मराठी कथा
सामाजिक
पोचपावती.........!!
सोमवार, १ मार्च, २०२१
सकाळी दहा वाजताच मृगयाच्या घराची बेल वाजली. सगळं काम आटपून नुकतीच निवांत बसली होती ती. आत्ताच टेकली अन् लगेच उठावं लागलं म्हणून दार उघडायला उठली तेच पुटपुटत, आता कोण आलं, जरा कोणी शांत राहू देत नाही.
दरवाजा उघडल्यावर मात्र तिचा चेहरा खुलला. तिची सख्खी शेजारीण आकांक्षा दरवाज्यात उभी होती.
खरंतर तिची ही वेळ नव्हती येण्याची. दुपारी चार वाजताची होती, दोघी शेजारणी झोप सोडून गप्पा झोडत बसायच्या कित्येक वेळ.
म्हणूनच मृगयाने तिला आत घेत पहिला प्रश्न विचारला, तू आज एवढ्या लवकर कशी?
हो ग. मनाला खटकलं काहीतरी, म्हटलं तुझ्याशी बोलून मोकळं होऊया. चार वाजेपर्यंत डोक्यात तेच चालेल नाहीतर. तेवढं थांबायचं नव्हतं मला. आकांक्षा बाहेरच्या दिवाणावर आरामात लोडला टेकून बसत म्हणाली.
काय झालं एवढं? इतकं काय मनाला लागलं तुझ्या?, मृगयाने अगदी आतुरतेने विचारले.
आकांक्षाने सरळ विषयाला हात घातला.
काही नाही माझी नणंद ग.
तुला माहिती आहे ना परवा मी माव्याचे गुलाबजाम केले होते!
हो मलाही दिले होतेस तू. काय झाले होते झक्कास!! मी तुला ते सांगायला पण आले होते लगेच. नाव काढताच मृगयाच्या तोंडाला पाणी सुटलं.
बघ ना पण आता दोन दिवस झाले तरी माझ्या नणंदेचा साधा फोन पण नाही. मिटक्या मारत खाऊन, जिरले पण असतील आता; पण जरा वाटलं नाही तिला वहिनीचं थोडं कौतुक करावं. सांगावं मस्त होते ह.
विसरली असेल गडबडीत.....
काही नाही नेहमी अशीच करते ती. सासूबाई मात्र मी काही नवीन केलं की अगदी आठवणीने तिला द्यायला पाठवतात माझ्या नवऱ्याला. कामावरून थकून आला तरी तो जातोही लगेच. पण तेच लेकीला नाही सांगत, फोन कर हो माझ्या सुनेला आठवणीनं.
कितीही म्हटलं तरी मन दुखावतं ग माझं!!
आता मागच्या महिन्यातली गोष्ट. साडी घ्यायला दुकानात गेले. मला घेतली, तशी तिलाही एक घेतली. म्हटलं एकच बहीण आहे यांना. सहज म्हणून तिलाही साडी घ्यावी आपल्याबरोबर. पण तुला सांगते, त्यानंतर चार वेळा येऊन गेली, मात्र त्या साडीचा उल्लेखही केला नाही. अरे नुसती आवडली असं जरी म्हटली असती ना, तरी खूप बरं वाटलं असत मला.
असं खूप वेळा दुर्लक्ष केलं ग मी. पण आताशा उगाच मनात सारखं सारखं तेच येतं.
मी आता सासूबाईंना ठणकावून सांगणार आहे, तुमची मुलगी एका शब्दांनं पोचपावती देत नाही. मला नाही द्यायची इच्छा होत आता काही. आकांक्षाची चिडचिड तिच्या देहबोलीतून स्पष्ट दिसत होती.
मृगयाने तिला थंड पाणी आणून दिलं. शांतपणे न बोलता प्यायला लावलं आणि म्हणाली,
आकांक्षा तिने तुला कधीही कुठल्याही गोष्टीची पोचपावती दिली नाही. तरी तू आत्तापर्यंत तिला काही ना काही देत होतीस. किती सुंदर आहे ग मन तुझं? इतका मनाचा मोठेपणा खूप कमी लोकांकडे असतो.
आता मात्र तुला बदलायचंय. म्हणजे तुझा चांगुलपणा सोडायचाय. पण त्याने तुला आता होतंय त्यापेक्षा अधिक दुःख होईल हे मात्र खरं. तुझा मूळ स्वभाव तू सोडणार. तुझं मन तुला एक सांगणार आणि तू करणार मात्र दुसरंच!!
त्यापेक्षा तू तिच्याकडून अपेक्षा करणंच सोडलस तर?
देण्यातला आनंद सर्वात मोठा!! तो अनुभव ना तू. किती छान वाटतं आपल्याच मनाला, जेव्हा आपण कुणाला काही प्रेमानं देतो.
पण समोरूनही त्या प्रेमाची पोचपावती मिळाली की आणखी छान वाटतं ग. स्पेशली सासरच्या माणसांकडून!!, आकांक्षाने बोलता बोलता आवंढा गिळला.
तू मला काय म्हणालीस परवा, तू आपलीच आहेस ग!! एवढ्या लगेच सांगायला यायची काय गरज होती.
मग सासरची माणसं तुझी आपली नाहीत का ग? त्यांनाही आपलं मानून सोडून दे ना ........
घेऊ देत वेळ घ्यायचा तेवढा, पण एक दिवस नक्की सुचेल तुझ्या नणंदेला तुझा चांगुलपणा पाहून, आतापर्यंतची सगळी पोचपावती द्यायला. आणि तो दिवस तुझ्यासाठी सर्वात खास असेल.
पण तू तुझा स्वभाव बदललास तर तो दिवस कधीच नाही उजाडणार........
बघ कसं काय ते. ठरव तुझं तूच. मृगयाने समजावल्यावर तिला सगळं पटलं. आणि ती उठून जायला निघता निघता म्हणाली, म्हणून आले पटकन तुझ्याकडे. मनातलं सगळं किल्मिष दूर झालं. तिथल्या तिथे फटक्यासरशी चूक दुरुस्त झाली.
आकांक्षा मोकळी होऊन गेली. पण तिच्याशी एवढं बोलल्यावर मृगयालाही तिच्याकडून चुकून माकून द्यायच्या राहिलेल्या पोचपावत्या एकेक करून डोळ्यासमोर आल्या.
त्या सगळ्यांना तिने आवर्जून फोन लावला.
निमित्त राहून गेलेल्या गोड शब्दांच्या पोचपावतीचं काय झालं, मात्र ते स्वतःहून उचलेलं छोटं पाऊल तिच्या नात्यांचा धागा अगदी कायमसाठी मजबूत करून गेलं...........
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article