राजयोग.........!!

आई मी आता इथेच राहणार कायमची, मी नाही जाणार त्या ऋग्वेदकडे परत, चार दिवसानंतर रुंजीने आईला मनातलं सांगितलंच.

अच्छा, हो का? बरं झालं बाई. माझी तीच इच्छा होती नाहीतरी. कसलं ते घर तुमचं? केवढ्याश्या त्या खोल्या, आई तोंड वाकडं करून म्हणताच रुंजी म्हणाली, आई घराचा काही प्रश्न नाही. आणि खोल्यांना काय झालंय. तीन आहेत की मोठ्या, लोकं दोन खोलीत राहतात.

हो का? मग तुझी सासुच. तरी मला वाटलेलंच. तिनेच त्रास दिला असणार माझ्या गोड मुलीला. आम्ही आलो की दिसायचं ना किती काम करायची माझी सोनूली. जीव हळहळायचा माझा. बरं झालं सोडून आलीस ते. इथे आपल्याकडे काही टेन्शन नाही, सगळ्या कामांंना बाई आहे. आणि मी तुझी सासू नाही आई आहे, असं म्हणून तिने प्रेमाने हात फिरवला रुंजीच्या डोक्यावर.

तशी रुंजी म्हणाली, आई उगीच नको हं माझ्या सासूवर आळ घेऊ. त्यांना मुलगी नाही म्हणून फार जपतात त्या मला. एवढं कुठे काम असतं, आणि असतं ते आम्ही दोघी मिळून करतो. 

अगंबाई हो का? मग तुझ्या नवऱ्याचं काय भलतीकडंच........फार वाढलंय बाई तसलं एक फॅड हल्ली. पण माझ्याच पोरीच्या नशिबात असलं असेल असं वाटलं ही नव्हतं कधी!!, रुंजीची आई जावयाच्या नावाने खडे फोडायला लागली.

आई, भलतं सलतं नको ग बोलू. चांगला आहे तो. ऋग्वेदचं तसलं काही नाही. तो खूप प्रेम करतो माझ्यावर.

जाऊदे मग तुला सुख टोचायला लागलं समजू आणि सोडून देऊ. नाहीतरी मलाही एकटीला फार कंटाळा येतो हल्ली. तुझे बाबा काय असून नसून सारखेच. कधी वेळ देत नाहीत मला.
तिची आई अशी बोलली,आणि रुंजी एकदम म्हणाली, हेच आई हेच. मलाही असच वाटतं तो  वेळच देत नाही मला. 

मग तुला नाही देत तर वेळ देतो कुणाला?

त्याच्या कामाला. आणखी कुणाला? मला सांगतो कसा, तुझ्या बाबांनी लग्नाच्या वेळी मला फार कौतुकाने सांगितलं होतं, आमच्या मुलीच्या पत्रिकेत राजयोग आहे राजयोग!! पण माझ्याकडे सगळं अगदी साधं होतं. त्यांच्या मुलीला राजयोग लाभेल असं कुठलंही लक्षण दिसत नसताना त्यांनी मोठ्या मनाने आपलं प्रेम मान्य केलं. मग माझ्या मनातही इच्छा जागृत झाली, ते भविष्य खरं करण्याची!! 
आई त्याला कामापलीकडे काही दिसतच नाहीये, इतकं त्याने झोकून घेतलंय स्वतःला, मला काही वेळच देत नाहीये तो, सासू सासऱ्यांनी पण किती समजावलं त्याला, रुंजीचा चेहरा त्राग्याने पालटला.

ही गोष्ट आहे तर!! मी उगाच माझा ट्रॅक सोडून वाकड्यात शिरत होते. म्हटलं पोरगी स्वतःहून नाही सांगत, सगळ्यांच्या नावाने बोटं मोडून पोरीला बोलतं करूया. खरी गोम बाहेर पडेलच. तुझ्या घरचे सगळे झाल्यावर ह्यांना मुद्दामच मध्ये घातलं. अन् मात्र कोडं सुटल.
लाव फोन जावईबापुंना, आईने फर्मान सोडलं.

मी नाही लावणार, तो कामात माझा फोन उचलत सुद्धा नाही, रुंजी मानेला झटका देऊन म्हणाली.

बघू कसा उचलत नाही, असं म्हणत आईनेच फोन लावला, आणि सासूबाईंचं नाव दिसल्यावर मात्र रुंजीच्या नवऱ्याने ऋग्वेदने तो पटकन उचलला.
रुंजीची आई थोड्या मोठ्या आवाजातच म्हणाली, काय जावईबापू वेळ आहे का आमच्याशी बोलायला?

हो आहे ना? असं का म्हणता? ऋग्वेद सासूबाईंचा बोलण्याचा अंदाज बघून हडबडलाच.

जावईबापू तुम्ही आमच्या पोरीच्या भाग्यातला राजयोग काढून टाकलात हो!!, रुंजीची आई निराशेने म्हणाली.

अहो असं काय म्हणता? मी तर त्यासाठीच रात्रंदिवस प्रयत्न करतोय. ध्यास घेतलाय मी तुमच्या पोरीच्या पायाशी सर्व सुखं आणून ठेवायचा. मोठं घर, मोठी गाडी, मनात येईल ते घेता येईल, एवढा पैसा. काही कमी पडू द्यायचं नाही मला तिला. 
राजयोग...... राजयोग आहेच तिच्या पत्रिकेत, म्हणून तर मला देवाने बुद्धी दिली काम करत राहण्याची, ऋग्वेदला बोलतानाच स्वतःचा अभिमान वाटत होता.

अहो जावईबापू, राजयोगातून उठवलीत तिला, आता कसला राजयोग आणताय? तुम्हाला सोडायचं म्हणतेय ती........

काय?, ऋग्वेदला आश्चर्याचा धक्काच बसला.

राजयोगाचा अर्थ ना तुम्हाला कळला ना खरंतर तिला. अहो हसतं खेळतं घर म्हणजे राजयोग. एकमेकांवर प्रेम करणारं, एकमेकांना समजून घेणारं कुटुंब मिळणं म्हणजे राजयोग. नवरा बायकोने एकमेकांना जीवापाड जपणं म्हणजे राजयोग. कुठल्याही परिस्थितीत कुटुंबातील प्रत्येकाचं मन शांत राहणं म्हणजे राजयोग.
तेच बघून तर तुमच्या लग्नाला मान्यता दिली आम्ही. राजयोगच चालू होता तिचा तुमच्याकडे, तिने किंवा आम्ही तक्रार केली होती का कधी?
तिचा राजयोग तिला समजावून नाही देता आला तुम्हाला एवढच!!

आता मात्र तिची तक्रार आहे. राजयोगात विघ्न निर्माण केलंय तुम्ही तिच्या, जरा अतिच पैशाच्या मागे लागून. तिला तुमचा वेळ हवाय. तुमचं खूप सारं प्रेम हवंय जावईबापू. तोच राजयोग तिच्यासाठी. घरची लक्ष्मी रुसली तर बाहेरची लक्ष्मी  कितीही धावलं तरी हाती लागणार नाही, कळतय का काही?, रुंजीच्या आईचा आवाज त्यांच्याही नकळत वाढला.

ऋग्वेदला सगळ्याचं नीट आकलन झालं. वेळीच सावरलं म्हणून त्याने रुंजीच्या आईचे आभार मानले. 
लगेच रुंजीला फोन करून संध्याकाळी घ्यायला येतोय म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे तो आलाही.......
घरी जाताना निवांत तळ्याकाठी बसून त्यांनी भरपूर गप्पा मारल्या. भेळ खाल्ली, रुंजीच्या आवडीचं आईस्क्रीम खाल्लं.
लग्नाच्या आधी जसं फिरायचे तसं हातात हात घालून सगळीकडे फिरले आणि घरीही तसेच पोचले. ते बघून रुंजीच्या सासूबाईंनी त्यांना दारातच थांबवून त्यांच्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला. दोघं जोडीने पाया पडल्यावर भरल्या डोळ्यांनी सदैव सुखात रहा, असा आशीर्वाद दिला.

ऋग्वेदने माझं प्रेम, माझा वेळ हेच तुझ्यासाठी सर्वात महत्वाचं असेल तर, जन्मभर तुला ते देण्यासाठी मी बांधील असेन, असं रुंजीला घरच्या देवासमोर वचन दिलं.

रुंजीने आईला दुसऱ्या दिवशी फोन करून ऋग्वेदबद्दल खूप काही छान छान सागितलं, त्यावरून आपल्या पोरीच्या पत्रिकेतला राजयोग आता आणखी जास्त फळफळणार याची तिला खात्रीच पटली............

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.

Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel