नील बटे सन्नाटा......!!

"डॉक्टरची मुलं डॉक्टर, इंजिनिअरची इंजिनिअर मग कामवाल्या बाईची मुलगी बाईच बनणार ना?"

दहावीत असलेल्या आपल्या मुलीचं हे उत्तर ऐकून तिची आई हडबडून जाते. तिच्या अपेक्षा वेगळ्याच असतात मुलीकडून. आपल्यासारखी फरफट मुलीच्या वाट्याला येऊ नये, म्हणून जीवाचं रान करून ती तिला शिकवत असते. आईच्या डोळ्यात मुलीसाठी हजार स्वप्न असतात, अन् मुलगी मात्र 'मी काय एका कामवाल्या बाईची मुलगी!!' म्हणून काही स्वप्नच बघत नसते. तिला ठाम खात्री असते, 'मी काय येऊन जाऊन बनणार आईसारखी कामवाली बाईच !!'

"नील बटे सन्नाटा"
दोनच दिवसांपूर्वी अगदी सहजच वेगळा पिक्चर शोधत असताना हा समोर आला. बघूया की नको, बघूया की नको करत पाहायला घेतला, आणि इतका कनेक्ट झाला हृदयाशी की बस्स!!
त्यातून योगायोग म्हणजे, मी देखील माझ्या दहावीत असणाऱ्या मुलीबरोबरच तो बघत होते, त्यामुळे जरा जास्तच मन गुंतलं त्यात!!

'नील बटे सन्नाटा' म्हणजे काहीच नाही!! 
तशी तर आपण अनेक उदाहरणं पाहिलीयेत शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची!!
समोर काळामिट्ट अंधार दिसत असताना, त्यातून मार्ग काढत आपली वाट नेत्रदीपक यशाने उजळून टाकणाऱ्यांची..........

या सिनेमातल्या चंदाची मुलगी तिला म्हणते, "मी पास जरी झाले चांगल्या मार्कांनी, तरी तुला काय झेपणार आहे का माझ्या शिक्षणाचा खर्च? काय करु मी पास होऊन? शेवटी बनणार तर मी तुझ्यासारखी बाईच!!"

तिची आई त्यावरही उत्तर शोधते. महत्प्रयासाने   कलेक्टरलाच जाऊन भेटते आणि विचारते, "तुमच्यासारखं व्हायला माझ्या मुलीला काय करावं लागेल, किती खर्च येईल हो?"

कलेक्टर म्हणतात, "आमच्याजवळ कुठे पैसे होते?  प्रचंड अभ्यासाच्या जोरावर मी पोचलो इथे."

चंदाच्या मुलीला नेमकं तेच तर करायचं नसतं!!
तिला अभ्यासाचा ताप डोक्याला विनाकारण दयायचाच नसतो. कारण तिच्या मनाने धरलेलं जे असतं, मला काही फ्युचर नाही. तिची काही स्वप्नच नसतात.

ही चंदा, बाई म्हणून कामाला असते एका डॉक्टरीणबाई कडेच!! ती जेव्हा त्यांना, तिच्या मुलीचे विचार सांगते, तेव्हा त्या जे उत्तर देतात, ते मला सर्वात आवडलं. "असं असेल तर, अब्दुल कलाम यांना तर मच्छिमार व्हायला हवं होतं मग, त्यांचे वडील तर मच्छिमारच होते !!'

विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरंच, कुठून कुठे पोचले ते. आपल्या डोळ्यांतल्या भव्य दिव्य स्वप्नांना अपार कष्टाची जोड देऊन!!

चंदा आपल्या मुलीला अभ्यासाची गोडी लागावी म्हणून हरतऱ्हेचे प्रयत्न करते. अगदी स्वतःच तिच्या शाळेत तिच्याच वर्गात प्रवेश सुद्धा घेते!!
गणित विषय अवघड वाटतोय का मुलीला, मग मीच गणित शिकून माझ्या मुलीला शिकवेन म्हणून ती त्यातली ट्रिक शिकतेही!!

हे सगळं पाहण्यासारखं आहे. मी मुलीबरोबर पाहताना तर मला सगळं अंगावर येत होतं. एकेक प्रसंग, एकेक डायलॉग मनावर कोरला जात होता अगदी!! माझ्या मुलीलाही खूप आवडला तो पिक्चर. बघून झाल्यावर बराच वेळ आम्ही त्यावर बोलत बसलेलो.  

"खुद तो अपनी जिंदगी मे कुछ कर नही पाई, और अब अपने सपने मुझपे थोप रही है?," हा डायलॉग जेव्हा चंदाची मुलगी तिला मारते, तेव्हा कुठेतरी काळीज हलतं खरं!!
प्रत्येक पालकाला वाटत असतं ना, जे आपल्याला नाही जमलं ते मुलांनी करून दाखवावं. हल्ली तर आपण म्हणतो, तुम्हाला पाहिजे ते करा, पण त्यात दटून राहा. त्यातली उंची गाठा. 
कधी कधी हे इतकं साधं सोपंही, मुलांना त्यांच्या टिनेजमध्ये "काय यार सारखी भुणभुण आहे!!" असा फिल देतं.

असं तर सिनेमातलं आई मुलीचं नातं अगदी गोड असतं, पण त्यात अभ्यास, करिअरच्या गोष्टी आल्या, आईने काही चांगलं सांगायचं म्हटलं, की ते कसं कडवट व्हायला लागतं, ते इतकं जिवंत मांडलं आहे की त्यात आपणच स्वतःला दिसू लागतो.

एकेक कलाकाराने वाट्याला येणारा प्रत्येक प्रसंग उजळवून टाकला आहे. ऍक्टर वगैरे न वाटता ते जवळचेच, नेहमीच्या बघण्यातले कोणीतरी वाटतात आपल्याला!!

'नील बटे सन्नाटा' एक प्रेरणा आहे. बघितला असेल तर छानच, पण नसेल तर आवर्जून बघा, आणि खास करून मुलांना घेऊन बघा. आपल्या मनातलं आपोआप पोचवेल हा सिनेमा त्यांच्यापर्यंत!! 

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.

Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel