिक्षावालीच्या मनातला आनंद डोळ्यात भरून आला. इतका छान, कौतुकमय दिवस खूप खूप दिवसांनी पाहिला मिळाला होता तिला..........

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel