टोपणनाव..........!!


मागे एकदा आम्ही गावाला एका पाहुण्यांकडे गेलो होतो. तेव्हाचा प्रसंग.......
चिऊताई, पाहुण्यांना फक्कड चहा करून आण बघू. आम्ही गेल्या गेल्या त्या घरातल्या काकांनी फर्मान सोडलं.
माझ्यासमोर चार वर्षांची मुलगी होती. मी तोंडाचा 'आ' वासून म्हणाले, हिला चहा येतो! हिला सांगताय तुम्ही?
त्यावर ते काका कपाळावर हात मारून म्हणाले,  ही कुठली चहा करतेय. तिच्या आईशीला, माझ्या पोरीला बोललो मी. माहेरला आलीय ती. गेली चहा करायला आत. 
मला खूप हसायला आलं. वाटलं, हिची आई अजूनही चिऊताई तर ही कोण? 
मनात आलं की तोंडातून ते बाहेर काढल्याशिवाय माझा जीव काही थंड पडत नाहीच. मी विचारलच शेवटी त्यांना, नातीची आई चिऊताई तर नातीला काय म्हणता हो?
ते आमच्या चिऊताईचं पिल्लू!! पिल्लाने पण माझ्याकडे लगेच डोळे मिचमिचे करून बघितलं.
चिऊताई चहा घेऊन आली, आणि म्हणाली, बघा ना तोंडातलं जातच नाही कुणाच्या. तिकडे सासरी आले तरी असेच चिऊताई चिऊताई करतात सगळे, सासरची माणसं खुदुखुदु हसतात. 
पण खरं सांगू, मला आतून हेच नाव खूप आवडतं. चुकून माझ्या माहेरच्या माणसांनी माझ्या खऱ्या नावाने हाक मारली, तर वेगळंच वाटत काहीतरी.
माया आटल्यासारखं!! कुणा तिऱ्हाईताने हाक मारल्यासारखं!!
मला अगदी पटलं तिचं, कारण माझंही तेच झालं होतं. लग्न झाल्यावर माझी सगळी जिवाभावाची  माणसं माझं टोपणनाव सोडून माझ्या खऱ्या नावाने बोलवायला लागली. त्यांना बोलायलाही खरंतर जड पडत होतं, अन् मला ऐकायलाही. 
नवीन नवीन सुरुवातीला शिष्टाचार दाखवल्यावर, आपोआप सर्वजण मूळ पदावरच आले. इतक्या वर्षाचं लाडाचं नाव कुणाला सहजासहजी टाकता येईनाच झालं. अगदी अजूनही तेच चिकटून आहे मला!! आणि मला आवडतं तेच. 
इतकी मोठी झालीये तरी मी छोटीशीच वाटते मला त्या नावात........
माझ्या माहेरची सगळी माणसं अगदी माझ्या सासुसासऱ्यांसमोर, नवऱ्यासमोर, दोन पोरांसमोर पिंकेsss करून बिनदिक्कत केकाटतात, अन् मलाही त्यातच गोडवा वाटतो. माहेरची हाक ती माहेरचीच!! 

लहानपणी मला का कोण जाणे इंग्रजाळलेली टोपण नावं खूप आवडायची. कुकी, डिंगी, टिना भारी क्रेझ होती मला या नावांची!! आजूबाजूच्या काही पोरींची असली नावं होती. मी जाम जळायचे त्यांच्या नावावर!!
त्या असायच्या माझ्यासारख्याच शेंबड्या, डोक्यावर थापलेल्या तेलाने न्हाऊन निघालेल्या, वचावचा बोलणाऱ्या, काय झालं की ओचकारणाऱ्या,  माझ्या नजरेला मात्र हिरोईनी वाटायच्या उगाच.
अशीच माझ्या वर्गात एक मुलगी होती, तिचं टोपणनाव होतं डॉली. तिला ते शोभतही होतं, ती तशीच दिसायची. मला ते नाव खूप आवडायचं. मी माझ्या घरच्यांना खूपवेळा सांगायचे तेव्हा, मला डॉली म्हणा, डॉली म्हणा. पण कसलं काय, त्यांच्या तोंडात दुसरं कुठलं नाव बसलच नाही कधी.
बंड्या, बंटी, पिंकी घरातल्या तीन मुलांना लेबलं चिकटवून टाकली होती, ती आता त्या मुलांना मुलं झाली तरी अगदी तशीच आहेत. 
क्वचित कधी आमच्या बंड्याच्या नावाला हाक मारण्याऱ्याच्या मुडनुसार 'पंत' लावून मान वाढवला जातो एवढंच!! आपला बंड्या आता मोठा झाला, असं चुकून कोणाच्या तरी लक्षात येतं, अन् मग 'बंडोपंssत' अशी पेशवेशाही हाक मारली जाते. 
मला तर लगेच त्या क्षणी एक मोठी तुतारी ऐकू येते. डोक्यावर पगडी आणि खांद्यावर उपरणं घेतलेले 'सवाई बंडोपंत' साक्षात माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात. साधासुधा बंड्या 'बंडोपंत' झाला की चेहऱ्यावर कर्मठ भाव घेऊन मान वर करून टेचात चालताना दिसतो मला!!

हल्ली काही पूर्वीसारखं राहीलं नाही पण!! आता टोपणनावं फारशी कमी ठेवली जातात. किंवा जाणीवपूर्वक ठेवलीच जात नाहीत. मूळ नावच दोनाक्षरी छोटुकली असतात हल्ली, टोपणनावाची गरज पडतच नाही. 
बिट्टू, पिंट्या, छकुली, ठकी, सोनू, मोनू, बबलू, बबली, चिंगी, मुन्नी, गुंडू, पप्पू, पप्या, चिनू, मनू, चिऊ, माऊ नावाची पोरं पोरी माझ्या लहानपणी घरोघरी असायची. 
पहिली मुलगी झाली तर बहुतेकदा 'पिंकी' हाच शिक्का झाल्या झाल्या तिच्या नावावर लागायचा. अशा कितीतरी 'पिंक्या' माझ्याच मैत्रिणी होत्या, अजूनही आहेत.

पूर्वीची मंडळी टोपणनावं, लाडाची नावं धरून ठेवायची अगदी. काही होऊ दे सोडायचीच नाहीत.
बऱ्याच पोराचं आईकडचं अन् वडीलांकडचं वेगळं वेगळं टोपणनाव असायचं.
मी पण माझ्या दोन्ही मुलांची हौसेने टोपणनावं ठेवली. पण चार पाच वर्षानंतर ती विरुनच गेली. मला पोपट हा पक्षी खूप आवडतो. म्हणून पोरगा झाल्यावर लाडाने त्याचं नाव 'मिठठू' ठेवलं. मनात होतं, पोरगा पोपटासारखा बोलावा, गोड गोड बोलावा. पोरगा मोठा होता होता इतकी, इतकी जास्त पोपटपंची करायला लागला की मी धसक्याने त्याला मिठठू म्हणणंच सोडलं. आणि त्याच्या मूळ नावावरच आले!!

कोणी काही म्हणो, मला टोपणनावं, लाडाची नावं फार फार आवडतात. कुणी आपलं हळुवार गोंजारतय असं वाटतं मला त्या नावात ........
बालपणीचे सुंदर दिवस विसरू देतच नाही मला ते टोपणनाव, कितीही मोठं झालं तरी माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी छोटुसच ठेवतं, मला ते टोपणनाव............

तुमच्याकडे आहेत का अशी आई, आजी, मामा, मावशी, काकाने ठेवलेली टोपण नावं? आठवणी आहेत का सुंदरशा काही?

असतील तर टाका की सांगून😃

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel