मराठी कथा
सामाजिक
ती स्पंदनं ऊर्जामयी .......!!!
मंगळवार, २ मार्च, २०२१
कसल्या भारी आहेत ग तुझ्या सासूबाई!! काल माझ्या घरी अगदी हक्काने आल्या. मनसोक्त गप्पा काय मारल्या. समोर पुस्तक दिसलं, तर निवांत वाचत काय बसल्या.
इतकं बरं वाटलं ना मला. तुमच्या कॉलनीत राहायला आले मी, ते खूप चांगलं झालं असं वाटतंय आता मला. माझी ना आई जवळ ना सासू. पण काल त्या आल्या आणि ती कमतरता आता दूर होणार असं वाटतंय मला. कृपा फोनवर रिद्धीशी तिच्या सासुबद्दल भरभरून बोलत होती.
हो ग चांगल्याच आहेत त्या. फार आवडतं त्यांना बोलायला, हिंडायला फिरायला. वय झालं तरी हलकं ठेवलंय त्यांनी शरीराला आणि मनालाही!!, रिद्धीलाही सगळं चांगलंच सुचत होतं बोलायला. ते पाहून कृपाला फारच आश्चर्य वाटलं. आणि ती म्हणाली, खरं सांगू रिद्धी. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला वाटलं, मी तुझ्या सासूबांईबद्दल चागलं बोलले की तू नक्की म्हणणार , कसलं काय? घरी येऊन बघ कशा वागतात त्या!! घरात वेगळ्या आहेत ग बाई........
बहुतेकदा हेच ऐकायला मिळतं, सुनेजवळ सासुचं कौतुक केलं किंवा सासुजवळ सुनेचं कौतुक केलं की........
पण अहो आश्चर्यम्!! काल ना तुझ्या सासूबाईंनी तुझ्याबद्दल एकही नाराजीचा शब्द काढला, ना आज तू!!
आखिर राज क्या है??
तिने असं विचारल्यावर रिद्धी खदखदून हसत म्हणाली, मी तुला म्हटलं ना मगाशी, वय झालं तरी शरीराबरोबर मनही हलकं ठेवलंय त्यांनी.
अगं त्यांना कसलीही तक्रार करणं माहीतच नाही कधी!! नक्कीच त्यांनी खूप प्रयत्नातून स्वतःला तसं घडवलं असणार......
खरंच, अशी माणसं असतात? मुख्य म्हणजे सासूबाई असतात? मला विश्वास नाही बसत. आम्ही एकमेकीपासून लांब आहोत. खूप कमी भेटतो. तरी एकमेकींबद्दल चार चांगल्या गोष्टी बोलणं जड जातं आम्हाला. कृपाला स्वानुभव सांगितल्याशिवाय रहावलच नाही.
रिद्धी म्हणाली, हो आहेत अशी माणसं. खरंतर मलाही नवीन होतं हे लग्न होऊन सासरी आल्यावर. सासू म्हणजे चार हात लांब ठेवून वागण्यासारखी व्यक्ती. तोपर्यंत लग्न झालेल्या मैत्रिणींनी मनावर ठसवलेलं अगदी.
पण या घरात आल्यावर महिना झाला, दोन महिने झाले, तरी माझ्या सासूबाईंनी कोणाजवळ तक्रार केलीच नाही माझ्याविषयी काही. अगदी माझ्याजवळही. वेगळंच वाटलं मलाही.
पण नंतर लक्षात आलं, त्या सतत कुठल्याही गोष्टीबाबत चांगलंच बोलत असतात, त्यामुळे त्यांच्या मनात वाईट काही येतच नाही. सवयच लागली आहे त्यांना. म्हणजे ती प्रयासाने लावून घेतली आहे त्यांनी. मस्त, मजेत आनंदाने राहण्यासाठी आणि दुसऱ्यालाही तसच राहू देण्यासाठी. आणि त्यांच्या संगतीने ती मलाही लागली.
ग्रेट रे!! नक्कीच महत्प्रयासाने लागली असणार अशी सवय. त्यांनी त्यावर श्रम घेतले असणार. मनाला वळवणं ते सुद्धा चांगल्यासाठी किती कठीण!! वाईटकडे अगदी सहज आकर्षिलं जातं ते. कृपाला त्यांच्याविषयी आता जास्तच आदर वाटू लागला.
बघ ना सासरे जाऊन पाच वर्ष तरी झाली असतील, पण त्यांनी स्वतःला अजिबात एकटं पडू दिलं नाही. की कोणत्याही प्रकारची नकारात्मकता मनात भरून घेतली नाही. खूप प्रेम आहे त्यांचं जगण्यावर. अन् सर्वात मुख्य म्हणजे स्वतःबरोबर दुसऱ्यालाही तसंच जगायला त्या प्रवृत्त करतात.
सगळ्या ओळखीच्यांकडे स्वतःहून जातात, अन् त्यांच्या घरी प्रसन्नतेचा शिडकावा करून येतात.
माझी आई त्यांची फॅन आहे. माझ्यापेक्षा खास त्यांना भेटायला येते गावाहून.
आता जवळ आली आहेस ना माझ्या, तू पण बघ काही दिवसात तक्रार मुक्त होशील. त्यांच्याकडे बघून तुलाही तसंच रहावं वाटेल. मन आपसूकच चांगलं वेचायला लागेल. रिद्धीच्या मनातलं सासूबाईंबद्दलचं कौतुक प्रत्येक शब्दातून बाहेर पडत होतं. ते पाहून कृपा म्हणाली, इतक्या वर्षात पहिल्यांदा बघितलं, सुन थांबतच नाहीये सासुविषयी चांगलं बोलताना!!
रिद्धी हसून म्हणाली, चांगलं बोलण्याची सवय ज्यांच्याकडे बघून लागली त्यांच्याविषयी बोलताना कितीतरी पटीने चांगलं निघणारच ना तोंडातून.
चल फोन ठेऊया आता, पोळ्या राहिल्यात माझ्या. बाजारहाट करायला गेल्यात सासूबाई. आल्या कि काय सांगू? तुमच्या कौतुकात वेळ कसा गेला कळलच नाही?
कृपाने हसत फोन ठेवला. मात्र रिद्धीच्या सासूबाईंना फॉलो करायची मनाशी पक्की खुणगाठ बांधली .........
आपल्यातल्या सकारात्मकतेची स्पंदनं भेटू त्यांच्यावर शिंंपडणाऱ्या रिद्धीच्या सासूबाईंसारखी कितीजणं तुमच्या आजूबाजूला आहेत सांगा पाहू?
ती जितकी जास्त, तितकं तुमचं जीवन धन्य!!
तुम्ही स्वतःच तसे असाल तर मग, क्या बात!!
होन्ना.......??
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article