खाऊचा डब्बा........!!


दोन महिने बघतोय चाललंय काय तुझं? एकतर घरातनं बाहेर काढली तिला, आणि आता का पुळका येतोय तुला? काही केलं की तिकडे नेऊन द्या, म्हणून माझी पिटाळणी करतेस ते!! अन् सारखं सारखं करते कशाला तिच्या आवडीचं तू?, मी नाही नेऊन देणार जा तुझा डब्बा-बिब्बा, भाऊंच्या डोक्यात पोराने वेगळं घर केल्याचा राग होता. आणि त्याला तसं करायला भाग पाडणारी त्यांना आपली बायकोच आहे, असं त्यांचं स्पष्ट मत होतं.

बरं नाही जायचं ना तुम्हाला, राहूदे. मीच जाऊन येईन, पाय जरा सुजल्यासारखे वाटत होते, म्हणून तुम्हाला सांगितलं तर , जाईन मी. म्हणत शोभाताई  गुडघ्यावर हात ठेवून आवरायला उठल्या. तसं भाऊसाहेब म्हणाले, राहू द्या. जाईन मीच. हे शेवटचं पण.

शोभाताईं त्यांच्याकडे बघून डोळ्यांनीच हसल्या, आणि मनात म्हणाल्या, दरवेळी जाताना शेवटचं शेवटचं करतात. वरून उगाचच नाही नाही म्हणतात, जायचं तर यांनाही असतंच.

भाऊंनी तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत खाऊचा डब्बा उचलला आणि ते बाहेर पडले.

तशा शोभाताई निवांत बाहेरच्या खोलीत येऊन बसल्या. त्यांच काय चाललं होतं ते त्यांनाही कळत नव्हतं. 
वेदांती त्यांची सून, जेव्हा त्यांच्याबरोबर घरात राहत होती. तेव्हा उगीच खुसपट काढून किरकिरत बसायच्या त्या. तिला आई नव्हती म्हणून ती जीव लावायला बघायची यांच्यावर तर त्यांना वाटायचं, उगीचच प्रेमाचा देखावा करतेय. त्यांना तिचं सगळं खोटं वाटायचं.  
शोभाताईंच्या आवडीचे पदार्थ भाऊंना विचारून मुद्दाम शिकून घेतले होते तिने. कधीतरी त्या कुठे बाहेर गेल्या असल्या की ती गुपचुप करून त्यांना सरप्राईज द्यायची. तो पदार्थ त्यांना लागायचाही छान, पण त्या कधी कबूल करायच्या नाहीत. किंवा तिचं तोंडभरून सोडाच, अगदी थोडंस सुद्धा कौतुक करायच्या नाहीत. 
वेदांतीने केलेले कितीतरी पदार्थ पोटात गेले त्यांच्या, पण ते करणारे हात मात्र त्यांनी कधी जवळ येऊ दिलेच नाहीत.
त्यांच्या मनात तेच चालायचं सतत, ही चांगलं वागून, गोड गोड बोलून आपली जागा घ्यायचा प्रयत्न करतेय. त्यांना तिचं काहीच गोड वाटायचं नाही. 
वेदांतीला फार वाटायचं. सासूबाईंनी आपल्या आईची जागा घ्यावी. तिच्या मनात तिने दिलीही होती ती जागा. कारण लग्नाअगोदर तिचा नवरा ऋतुज बरेचदा सांगायचा तिला, माझी आई खूप प्रेमळ आहे. तुझ्यावर खूप जीव लावेल बघ ती. ते ऐकूनच तिच्या मनात साजिरं चित्र तयार झालं होतं.  
पण प्रत्यक्षात मात्र त्याच्या आईने उगाच दु:स्वास करायला सुरुवात केली, आणि ते चित्र रंग विटल्यासारखं दिसू लागलं. तरी तिने सर्व नीट होईल या आशेवर दोन वर्ष काढली. कचाकचा भांडण नव्हतं, पण प्रेमाला प्रेम मिळत नव्हतं. रोज रात्री झोपताना वेदांतीची उशी ओली व्हायचीच. 
भाऊंनी, ऋतुजनी दोघांनी समजावून पाहिलं तरी फरक पडला नाही. मग ऋतुजनेच ठरवलं, आता बाहेर पडायचं. वेदांती आईकडून अपेक्षा करत राहणार, तेवढी आई आणखी जास्त वेळ लावणार.
त्याला माहित होतं, मूळची आपली आई चांगली आहे, पण आता उगीच 'अहं' भावनेनं पछाडली आहे.

त्याने भाऊंना नीट सगळं समजावून वेगळं घर केलं. शोभाताई म्हणल्याच त्यावेळी, मला वाटलंच होतं हे होणार म्हणून. ते काय तिचं सगळं आतून नव्हतं काही. पण हे बोलताना जीभ जड होतीये आपली हे त्यांच्या लक्षात आलं होतं.

दोन वर्षांचा सहवास होता. चांगला माणूस गेला तरी चांगुलपणाची छाप राहतेच मागे. तशीच वेदांतीची राहिली होती, जी त्यांना आता ती नसल्यावर जाणवायला लागली होती. तिचं ते सतत त्यांनी प्रतिसाद नाही दिला तरी त्यांना काही ना काही विचारत राहणं, आता मात्र मनात आठवणींच्या कळा उमटवत होतं.
त्यांच्या प्रत्येक हाकेसाठी त्यांच्या प्रेमाच्या नजरेसाठी आसुसलेली वेदांती, तिथे शरीराने नव्हती तरी आपल्या आजूबाजूलाच भिरभिरताना भासत होती त्यांना. 
सगळा स्वैपाक त्यांच्या मनाप्रमाणे करणाऱ्या वेदांतीला, दोन वर्षानंतर, ती निघून गेल्यानंतर 'काय आवडतं ग पोरी तुला विचारावं वाटायला लागलं' शोभाताईंना!! अन् दिवसेंदिवस ते वाटणं फारच प्रकर्षाने वाढायला लागलं, तसा एक दिवस त्यांनी ऋतुजचा नंबर फिरवला, आणि त्याच्याकडून तिच्या आवडीच्या पदार्थांची लिस्ट घेतली. ऋतुजला कळून चुकलं, आई आता आपल्या मूळ स्वभावावर आली.
लगेच शोभाताईंंनी दुसऱ्या दिवशी सहज म्हणून ओल्या नारळाच्या करंज्या बनवल्या, आणि एवढा खाऊ केलाय तो पोराला नेऊन द्या हो, म्हणून भाऊंना आदेश केला. 
काय ग? आपल्या पोराने कधीतरी हात लावला का करंज्याना म्हणत भाऊसाहेबांनी त्यांना वेड्यात काढलं. शोभाताई मनातच हसल्या, आणि म्हणाल्या न्या तर खरं.
तिथून पुढे खाऊ सारखा सारखाच बनू लागला.......
दर चार दिवसाआड खाऊचे डब्बे पोचवता पोचवता भाऊंना लक्षात आलं, पोरासाठी पाठवत नाहीच मुळी ही!! 

तिकडे वेदांतीलाही पहिले प्रथम कळलच नाही काही. मग तिचीही ट्यूब पेटली. खाऊ खाऊन झाल्यावर ती आवर्जून फोन करून ऋतुजला खाऊ खूप खूप आवडला म्हणून सांगू लागली. 

तिनेही भाऊंसाठी म्हणून खाऊचा डब्बा पाठवायला सुरूवात केली. नाव भाऊंचं पदार्थ मात्र शोभाताईंच्या आवडीचे!!
दोघींचे नवरे डब्बे पोचवण्याचं काम करत होते आणि दोघी डब्यातून आपलं अबोल प्रेम व्यक्त करत होत्या.  
भाऊंना आशा निर्माण झाली होती, परत सगळे एकत्र येतील. पण दोघीत तशी कोणतीही लक्षणं मात्र दिसत नव्हती.

म्हणूनच आज जरा डब्बा पोचवायचा म्हटल्यावर, त्यांंची चिडचिड झाली. एवढं आहे तर आता दोघींनी एकत्र यावं की!!
त्यांनी विचारलंच डब्बा देताना वेदांतीला, आता एवढं प्रेम ओतू जातंय तर वेगळं राहणं कशासाठी?

वेदांती क्षणाचाही विचार न करता म्हणाली, ते प्रेम दिवसेंदिवस असंच वाढत जावं फक्त यासाठीच!!
पहिले जवळ असून दूर होतो. आणि आता आम्ही दूर असलो तरी मनाने खूप खूप जवळ आलोय, अन् माझ्यासाठी ते खूपच महत्त्वाचं आहे. मला ते कायम जपायचं आहे........

भाऊ नाराजीने हसले. वेदांतीने आलेल्या डब्ब्यात दुसरा खाऊ भरून त्यांच्या हातात दिला. भाऊ तो घेऊन घरी आले, तसं शोभाताईंनी पटकन तो डब्बा पिशवीतून काढून घेतला. घाईने उघडला, त्यातली हिरवीगार कोथिंबीर आणि ओलं खोबरं पेरलेली पाटवडी तोंडात टाकली, तृप्त भाव चेहऱ्यावर आला. पूर्ण चेहरा आनंदाने हसला. ते बघणाऱ्या भाऊंना वेदांतीचं म्हणणं आता मनापासून पटलं, आणि त्यांना एकत्र आणण्याचा विचार त्यांनी मनातून कायमचा काढून टाकला............

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel