कौटुंबिक
मराठी कथा
ऍडजस्टमेंट........!!
सोमवार, ५ एप्रिल, २०२१
तो पिक्चर नाही का लगे रहो मुन्नाभाई, त्यात कसे ते मुन्नाभाई आणि सर्किट पहिले एखाद्याला झोड झोड झोडतात, आणि नंतर म्हणतात, ए उठ रे तेरेको सॉरी बोलनेका है.....
दुर्गेशही त्यातलाच होता!! एखाद्याचा राग आला की त्याला वाटेल तसं तोंड सोडून बोलायचा, आणि त्यानंतर दहा मिनिटांनी पश्चाताप होऊन 'सॉरी' बोलायला जायचा.
दुर्गेशला वाटायचं, आपण विसरलो तसं समोरच्यानेही विसरावं आणि आपल्यासारखं लगेच नॉर्मल व्हावं.
पण असं कसं होईल? मनाला लागलेला घाव सहजी भरतो का कधी?
दुर्गेशची बायको दर्शनाही त्याला खूपदा सांगायची, पण त्याच्यात काही सुधारणा होतच नव्हती. तिला तर रोजच झेलावं लागायचं त्याचं वागणं. थोडं काही मनाविरुद्ध झालं की याचं डोकं सटकायचं आणि रागाच्या आवेशात नको नको ते तोंडातून बाहेर पडायचं त्याच्या.
सुरुवाती सुरुवातीला वाद घालणारी दर्शना, नंतर मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिकली.
पण कधीतरी मनात टोचायचच तिच्या खूप. डोळ्यातून नको असताना पाण्याची धारही लागायची.
ती पाहिली की दुर्गेश पिघळायचा, आणि सॉरी सॉरी बोलत तिला कुशीत घ्यायचा.
लहान मुलासारखे तिचे लाड करायचा. म्हणूनच अजूनपर्यंत त्याला सहन करत दर्शना त्याच्याबरोबर होती. रागीट असला तरी तिच्यावर खूप प्रेम करणारा होता दुर्गेश.
ती सर्वात जवळची होती त्याच्यासाठी. तिच्यासाठी घर सोडलं होतं त्याने स्वतःचं. आईवडील सोडले होते. कारण त्यांना ती नको होती. ती त्यांच्या मर्जीची नव्हती. आणि दुर्गेशला तीच हवी होती. त्याला तेव्हाही वाटायचं हिच आपल्याला सांभाळून घेऊ शकते चांगली, दुसरं कोणी नाही. त्याचं नुसतं तसं वाटणं, लग्न झाल्यावर दर्शनाने अगदी खरं करून दाखवलं होतं. ती त्याला संभाळून घेत होती. आल्यागेल्यासमोर याच्या रागावर नियंत्रण नाही राहीलं तर तो अगदी बेभान होऊन काहीतरी वावगं बोलायचा, सगळे म्हणायचे तिला, कसं राहतेस ग तू याच्याबरोबर? आम्ही नसतं सहन केल इतकं!
दर्शना हसून सोडून द्यायची. कोणाकोणाला काय काय समजावणार.......??
कधी दुर्गेशही विचारायचा, कशी राहतेस ग तू माझ्याबरोबर?
तेव्हा मात्र ती म्हणायची, जसा तू राहतोस माझ्याबरोबर!! मला कुठे तुझ्या आईसारखा सुंदर स्वैपाक येतो. तरी तू माझ्यासाठी मी जसं करते ते न कुरबुरता खातोसच ना? मला खूप फिरायला आवडतं म्हणून तुला ते एवढं आवडत नसूनही माझ्याबरोबर येतोसच ना?
तू परफेक्शनिस्ट, आणि मी पसाऱ्यात रमणारी.
माझा अव्यवस्थितपणा डोकं फिरवतो तुझं, चिडचिड वाढवतो तुझी, तरी तू आहेस ना माझ्याबरोबर?
मला तुझ्याही ऍडजेस्टमेंटची जाणीव आहे. संसार कुणा एकाच्याच ऍडजेस्टमेंट वर नाही चालत. ढकलला जातो फक्त.
पण बरेचदा कुणा एकालाच सतत वाटत असतं आपण ऍडजस्ट करतो. मला कधी असं वाटून मन दुःखी व्हायला लागलं, की मी तुझ्या जागेवर जाऊन माझ्याकडे बघते. अन् मला माझ्याबरोबर तुझीही ऍडजस्टमेंट दिसते.
मग मनातला सगळा दुरावा जाऊन ते तुझ्याकडे पुन्हा ओढ घेऊ लागतं!! तू कोपिष्ट असला तरी.......
दर्शनाइतकं उमजून बोलणं दुर्गेशला काही जमत नाही, तिच्यापुढे जास्त बोलायलाही त्याला काही सुचत नाही. तो आपला अशावेळी, आमचा संसार असाच चालू राहू दे, त्याची ढकलगाडी कधी न होवो, म्हणत देवाजवळ अगदी मनापासून मागणं मागतो फक्त............
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article