मराठी कथा
सामाजिक
स्त्रीवादी
भोग
सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९
किती छळशील रे बाबा!! कुठल्या जन्मीचे भोग आहेत कोणास ठाऊक??
जा की मर तिकडं, कामधंदा कर जरा, स्वतः करत नाही
आणि मला ही धड काही करून देत नाही.
हे असं आपल्या तीस वर्षाच्या पोराला कोसत बसणं शांताबाईसाठी आता रोजचंच झालं होतं.
पोरगं ही पक्क कोडगं होतं, रोज शिव्या खायचं तरी शांताबाईंच्या मागे पैसे दे, पैसे दे करत करत त्यांच्या कामापर्यंत येतच राहायचं.
शांताबाई सकाळी एका ऑफिसमध्ये साफसफाईचं काम करायच्या आणि नंतर चार-पाच घरची धुणीभांडी करायच्या.
तरणाताठा मुलगा घरात असताना घराचा भार मात्र शांताबाईंवरच होता. त्यांचा नवरा तर पोरगा लहान असतानाच गेला होता.
शांताबाईंनी पोराकडं बघून दिवस काढले. त्याच्यासाठी न खचता उमेदीनं उभ्या राहिल्या. त्यावेळी वय तरुण होतं तर त्या दहा दहा घरची धुणीभांडी करत असत. पोराला शिकवून मोठ्ठा ऑफिसर बनवायचं स्वप्न होतं त्यांचं.
लोक म्हणायचेही पोरगं तुमच्या कष्टाला फळ देणार बघा!!
पण कसचं काय??
पोरगं कसंबसं दहावी शिकलं आणि शाळा सोडून उनाडक्या करायला लागलं.
लहान वयात संगतीने नको नको ते नाद लागले.
आणि शिकण्यापेक्षा ते सगळं त्याला जास्त आवडू लागलं.
शांताबाई त्याला किती मारायच्या, बरेचदा घरात कोंडून कामाला जायच्या पण पोरगं सुधारलं नाहीच.
मग त्यांना वाटलं, लग्न लावलं तर काहीतरी सुधारणा होईल, जबाबदारी घेईल, म्हणून त्यांनी एकवीस पूर्ण झाल्या झाल्या त्याला बोहल्यावरही चढवलं.
पोरगा त्यानेही सुधारला नाहीच उलट शांताबाईंच्या अंगावरच जास्तीचा भार पडला.
सून आली, वर्षांतच घरी अंगाईदेखील सुरू झाली.
पोरगा नावाला कुठेतरी रोजंदारीवर काम करायचा, कधी जायचा; बहुतेकदा कामाच्या नावावर गुत्त्यात जाऊन बसायचा.
जे काही किडुकमिडुक कमवायचा ते स्वतःवरच उडवायचा. अन् रात्री हलत डुलतच घरी यायचा.
आणि मग रोज सकाळी आईशीच्या मागे पैशासाठी भुणभुणत बसायचा. रोज सकाळी त्याला आईकडून कधी शंभर, कधी दोनशे तर कधी पाचशे रुपये हवे असायचे.
आज दे; उद्या देतो म्हणून घेऊन जायचा, उद्या तर कधी उजाडायचाच नाही त्याचा. उजाडायचा तो पुन्हा पैसे मागायलाच.
बायको तर त्याच्या वागण्याला कंटाळून बारकं पोरगं घेऊन दोन वर्षांतच कायमची माहेरी निघून गेली. कुठला उपटसुंभ गळ्यात बांधला म्हणून शांताबाईना वाट्टेल ते बोलही लावले तिने.
तिचंही बरोबर होतं, शांताबाईंनी लग्न ठरवायच्यावेळी पोराचे कारनामे लपवून ठेवलेले. चांगलं चित्र उभं केलेलं तिच्या घरच्यांसमोर. मग ती तरी आणखी दुसरं काय करणार!!
आता तर शांताबाईंनाच पोराचा कंटाळा आला होता. कामाच्या ठिकाणी सुद्धा पोराने नाकेनऊ करून टाकलं होतं. बायको गेली तसं त्याने नावालाही कामधंदा करणं सोडूनच दिलं होतं.
रोज आईकडे हात पसरणं हाच काय उद्योग सुरू ठेवलेला.
रोज शांताबाई कामाला जाताना त्यांची वाट अडवायचा.
त्यांनी नाही ऐकलं तर त्यांच्या मागे कामाच्या इथे यायचा.
पैसे दे नाहीतर इथून हलणार नाही म्हणून त्यांना ब्लॅकमेल करायचा.
कधी त्या त्याला ढकलायच्या, मारायच्या तर पैसे दे; मगच सोडेन म्हणून तो त्यांचे दोन्ही हात पकडून ठेवायचा.
बरेचदा बाहेरचे लोक मध्ये पडून त्याचं भांडण सोडवायचे.
जगणं नकोसं केलं होतं अगदी शांताबाईंना पोराने.
कामावर बायकांना सुद्धा सांगत बसायच्या, कुठल्या मुहूर्तावर पोरगं जन्मलं कोणास ठाऊक, जरा म्हणून सुख नाही आयुष्यात. कुणाकडेतरी व्यथा मांडून त्यांना हलकं वाटायचं.
बायका म्हणायच्या, हाकलून द्या घरातून असल्या पोराला, म्हणजे वठणीवर येईल बरोबर.
तेच वाटतय आता. जगणं हराम केलंय माझं. पण काळीज तुटतं हो. काही झालं तरी पोटचा गोळा तो, शांताबाई एवढसं तोंड करून बोलायच्या.
पण पोराच्या करणीने ती वेळ लवकरच आणली.
एक दिवस शांताबाई अशाच कामाला जाण्यासाठी घरातून निघत असताना त्यांच्या पोराने हजार रुपये मागायला सुरुवात केली.
शांताबाईंनी माझ्याकडे नाहीत एवढे पैसे असे सांगितले,
तर पोरगा त्यांना शिव्या घालून आरडा-ओरडा करू लागला. त्यांच्या हातातलं पाकीट खेचून घेऊ लागला. कुठलीतरी उधारी चुकती करायची होती त्याला.
पण शांताबाई काही ऐकेनात. काही झालं तरी मी तुला पैसे देणार नाही, म्हणत हट्टालाच पेटल्या.
त्याला धक्का मारून घरातून बाहेर पडायला लागल्या, तसा
त्याने सर्व जीव काढून त्यांना जोरात आपल्याकडे ओढलं आणि या झटापटीत त्या पाय सरकून खाली आपटल्या.
कंबरेत जोरात कळ गेली, तरी उठल्या आणि पोराला जे हातात येईल त्याने मारत सुटल्या. आईशीच्या जीवावर उठलायस का रे सैताना, करत त्याला धोपटतच घराबाहेर काढलं. परत घरात पाऊल ठेवशील खबरदार, पोलिसांकडेच देऊन टाकेन म्हणून त्याला चांगलंच धमकावलं.
आणि तिथून तडक त्याच्याकडे मागे वळूनही न पाहता, नेहमीच्या ऑफिसच्या कामाला न जाता जिथे खूप वर्षांपासून धुण्याभांड्याच काम करायच्या, जिला बरेचदा आपलं दुःख सांगायच्या त्या बाईच्या घरी गेल्या. आणि तिथे जाऊन मन हलकं होईपर्यंत रडल्या.
राहून राहून येणारे हुंदके दाबत म्हणाल्या; काहीही होवो, आता नाही घेणार घरात मी त्याला, तो माझ्यासाठी मेला. असल जगायची धमक तर जगल एकटा, नाहीतर मरल कुठं जाऊन बेवारश्यासारखा!!
खूप सहन केलं मी या पोरापायी, पण आता नाही, आता मुळ्ळीचं नाही........
माझे भोग संपले, आता भोगायची बारी त्याची..........!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Previous article
Next article