सुनेच्या हातचं.........!!


कलाताईंनी मुलाने आणलेला डबा उघडला, तसा गरम गरम पोळ्यांचा खरपूस वास त्यांच्या नाकात शिरला. त्याने त्यांची भूक अधिकच चाळवली. मग भाजीचा डबा उघडला, फ्लॉवरबटाटा भाजीच्या रश्श्याच्या रंगाने त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. 
चेहऱ्यावर काही भाव न दाखवता त्यांनी पहिला घास तोंडात घातला, अन् तो पहिला घास त्यांच्या जीवाची एकदम शांती करून गेला.

गेले आठ दिवस त्या हॉस्पिटल मध्ये होत्या.  नुकताच एका पायात रॉड टाकला होता त्यांच्या. आणखी आठ दिवस तरी सुटण्याची शक्यताच नव्हती. हॉस्पिटलमधल्या जेवणाचा आता त्यांना अक्षरशः वीट आला होता. ते त्यांच्या घशाखाली उतरता उतरत नव्हतं. पण तिथलं खायचा हट्ट त्यांचाच होता. त्यांची सून हर्षिका अगदी पहिल्या दिवसापासून त्यांना डबा पाठवू का म्हणून सतत विचारत होती, पण त्यांना तिच्या हातचं काहीच नकोस वाटे. घरीदेखील त्या त्यांचं वेगळं बनवून खात.

हर्षिका होती देशावरची, आणि त्या होत्या कोकणातल्या. 
तिचा हात शेंगदाण्याच्या कुटाचा तर त्यांचा होता ओल्या खोबऱ्याचा!!
पहिले काही दिवस त्यांना चेंज म्हणून तिचे पदार्थ बरे वाटले. पण नंतर मात्र त्या ती स्वयंपाक करताना इतक्या लुडबुड लुडबुड करायला लागल्या, अन् तिला इतक्या सूचना द्यायला लागल्या की शेवटी ती कंटाळून म्हणाली, "एक तर तुम्ही करा नाहीतर मी करते. माझी फार धांदल उडते यात, मग काहीच धड होत नाही."
कलाताईंना स्वतः खरंतर काही करायचं नव्हतं, मात्र सुनेकडून आपल्याला हवं ते आपल्या पद्धतीने करून घ्यायचं होतं. 
त्यातून त्यांच्या सूचनेप्रमाणे सगळं केलं तरी जेवताना त्या नाक मुरडायच्याच. 

हर्षिकाही नंतर कंटाळली त्यांच्या नावं ठेवण्याला आणि मुद्दामच मग त्यांना न जुमानता आपल्याला हवं ते आपल्या पद्धतीने खुशाल करू लागली. नवऱ्याला आणि सासऱ्यांना तर सगळंच चांगलं लागत होतं. 

हर्षिका आपलं काही मानत नाही हे बघून, एक दिवस कलाताई तिला म्हणाल्या, "तुझ्या हातचं काही जात नाही बाई मला. माझं मी वेगळं करून खात जाईन. काय त्या अर्ध्याकच्च्या पोळ्या, काय त्या कुटात बुडलेल्या भाज्या!!
भाकरी तर काय या जन्मात तुझी खाण्यालायक होईल असं वाटत नाही मला!!"

हर्षिकाला बरंच वाटलं. मागची भुणभुण गेल्यामुळे.

नंतर तसं सगळं चांगलं चाललं होतं. 
पण मग एके दिवशी देवळात गेलेल्या कलाताई तिथल्याच फरशीवर घसरून पडल्या. पोचल्या त्या एकदम हॉस्पिटलमध्येच!!

आठ दिवस तिथलं खाऊन मन उबगलं, अन् एक दिवस आपल्या मुलाला म्हणाल्या, "घरचं आण बाबा काहीही. इथलं आता गिळवत नाही.
मुलाने आश्चर्याने विचारलं, पण आई तुला चालेल सुनेच्या हातचं??? नाही म्हणजे तूच नको म्हणलेलीस म्हणून म्हटलं."

कलाताई कपाळावर आठ्या आणून म्हणाल्या, "बघते आता खाऊन काय करू!!"

पण आठ दिवस हॉस्पिटलमधल्या जेवणानंतर सुनेच्या हातचा भाजी पोळीचा घास त्यांना स्वर्गसुख वाटला. त्यांनी सगळं तृप्ततेने खाल्लं.
पण सुनेला मात्र आवडलं असं अजिबात नाही सांगितलं. 
तिथून पुढे रोज हर्षिका अगदी जेवणापासून नाष्ट्यासकट सगळं पाठवू लागली. त्यांना आवडेल असं करायचा प्रयत्न असायचा तिचा. कुटाऐवजी नारळालाही जवळ केलं त्यांच्यासाठी तिनं. कुठूनतरी त्यांना आपलं आवडावं, त्यांना खावंसं वाटावं, एवढंच वाटायचं तिला सतत. 
धाकधूक असायची मनात, केलंय ते खातील ना? नवऱ्याला सारखं विचारायची ती, "खाल्लं ना नीट. आवडलं ना माझ्या हातचं!!"

नवरा म्हणायचा, "खाल्लं तर खरं. आवडलं का नाही देव जाणे!!"

हर्षिका त्यांना भेटायला जेव्हा जेव्हा गेली तेव्हाही त्यांनी तिला त्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. हर्षिकाचं मन खट्टू होई. पण ती जाऊ दे, खातायत ना तेवढं तरी बरं, म्हणून सोडून देई.

पाच सहा दिवस असेच गेले, एक दिवस मुलगा नेहमीसारखा डबा घेऊन आला. कलाताईंनी डबा उघडला, तसा त्यांंच्या आवडत्या बारीक मेथीच्या भाजीचा घमघमाट सुटला. त्यांच्या पद्धतीनेच भरपूर ओलं खोबर पेरलेलं होतं त्यावर!!
दुसऱ्या डब्यात गरम गरम भाकरी पाठवली होती हर्षिकाने. हे कलाताईंचं सर्वात आवडतं जेवण होतं.
कलाताईंना राहवलंच नाही, सगळा डबा एका दमात रिकामा करूनच त्या थांबल्या. नंतर त्यांच्या मनात आलं, "जमली की हिला भाकरी आपल्यासारखी! अन् भाजी पण किती चवदार होती!! "
मुलगा त्यांच्याकडे बघत मनातच हसत होता. त्याला आईच गुपित कळलं. त्याने हळूच मोबाईल पुढे केला, कलाताईंनी झट्कन तो घेऊन हर्षिकाला फोन लावला आणि म्हणाल्या, आता दोनच दिवस राहिले हं फक्त. मग तुला डबा नाही पाठवावा लागणार. घरी बसून माझ्या सुनेच्या हातचं मी अगदी सगळंकाही चाखत माखत खाणार!!
घालशील ना ग मला खायला तुझ्या हातचं?

अपेक्षा नसताना आलेल्या सासूच्या फोनने हर्षिका अगदी बावरून गेली. 'हो' म्हणयाच्या ऐवजी तिच्या तोंडातून 'हुंदका' बाहेर पडला.

अन् तिकडे सासूला त्या हुंदक्यातूनच तिचा गोड होकार कळला..........

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel