पालकत्व
मराठी कथा
सामाजिक
कित्ती ते गुण गावे बाई.....!!
सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९
हल्लीच काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ पहिला. आणि तो बघून मला अक्षरशः त्या व्हिडीओ बनवणाऱ्याची अतिशय किव आली.
काय बरं होतं त्या व्हिडिओत असं?
तर त्यात एक अडीच वर्षाचा मुलगा गॅसच्या अगदी जवळ उभा राहून चहा करताना दाखवला होता.
अर्थात आईने त्याला पकडलं असणार. पण दिसताना त्याचा हातच दिसत होता.
त्याने चहासाठी पाणी टाकलं. साखर, चहा चमच्याने डब्यातून घेऊन त्यात टाकलं. त्यानेच गॅस मोठा केला.
तो व्हिडीओ कुणी माझा अडीच वर्षाचा मुलगा चहा बनवतोय म्हणून मोठ्या कौतुकाने फेसबुकवर टाकला होता.
अपेक्षा होती, लोकांनी वाह वाह करून स्तुतीसुमनं उधळावीत. काहींनी उधळलीही, आणि काहींनी चांगलंच खडसावलं आणि काहींनी भरभरून शिव्याही घातल्या.
मला वाटलं, अरे अडीच वर्षाचा होईपर्यंत कशाला बरं थांबायचं, नुकताच जन्मला तेव्हाच नाही का करायला लावायचं लगेच. नवजात बालक चहा करताना बघून फेसबुककर मंडळी आश्चर्याचा झटका येऊन उडाली नसती का?? ते जरा जास्तच थ्रीलिंग असतं नाही!!
हल्लीच्या आईवडिलांना अगदी घाई झालीये सगळ्याची!!
नऊ महिने कसे काढतात देव जाणे!! कधी एकदा बाळ बाहेर येतंय अन् कधी एकदा त्याच्या प्रतापाचे व्हिडीओ अपलोड करतोय असं होतं असावं बहुतेक त्यांना!!
नऊ महिने कसे काढतात देव जाणे!! कधी एकदा बाळ बाहेर येतंय अन् कधी एकदा त्याच्या प्रतापाचे व्हिडीओ अपलोड करतोय असं होतं असावं बहुतेक त्यांना!!
तसं तर प्रत्येक आईवडिलांना मुलाचं कौतुक असतंच. पण आताशा कौतुकाचं प्रदर्शन मांडण्याची प्रथा सुरू झालीये.
प्रत्येकाच्या हातात मोबाईल, मुलांचं खेळणही मोबाईलच!!
छोट्या छोट्या गोष्टीचं मोठ्ठ मोठ्ठ कौतुक करून घ्यायची हाव लागलीये!!
हिच हाव मग पुढे मोठी मोठी होऊन मुलांना नसत्या अपेक्षांच्या भाराखाली दडपवून टाकते.
काही क्षण आपले आपल्यापुरते असतात, त्याचा आपला आपण मनसोक्त आनंद लुटावा, हे फार कमी जणांच्या गावी असतं हल्ली!!
घरातला प्रत्येक आनंद, दुःख बाहेरच्या लोकांपर्यंत पोचवून त्यांची रिऍक्शन टिपल्याशिवाय झोप येत नसावी बहुतेक या लोकांना!!
काही जण मुलांचे बालवाडीतले रिझल्ट पण फेसबुकवर टाकतात, तेव्हा खरंच हसायला येतं.
माझ्याच महितीतले एक आहेत, ते पोरीच्या वार्षिक परीक्षेच्या निकालापासून, ते तिला कुठल्याही स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसांपर्यंत सर्व फेसबुक वर टाकून, कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या सर्वच्या सर्व लोकांना व्हाट्सएप करून कळवतात. कोणी विचारलं नसतानाही!!
एकदा असंच, हे डिटेल्स ज्यांना वेळच्यावेळी पोचतात; त्यातल्या एकाने, त्या बाईच्या मुलीचे भरपूर कौतुक करून मला ऐकवलं, काय ग तुझी मुलगी अभ्यासात हुशार दिसत नाही वाटतं!! काहीच कळवत नाहीस तू आम्हाला!!
मी म्हटलं, का हो काय झालं?
नाही, ती अमकी बघ कसं आम्हाला प्रत्येक परीक्षेनंतर रिपोर्ट कार्ड व्हाट्सप करते. तुझं नाही येत कधी??
यावर मी त्यांनाच विचारलं, मला सांगा, तुमच्या मुलीला मी लहानपणापासून ओळखते. तिने पहिला नंबर कधी चुकवला नाही. दहावीला तर अख्ख्या जिल्ह्यात पहिली आली, तुम्ही काय तेव्हा हत्ती वरून साखर वाटलीत का??
चला, मोबाईल नव्हता त्यावेळी, पण तुमच्याकडे लँडलाईन होता की!! किती जणांना मुद्दाम फोन करून सांगितलंत?? की पोस्टाने किती जणांना मार्कशीटचे झेरॉक्स पाठवलेत सांगा??
आणि ते पाठवले नाहीत म्हणून तुमची मुलगी हुशार नव्हती का?? किंवा त्यावेळी असं काही करावं असा विचार तरी तुमच्या मनात आला का??
प्रत्येक वेळेला बॅंडबाजा वाजवून लोकांना आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट सांगणं, अचानक इतकं गरजेचं कसं काय झालं??
त्यावर त्यांनी हो ग, हे तर खरं, पण हल्ली दर दिवसागणिक छोटं मोठं काहीतरी येतंच असतं, आता आम्हालाही कोणाचं कौतुक नाही केलं तर दिवस सरल्यासारखा वाटत नाही, म्हणत फोन ठेऊन दिला.
कौतुक करण्यासारख्या गोष्टीचं नक्की कौतुक व्हावं , पण उठसुठ सगळ्याच चुटूर पुटूर गोष्टीची कौतुकं कशाला करून घेतली पाहिजेत??
काय म्हणता??
©️स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
लेख आवडल्यास लाईक, कमेंट आणि फॉलो नक्की करा आणि शेअर करताना मात्र नावासकटच करा😊
Previous article
Next article
