मराठी कथा
मातृभाषा दिन
धरिला मराठीचा आग्रह........!!
शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१
हो बोला.
ओके. आय एम अश्विन फ्रॉम वेलनोन इन्शुरन्स कंपनी. वुई रिसेंटली लॉन्च सम न्यू प्लॅन्स. कॅन आय एक्सप्लेन दँट टू यु?
हो चालेल. पण मराठीमधून बोलणार असाल तर.
सॉरी. आय कान्ट टॉक मराठी......
मग मलाही इंग्लिश कळत नाही. धन्यवाद.
लेखाने फोन ठेवून सुस्कारा सोडला. इंग्लिशमधली पटर पटर का ऐकून घेऊ मी? माझ्या भाषेत स्कीम सांगितली तर डोक्यात नीट घुसेल ना माझ्या. सगळ्यांना उत्तम इंग्लिश येत असावं असं गृहीत धरून फाडफाड इंग्लिश झाडायला कसे सुरू करतात हे?
ती हे स्वतःशीच बोलत असतानाच तिचा नवरा सर्वेश आतल्या खोलीतून बाहेर आला आणि तिला बघून म्हणाला, काय झालं? एकटीच काय बडबडत बसली आहेस अशी?
बघ ना रे, हे विमा उतरवणारे, बँकावाले, दूरवर कुठेतरी आपल्या स्वप्नातली घरं मिळवून देणारे, फोन उचलला की एकतर हिंदी नाहीतर इंग्लिशमधूनच बडबड करायला सुरू करतात. जणू काही मराठीत विचारल्यावर समोरून कोण शिव्याच द्यायला सुरुवात करणार आहे. मी नाही बोलत कुणाशी, बोलायचं तर मराठीत बोला म्हणते नाहीतर देते ठेऊन फोन.
सोड ना. नसेल येत त्यांना मराठी. काय करावं त्यांनी?, सर्वेश अगदी सहज म्हणाला.
पण त्यावरून लेखा जास्तच भडकली. आणि म्हणाली, नाही येत तर शिकावं त्यांनी.
अरे इतकं वाईट वाटलं ना त्या दिवशी. मी आपल्या बँकेत फोन केला होता. तिथले मॅनेजर माझ्याशी इंग्लिशमधून बोलायला लागले. मी साहजिकच मराठीत बोलणं सुरू केलं तर म्हणाले. Talk in English only.
आता माझी अडचण मी माझ्या भाषेतून नीट सांगू शकते की दुसऱ्या कुठल्या बाहेरच्या?
मला का जबरदस्ती इंग्लिशची? मी तर माझ्या राज्यातच मराठी बोलतेय ना? नाही येत त्यांना तर शिकायला काय होतं? इतकं अवघड आहे का ते?
ज्या राज्यात काम करतो तिथली भाषा शिकण्यात कसला कमीपणा? ग्राहकसेवा ग्राहकांच्या भाषेत दिली तर ग्राहकांपर्यंत पोचेल ना?
तू का एवढी सिरीयस होतेस पण? सोड ना. अशा किती गोष्टी आपण सोडून देतो. हल्ली तेच चालतं सगळीकडे, तिला खुपणारं सर्वेशला तेवढं खुपतच नव्हतं.
आपण चालवून घेतो म्हणून चालतं सर्वेश. आमच्यासारख्या मराठीचा आग्रह धरणाऱ्यांना तुमच्यासारखी मराठी लोकच जिथं वेड्यात काढतात, तिथं इतर भाषिक काय करणार?
आम्ही इतर राज्यात जाऊन मराठीचा आग्रह नाही धरत, आमच्या मराठीच्या राज्यातच धरतोय तर काय चूक रे सांग ना?
त्या दिवशी आपल्या गुंडूने चार मराठी कविता म्हणून दाखवल्या, तर त्याचं कौतुक होण्याऐवजी पोएम्स नाही येत का? हल्ली बारकी मुलं किती छान छान पोएम्स बोलतात, कानाला अगदी गोड वाटतं, हे ऐकवलं गेलं मला. इतकी मराठी माणसांनाच मराठी नको झालीये अरे.........
कुणी मराठी शाळेत पोरांना टाकायचं म्हटलं की इंग्रजी शिक्षण कसं महत्वाचं आहे, हे पटवून द्यायला मराठी माणसंच अगदी हिरीरीने पुढे येतात.
घरभेदी कसा असतो, तसं आपणच आपल्याच राज्यात मराठीभेदी झालो आहोत. हे सगळं चालवून घेऊन. दिवसेंदिवस होणाऱ्या मराठीच्या ऱ्हासाकडे दुर्लक्ष करून........
तू म्हणतेस ते पटतंय मला. पण फक्त तू आणि मी विचार करून काय होणार? बहुमत विजयी ठरतं नेहमीच!! सर्वेश त्याच्या परीनं लेखाला समजावू पाहत होता.
पण तू आणि मी सुरुवात तर करू शकतो ना? केलेली सुरुवात टिकवून तर ठेवू शकतो ना?
बहुमत होणारच नाही कधी असं गृहीत धरून का चालायचं आपण?
तसंही सुरुवातीला सर्व एकटेच असतात.......
आपल्याला टोचतय ना, मग तरीही आपण प्रवाहाबरोबर का वाहत जावं?
भले बोलू दे समोरून कोणी कोणतीही भाषा, आपण आपली बोली मराठीच ठेवली तर......?
इच्छा असणारा नक्की समजून घेऊ शकतो. पण आपण वाव कुठे देतो? आपण स्वतःहून आपली भाषा सोडून त्याच्या भाषेत बोलायचा मोठेपणा स्वतःकडे घेतो नाही लगेच!!
खरंय आपण वाव देत नाही, पटलं तुझं. आता मात्र मी सुधारेन. समोरच्याला नवीन भाषा शिकायला प्रवृत्त करणं, म्हटलं तर किती चांगलं काम!! अन् ते करायलाच आपण कचरतो.
कळलं मला, पोचलं माझ्या डोक्यापर्यंत.
मी आहे तुझ्या जोडीला, मराठीचा जिथे तिथे आग्रह धरायला, सर्वेशने अगदी मनापासून आश्वासन दिलं लेखाला.
नेहमी तुझा हेका सोड म्हणणाऱ्या नवऱ्याने, आज तिचा हेका उचलून धरला.
ते पाहून लेखाच्या मनात छोट्याशा विजयाची छोटीशी पताका आनंदाने फडफडू लागली.............
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article